News Flash

उघडले आंतरजालाचे दार..

वायफायच्या लोकप्रियतेमागे असलेलं आणखी एक कारण म्हणजे- या सेवेची सार्वत्रिक उपलब्धता!

अमृतांशु नेरुरकर amrutaunshu@gmail.com

आज आंतरजालावर (इंटरनेट) प्रवेश मिळवण्यासाठी सर्वाधिक वापरले जाणाऱ्या वायफाय तंत्रज्ञानाची जडणघडण कशी झाली?

केवळ अडीच दशकांपूर्वी अस्तित्वात आलेलं वायफाय तंत्रज्ञान, आज आंतरजालावर (इंटरनेट) प्रवेश मिळवण्यासाठी सर्वाधिक वापरलं जाणारं तंत्रज्ञान आहे यात शंका नाही. आजघडीला उत्पादित होणारं प्रत्येक इलेक्ट्रॉनिक उपकरण हे वायफाय सेवेला जोडलं जाण्यास पूर्णत: सक्षम असतं; मग ते लॅपटॉप, डेस्कटॉप किंवा टॅबलेट संगणक असोत, ‘स्मार्ट’ म्हणवली जाणारी उपकरणं (जसं मोबाइल फोन, टीव्ही, प्रिंटर आदी) असोत किंवा अगदी वस्तुजालाशी (इंटरनेट ऑफ थिंग्स) जोडली गेलेली विविध प्रकारची उपकरणं असोत. गेल्या केवळ एका वर्षांत ३०० कोटींहून अधिक वायफाय-सक्षम उपकरणांची निर्मिती केली गेली, यावरूनच डिजिटल युगातील वायफाय सेवेची निकड आणि लोकप्रियता ध्यानात येईल.

वायफायच्या लोकप्रियतेमागे असलेलं आणखी एक कारण म्हणजे- या सेवेची सार्वत्रिक उपलब्धता! आज आपण घरी, कार्यालयात वायफाय सेवेचा वापर करतोच, पण प्रामुख्यानं विकसित देशांत अशी एकही सार्वजनिक जागा नसेल जिथं ही सेवा मोफत उपलब्ध नाही. भारतातही अनेक शहरांमध्ये, रेल्वे स्थानकांवर वा गाडय़ांमध्ये, विमानतळांवर, उपाहारगृहांत आज या सेवेचा सर्रास वापर केला जातो. आंतरजालाशी सतत जोडलेले राहण्यासाठी, वैयक्तिक वा व्यावसायिक स्तरावर माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी सेल्युलर सेवेप्रमाणेच वायफाय सेवा ही वरदान आहे. दुर्दैवाने, माहिती युगात जेव्हा एखादं तंत्रज्ञान मोफत किंवा अत्यंत माफक दरात उपलब्ध होऊ लागतं, तेव्हा विदासुरक्षा आणि गोपनीयता संरक्षणाच्या दृष्टीनं नवनवी आव्हानं निर्माण होऊ लागतात.

आपण आपला लॅपटॉप अथवा मोबाइल फोन वायफायला जोडतो तेव्हा आपली कोणत्या प्रकारची खासगी माहिती आंतरजालावर प्रसृत केली जाते? अशा माहितीच्या सुरक्षेची कितपत हमी वायफाय सेवापुरवठादाराकडून दिली जाते? खासगी किंवा सार्वजनिक वायफाय सेवेचा लाभ घेताना एक वापरकर्ता म्हणून आपल्याकडूनही काही शिस्तपालन अपेक्षित आहे का? या प्रश्नांना भिडण्यापूर्वी वायफाय तंत्रज्ञानाची जडणघडण समजून घेणं आवश्यक आहे; कारण त्या पार्श्वभूमीवरच आपल्याला वरील प्रश्नांची उत्तरं शोधावी लागतील.

वायफाय हे रेडिओ लहरींचा वापर करून बिनतारी संदेशवहन करण्याचे तंत्रज्ञान आहे. इन्स्टिटय़ूट ऑफ इलेक्ट्रिकल अ‍ॅण्ड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअर्स (आयईईई, ज्याचा उच्चार तीन ‘ईं’मुळे ‘आय-ट्रिपल ई’ असा करतात) या विद्युत आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील विविध तंत्रज्ञानांची मानके (स्टॅण्डर्ड्स) बनविणाऱ्या अमेरिकेतल्या अग्रगण्य संस्थेनं वायफाय तंत्रज्ञान वापरण्यासाठीचे नियम १९९७ मध्ये तयार केले, ज्यांना तांत्रिक भाषेत ‘८०२.११’ असेही संबोधले जाते. या नियमांच्या अधीन राहून कोणतीही कंपनी अथवा संस्था वायफाय परिसंस्थेमध्ये (इकोसिस्टीम) वापरली जाणारी उपकरणे बनवू शकते.

