बुधवारी (२३ ऑगस्ट) चांद्रयान ३चं चंद्रावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग झालं आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान पाठवणारा भारत हा पहिला देश ठरला आहे. इस्त्रोच्या या यशाचं सर्वत्र कौतुक होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील नेहरू सायन्स सेंटरमधून हा ऐतिहासिक क्षण अनुभवला. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना वैज्ञानिकांचं कौतुक केलं. तसंच माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे देखील त्यांनी आभार मानले. नेहरूंनी त्याकाळी देशातल्या विज्ञानावर लक्ष केंद्रित केलं त्या प्रयत्नांचं आज चीज झालं, असं शरद पवार म्हणाले.