25 February 2021

News Flash

खासगीपणाच्या भिंती..

विदासुरक्षा व गोपनीयतेबद्दल अशा प्रकारचे प्रश्न पडण्यास गेल्या दशकभरात प्रामुख्याने सुरुवात झाली.

अमृतांशु नेरुरकर

विदा(डेटा)सुरक्षा आणि गोपनीयतेबद्दल प्रश्न पडण्यास गेल्या दशकभरात प्रामुख्याने सुरुवात झाली असली, तरी माहितीच्या गोपनीयतेची व खासगीपणाच्या अधिकाराची जाणीव मानवाला पूर्वापार आहे..

नववर्षांच्या पहिल्याच आठवडय़ात, झटपट संवादासाठी आत्यंतिक लोकप्रिय असलेल्या व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या गोपनीयतेच्या धोरणात महत्त्वाचे बदल जाहीर केले होते. परंतु त्यावर टीका सुरू झाल्यावर, आता हे नवे धोरण तीन महिने लांबणीवर टाकण्याचा निर्णय व्हॉट्सअ‍ॅपने घेतला आहे. या लांबणीवर टाकण्यात आलेल्या धोरणात वापरकर्त्यांची व्हॉट्सअ‍ॅपच्या व्यासपीठावर उपलब्ध असलेली कोणत्याही प्रकारची खासगी माहिती फेसबुक किंवा तिच्याशी संबंधित कंपन्यांना प्रदान करण्याचे सर्वाधिकार व्हॉट्सअ‍ॅपने स्वत:कडे घेतलेत. महत्त्वाचे म्हणजे, हे बदल अंगीकारण्यास वापरकर्त्यांची तयारी नसेल तर त्यांना व्हॉट्सअ‍ॅप वापरणे बंद करण्याशिवाय कोणताच पर्याय दिलेला नव्हता. सहा वर्षांपूर्वी फेसबुकने व्हॉट्सअ‍ॅपचा ताबा मिळवल्यानंतर गोपनीयतेच्या तडजोडीची जाणवलेली भीती आज खरी ठरतेय.

गेले काही दिवस या विषयावर उलटसुलट चर्चा वृत्तपत्रांत व समाजमाध्यमांवर होत आहे. अनेक वापरकर्ते व्हॉट्सअ‍ॅपला कायमचा रामराम ठोकण्याचा व ‘सिग्नल’सारख्या ‘ओपन सोर्स’ पर्यायांना स्वीकारण्याचा विचार करताहेत. व्हॉट्सअ‍ॅपही त्यांचे हेतू कसे ‘शुद्ध’ आहेत व वापरकर्त्यांच्या गोपनीयतेला पायदळी तुडवण्याचा त्यांचा कोणताही इरादा नाही, असे समजावण्याचा आपल्या परीने प्रयत्न करतेय. या विषयाचे कवित्व आणखी काही काळ तरी नक्कीच चालू राहील. समाजमाध्यमांच्या माहितीच्या मक्तेदारीची व त्यातून उद्भवणाऱ्या गोपनीयतेच्या उल्लंघनाची विस्तृत चर्चा आपण या लेखमालेत पुढे करूच; पण यानिमित्ताने या विषयाचे गांभीर्य व्यापक स्तरावर जाणवू लागलेय हेही नसे थोडके!

आज स्मार्टफोन हे आंतरजालावरील (इंटरनेट) विविध सेवांचा विनियोग करण्याचे मुख्य माध्यम आहे. तुमच्या फोनवरील विविध अ‍ॅप्स, त्यातून होत असलेला तुमचा समाजमाध्यमांवरील वावर, विविध संस्थळांवर सभासद म्हणून केलेली नोंदणी या सर्वाचा एकदा विचार करा. डिजिटल व्यासपीठांवर तुमच्या खासगी माहितीची देवाणघेवाण तुम्ही किती जणांबरोबर करता? आंतरजालावर कोणत्या प्रकारच्या ‘पाऊलखुणा’ तुम्ही मागे सोडत असाल असे तुम्हाला वाटते? डिजिटल सेवांचे वापरकर्ते म्हणून नोंदणी करताना तुम्ही या सेवांची विदासुरक्षा व गोपनीयतेबद्दलची धोरणे (प्रायव्हसी पॉलिसीज्) किती वेळा वाचली आहेत? किती वेळा एक शब्दही न वाचता या धोरणांचा ‘आय अ‍ॅग्री’ हे बटन दाबून स्वीकार केलात?

विदासुरक्षा व गोपनीयतेबद्दल अशा प्रकारचे प्रश्न पडण्यास गेल्या दशकभरात प्रामुख्याने सुरुवात झाली. पण माहितीच्या गोपनीयतेची व खासगीपणाच्या अधिकाराची जाणीव मानवाला काही एकविसाव्या शतकात झाली नाहीये. त्या दृष्टीने या संकल्पना पूर्वापार चालत आल्या आहेत.