सुरुवातीला या तंत्रज्ञानाला त्याच्या नामांकनाप्रमाणे ‘८०२.११’ असेच संबोधले जाई. पुढील दोन वर्षांत जसजसं हे तंत्रज्ञान लोकप्रिय होऊ लागलं तेव्हा याचं आकर्षक व लोकांच्या सहज लक्षात राहील असं नामकरण करण्याची गरज अधोरेखित होऊ लागली. ऑगस्ट १९९९ मध्ये मग ‘आय-ट्रिपल ई’ने आपल्या सल्लागारांच्या प्रस्तावांमधून ‘वायफाय’ या शब्दाची निवड केली आणि या तंत्रज्ञानाला एक स्वतंत्र नाममुद्रा मिळाली. असाही एक मतप्रवाह आहे की, वायफाय हे ‘वायरलेस फिडेलिटी’ या शब्दाचे संक्षिप्त रूप आहे. पण पुढे ‘आय-ट्रिपल ई’नेच स्पष्ट केल्याप्रमाणे हा समज खरा नाहीये.


आता वायफाय तंत्रज्ञान काम कसं करतं, हे थोडक्यात जाणून घेऊ या (आकृती पाहा). लॅपटॉप, मोबाइल फोन यांसारख्या उपकरणांद्वारे (ज्यांना ‘स्टेशन्स’ असं म्हणतात) वायफाय सेवेला जोडून घेण्यासाठी आपल्याला या उपकरणांत असलेला वायफाय अँटेना मदत करत असतो. या अँटेनाच्या मदतीने आपल्या उपकरणाला त्याच्या ५० ते १०० मीटपर्यंत असलेल्या ‘वायफाय राउटर’शी संधान साधता येते. या राउटरला तांत्रिक भाषेत ‘अ‍ॅक्सेस पॉइंट’ तर बोली भाषेत ‘हॉटस्पॉट’ असंही म्हणतात. सार्वजनिक ठिकाणी तर एका अ‍ॅक्सेस पॉइंटशी शेकडय़ानं उपकरणं जोडलेली असतात.

आपल्या उपकरणानं जरी अ‍ॅक्सेस पॉइंटशी यशस्वीरीत्या संधान साधलं, तरीही आंतरजालावर प्रवेश मिळवण्यासाठी तेवढं पुरेसं नसतं. अ‍ॅक्सेस पॉइंट हा (बऱ्याचदा इथरनेट तारांद्वारे) इंटरनेट सेवा त्याच्यापर्यंत पुरवणाऱ्या एका वितरण व्यवस्थेशी जोडलेला असतो, ज्याला तांत्रिक भाषेत ‘गेटवे’ असं म्हणतात. विमानतळांसारख्या ठिकाणी जिथं एका वेळेला हजारो लोक एअरपोर्ट वायफाय सेवेचा वापर करत असतात तेव्हा तिथं असलेले अनेक अ‍ॅक्सेस पॉइंट्स हे एका गेटवेशी जोडले गेलेले असतात. हा गेटवे पुढे जाऊन आंतरजाल सेवापुरवठादारांच्या (आयएसपी) यंत्रणेशी जोडला जाऊन मग इंटरनेट सेवा सुरळीतपणे अ‍ॅक्सेस पॉइंटशी जोडलेल्या सर्व वापरकर्त्यांना मिळत राहते.

आपल्या फोनला जवळच्या मोबाइल मनोऱ्याशी जोडून आपल्याला विविध सेवा पुरवणाऱ्या सेल्युलर व्यवस्थेशी वायफाय सेवेचं साधर्म्य आहे असं वाटू शकेल; पण ते तितकंसं खरं नाही. सर्वात महत्त्वाचा फरक म्हणजे, वायफाय तंत्रज्ञान वापरण्यासाठी उपयोगात येणारा ध्वनिवर्णपट (स्पेक्ट्रम) हा नि:शुल्क आहे; सेल्युलर लहरींप्रमाणे वायफाय लहरींचा लिलाव होत नाही किंवा त्याचा वापर करायला शासकीय परवानाही लागत नाही. म्हणजेच वायफाय मानकांत नमूद केलेल्या नियमांना अनुसरून कोणतीही कंपनी वायफाय सेवा प्रदान करण्यास लागणाऱ्या (आकृतीत उल्लेखलेल्या) उपकरणांची निर्मिती करू शकते. अशा निकोप स्पर्धेमुळे या उपकरणांच्या क्षमतेमध्ये उत्तरोत्तर वृद्धी होत गेली, तसेच एकंदरच वायफाय सेवा अत्यंत माफक दरात ग्राहकांना उपलब्ध होऊ शकली.

