भाजपचे अध्यक्ष अमित शहा दोन दिवस मुंबईत तळ ठोकून होते व त्यांनी प्रदेश पदाधिकाऱ्यांची चांगलीच झाडाझडती घेतली. मरगळ टाकून कामाला लागण्याचे आदेश शहा यांनी दिले.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने गांभीर्याने घेतली असून, शिवसेनेशी युती तुटल्याने आता अधिक मेहनत पक्षाला करावी लागणार आहे. वेळ कमी असल्याने वेगाने व नियोजनबद्धपणे प्रचार मोहीम राबवावी लागेल, अशी सूचना त्यांनी केली आहे. शहा यांनी शनिवारी दादर येथील मुंबई भाजप कार्यालयात, तर रविवारी नरिमन पॉइंट येथील प्रदेश कार्यालयात बसून निवडणूक तयारीचा आढावा घेतला. काही बाबींमध्ये नीट नियोजन नाही, पुरेशी तयारी नाही, त्याबद्दल त्यांनी संबंधित पदाधिकाऱ्यांना फैलावर घेतले व वेगाने कामाला लागण्याच्या सूचना दिल्या. तसेच पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली.
भाजपच्या दोन दिवसांत तीनशे सभा
विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराचा धमाका उडविण्यासाठी मुलुखमदान मोहीम भाजपने आखली असून ३० सप्टेंबर व १ ऑक्टोबर या दोन दिवसांत राज्यात ३०० हून अधिक सभा होणार आहेत. अनेक केंद्रीय मंत्री, पक्षाचे वरिष्ठ नेते आणि प्रदेश पातळीवरील ५३ नेते या रणधुमाळीत उतरले आहेत. भाजपच्या वॉर रूमच्या संयोजकांनी पंतप्रधान नरेद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासह केंद्रीय नेते, मंत्री व अन्य नेत्यांच्या सभांचे नियोजन केले आहे. वातावरण निर्मिती करण्यासाठी सभांचा धडाका लावण्यात आलेला आहे. केंद्रातील नेते यामध्ये मार्गदर्शन करतील
शिवसेनेवर टीका नाही-माथूर
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले असले तरी त्यांना प्रत्युत्तर द्यायचे नाही अशी भाजपची भूमिका असल्याचे प्रदेश प्रभारी ओम माथूर यांनी सांगितले. भाजपचा पहिल्या क्रमांकाचा शत्रू काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच आहे. त्यांचा पराभव करण्याची रणनीती आहे. दरम्यान, मुंबईतील काँग्रेस नेते वीरेंद्र बक्षी, राजा मिराशी व मनसे नगरसेवक परमेश्वर कदम यांनी अमित शहा यांच्या उपस्थितीत रविवारी भाजपमध्ये प्रवेश केला.