मानववंशशास्त्रज्ञांच्या मते, ‘खासगीपणा’ ही संकल्पना मानवांमध्ये झिरपण्यासाठी पुष्कळ काळ लोटला असावा. आदिमानवांत या जाणिवेचा पूर्णत: अभाव होता. याविषयी मानववंशशास्त्रज्ञ काही महत्त्वाच्या मुद्दय़ांकडे लक्ष वेधतात. एक म्हणजे, माकडांसकट कोणत्याही अन्य प्राणिमात्रांचे खासगी आयुष्य असे काही नसतेच. बरेचसे प्राणी हे मोठय़ा कळपांत एकत्र राहतात व सर्व प्रकारच्या शारीरिक क्रिया सर्वादेखत उघडय़ावरच करतात. एकत्र राहण्याचा कळपांतील प्रत्येक प्राण्याला अन्नासाठी व शिकारी प्राण्यांपासून स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी पुष्कळच उपयोग होतो.

आदिमानवाचे जीवनदेखील या प्राण्यांपेक्षा फारसे वेगळे नव्हते. मोठमोठय़ा टोळ्या करून एकत्र राहणे, तरुण व मध्यमवयीन पुरुषांनी शिकार करणे व जमातीमधील इतर कमजोर सदस्यांना (बायका, मुले, वडीलधारे, इत्यादी) मुख्यत: वन्य प्राण्यांपासून सुरक्षित ठेवणे, अन्नाच्या शोधार्थ नवनव्या ठिकाणी आपल्या जमातीसह भटकत राहणे अशा प्रकारची त्याची जीवनशैली होती, जी इतर वन्यप्राण्यांच्या जीवनशैलीशी बरीचशी मिळतीजुळती होती. पुढे शेतीच्या शोधानंतर मानवाचे शिकारीसाठी भटकणे जरी बऱ्याच प्रमाणात कमी झाले व त्याने जमातीच्या सर्व सदस्यांसह एका ठिकाणी स्थिरावण्यास सुरुवात केली, तरीही मानवी प्रगतीच्या या टप्प्यावरही खासगीपणाची जाणीव मानवाला झाली नव्हती असे मानायला जागा आहे.

मानववंशशास्त्रज्ञांनी आफ्रिका, आशिया आणि दक्षिण अमेरिका खंडातील कुंग, सेमाइ, मेहिनाकु अशा काही आदिवासी जमातींचा अभ्यास केला. या जमाती अजूनही अश्मयुगीन जीवन जगत आहेत. मानवी प्रगतीचा वासवारा त्यांना आजही शिवलेला नाही. त्यांच्यासह काही काळ व्यतीत केल्यानंतर मानववंशशास्त्रज्ञांना असे आढळले की, या सर्व जमातींनी आजही त्यांची सामाजिक रचना अशा प्रकारे केली आहे की, तेथे व्यक्तिगत खासगीपणाला प्रोत्साहन मिळण्याऐवजी त्याचे खच्चीकरणच होईल. त्यांनी बांधलेली झोपडीवजा घरे ही छोटी व एकमेकांच्या इतकी जवळ बांधलेली होती, की त्यांचा उपयोग कोणी वास्तव्यासाठी किंवा एकांत मिळवण्यासाठी करणे अशक्य होते. या राहुटय़ांचा उपयोग हे आदिवासी केवळ सामान सुरक्षित ठेवण्यासाठी करत होते. आदिवासींचे एकत्र काम करणे, जेवणासाठी सर्वाकरिता एकच कालवण तयार करणे, त्याचा सर्वानी एकत्रच आस्वाद घेणे आणि सर्वासमवेतच उघडय़ावर झोपणे, अशा समतावादी जीवनशैलीत एकांतवास, खासगीपणा, गुप्तता अशा प्रकारच्या संकल्पनांना कसलाही थारा नव्हता. चव्हाटय़ावर मांडलेले प्रत्येकाचे खासगी जीवन व वैयक्तिक माहितीची खुली देवाणघेवाण या तत्त्वांमध्ये गोपनीयतेला कोणतेही स्थान नव्हते.

बऱ्याच मानववंशशास्त्रज्ञांचे हे मत आहे की, मानवाने दगड-मातीपासून पक्क्या भिंती बांधण्याचे तंत्रज्ञान विकसित केले, त्यानंतरच्या कालखंडात खासगीपणाची जाणीव त्याच्यात विकसित होत गेली असावी. खरे सांगायचे तर घरासाठी भिंती बांधण्याची निकड माणसाला सुरुवातीला जाणवलीच नव्हती. त्याने सर्वप्रथम जमातीचे रक्षण करण्यासाठी आपल्या वस्तीभोवती भिंती उभारल्या. जगातील जवळपास सर्व प्राचीन नगरांभोवती अभेद्य तटबंदी बांधल्या गेल्याचे पुरावे मिळाले आहेत.