प्रत्येक यशोगाथेमागे किमान एक तरी नायक अथवा नायिका असतेच. वायफायच्या बाबतीत अशा नायकत्वाचा मान द्यायचाच झाला तर तो अमेरिकी दूरसंचार आयोगामध्ये (एफसीसी) संचालक पदावर काम करणाऱ्या मायकल मार्कसला द्यावा लागेल. वायफाय तंत्रज्ञान रेडिओ लहरींच्या ज्या वारंवारतेवर (फ्रिक्वेन्सी) काम करते, त्या खऱ्या तर एफसीसीनं औद्योगिक, वैज्ञानिक आणि वैद्यकीय कारणांमुळे होणाऱ्या उत्सर्जनासाठी राखीव ठेवल्या होत्या. उदाहरणार्थ, मायक्रोवेव्ह ओव्हनमधून होणारे उत्सर्जन या गटात मोडत असे. या लहरींना एकत्रितपणे त्यांच्या इंग्रजी आद्याक्षरानुसार ‘आयएसएम लहरी’ असं म्हणत.

एफसीसीनं विविध कारणांसाठी विभागलेल्या लहरींचे निरीक्षण करत असताना मार्कसला एक गोष्ट ध्यानात आली की, शासकीय नियमांप्रमाणे औद्योगिक, वैज्ञानिक किंवा वैद्यकीय कारणांसाठी होणाऱ्या उत्सर्जनावर प्रचंड मर्यादा असल्याने आयएसएम ध्वनिवर्णपटाचा वापर जवळपास नगण्य होता. या वापराशिवाय पडून राहिलेल्या रेडिओ लहरी जर काही नियमांच्या अधीन राहून संदेशवहनासाठी विनापरवाना खुल्या केल्या तर त्याचा लाभ दूरसंचार क्षेत्रातील शास्त्रज्ञांना दळणवळणाच्या क्षेत्रात नवनवीन शोध लावण्यास करता येईल, असा द्रष्टा विचार त्यानं केला.

लागलीच मार्कसनं आपली कल्पना एफसीसीच्या संचालक मंडळाच्या गळी उतरवली आणि एफसीसीनं आयएसएम लहरींच्या खुल्या वापरास परवानगी दिली. ‘आय-ट्रिपल ई’नं जेव्हा जून १९९७ मध्ये वायफाय मानकाची (८०२.११) पहिली आवृत्ती प्रसिद्ध केली, तेव्हा इंटरनेटच्या सार्वत्रिक वापराला हातभार लागावा आणि या क्षेत्रात नावीन्यपूर्ण कल्पनांचा उगम होण्यास उत्तेजन मिळावं म्हणून विनापरवाना उपलब्ध असलेल्या आयएसएम लहरींचाच वापर वायफाय तंत्रज्ञानासाठी करण्यास संस्थेनं पसंती दिली होती. १९९७ मध्ये वायफाय सेवेचा कमाल वेग हा दोन एमबीपीएसपर्यंत (१ एमबीपीएस = १० लाख बिट्स प्रति सेकंद) मर्यादित होता. आजच्या गिगाबिट्स प्रति सेकंदच्या जमान्यात हा वेग बैलगाडीचा वाटेल; पण एक लक्षात घ्यायला हवं की, १९९७ मध्ये इंटरनेटचा व्यावसायिक वापर सुरू होऊन केवळ दोनच वर्ष झाली होती आणि त्या वेळी इंटरनेटसाठी उपलब्ध असलेल्या डायल-अप तंत्रज्ञानापेक्षा (ज्यात लॅण्डलाइन फोनच्या तांब्यांच्या तारांचा माहितीच्या वहनासाठी उपयोग केला जाई) वायफाय तंत्रज्ञान किमान २० पटींनी वेगवान होतं.

वायफाय तंत्रज्ञानानं त्यानंतर मागे वळून पाहिले नाही. ध्वनिवर्णपटाची विनापरवाना उपलब्धता, तंत्रज्ञानाची खुली संरचना, माहितीच्या प्रेषणाकरिता अत्यंत कमी ऊर्जेची आवश्यकता आणि त्यामुळेच किरणोत्सर्जनाचा नसलेला धोका, यामुळेच हे तंत्रज्ञान उत्तरोत्तर लोकप्रिय होत गेलं. आजही वस्तुजालावर एकमेकांशी जोडल्या गेलेल्या सर्व ‘स्मार्ट’ वस्तू या वायफाय-सक्षम आहेत आणि संदेशवहनासाठी प्रामुख्याने याच तंत्रज्ञानाचा वापर करीत आहेत.

लेखक माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील ओपन सोर्स, विदासुरक्षा व गोपनीयता तसेच डिजिटल परिवर्तन या विषयांचे अभ्यासक आहेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2021 1:36 am

Web Title: introduction to wi fi technology for internet zws 70
Next Stories
1 सेल्युलर तंत्रज्ञानाच्या क्रांतिपिढय़ा..
2 ‘सेल्युलर’ तंत्रज्ञानाचा उदय…
3 हार्लनची कसोटी..
Just Now!
X