कदाचित हेच तंत्रज्ञान मानवाने पुढे स्वत:साठी पक्की घरे बांधण्यासाठी वापरले असावे. मजबूत दगडी भिंतींच्या आत मानवाला प्रथमच त्याचे व्यक्तिमत्त्व गवसले असेल. त्याच्या अस्तित्वाची नव्याने ओळख झाली असेल. हे व्यक्तिमत्त्व, अस्तित्व केवळ त्याचे स्वत:चे होते, त्यात कोणत्याही बाहेरील व्यक्तीला थेट प्रवेश नव्हता. या लौकिकार्थाने बंदिस्त जगात माणूस भावनिकरीत्या मुक्त होता. त्याच्यावर कोणाची पाळत नव्हती. तो त्याचे विचार स्वतंत्रपणे, कसल्याही दडपणाशिवाय मांडू शकत होता. खासगीपणा जपण्याचे फायदे हळूहळू त्याला जाणवू लागले होते.

आता माणसाची दोन विभिन्न व्यक्तिमत्त्वे तयार होण्यास सुरुवात झाली होती. एक जगाची रीत पाळणारे सार्वजनिक, तर दुसरे फक्त जवळच्या व्यक्तींसमोर खुलणारे खासगी व्यक्तिमत्त्व! असे दोन वेगवेगळे मुखवटे परिस्थितीनुसार चढवणे त्याच्या अंगवळणी पडू लागले होते. पुढे पुढे तर एकाच माणसाची ही दोन व्यक्तिमत्त्वे इतकी वेगवेगळी होत गेली असतील, की या दोन भिन्न व्यक्ती तर नव्हेत असा प्रश्न पडावा. थोडक्यात, मानवी संस्कृतीत गोपनीयता (प्रायव्हसी) जपण्याची संकल्पना झिरपण्यास सुरुवात झाली होती.

मानवाला इतर प्राणिमात्रांसमोर विशेष ठरवणाऱ्या ज्या अनेक गोष्टी आहेत, त्यातली एक आहे- त्याला असणारी ही खासगीपणाची जाणीव! यामुळे माणूस कोणाच्याही दबावाखाली न येता स्वत:लाच प्रश्न विचारू लागला, त्याची उत्तरे शोधण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करू लागला, त्यात होणाऱ्या चुकांतून बोध घेऊ लागला. त्यामुळे माणसाची सर्जनशीलता वाढण्यास मदत झालीच, पण त्याचबरोबर मानवी समाजाची कलात्मक, तात्त्विक, सांस्कृतिक व वैज्ञानिक भरभराट होण्यास पुष्कळ हातभार लागला.

मानवी जीवनातले खासगीपणाचे महत्त्व अशा तऱ्हेने वाढत असताना, दुसऱ्या बाजूला मात्र याच खासगीपणाच्या अवकाशाचे आकुंचन करण्याचे प्रयत्नही वाढीस लागत होते. युरोपमधल्या औद्योगिक क्रांतीच्या उत्तरार्धात माहितीचे वहन व ज्ञानाचा प्रसार जलदगतीने करणारी नवनवीन साधने (छापखाने, कॅमेरा, तारयंत्र, इत्यादी) वाढू लागली, तशी माहितीच्या गोपनीयतेच्या तडजोडीची व पर्यायाने माणसाचे खासगी आयुष्य चव्हाटय़ावर आणणारी प्रकरणे जोमाने वाढत होती.

नव्या तंत्रज्ञानाच्या दुरुपयोगाने होणारे खासगीपणाचे उल्लंघन रोखण्याकरिता अस्तित्वात असलेले कायदे मात्र अगदीच अपुरे पडत होते. अठराव्या शतकाच्या मध्यापर्यंत व्यक्तीच्या खासगीपणाच्या अवकाशाची जपणूक करण्यासाठी कायदेशीर पाठबळ जवळपास नव्हतेच. याच शतकात इंग्लंडमध्ये लढल्या गेलेल्या दोन भिन्न न्यायालयीन लढायांमध्ये पहिल्यांदाच हे मुद्दे ऐरणीवर आले व न्यायालयाला या विषयासंदर्भात काहीएक ठोस भूमिका घेणे भाग पडले. माहितीची सुरक्षा, गोपनीयता, खासगीपणाचा अधिकार या विषयांचा ऊहापोह करण्यासाठी प्रथमच एक अधिकृत व्यासपीठ उपलब्ध होत होते. सामाजिक स्तरावर या संकल्पना प्रगल्भ होत असल्याची ही नांदी होती, त्याविषयी पुढील लेखात पाहू.

लेखक माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील ओपन सोर्स, विदासुरक्षा व गोपनीयता तसेच डिजिटल परिवर्तन या विषयांचे अभ्यासक आहेत.

amrutaunshu@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 18, 2021 3:49 am

Web Title: right to privacy data security whatsapp updated its privacy policy zws 70
Just Now!
X