युती तुटल्यानंतर प्रथमच वेगवेगळे लढत असल्याने शिवसेना व भाजप या पक्षांच्या नेत्यांच्या एकमेकांवर कुरघोडी सुरू झाल्या आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही राज्यातील प्रचारसभांमध्ये शिवसेनेवर टीकास्त्र सोडतील, अशी भाजप कार्यकर्त्यांना आशा होती. मात्र मोदींनी शिवसेनेबाबत मौन बाळगले. ‘‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अनुपस्थित महाराष्ट्रात प्रथमच निवडणुका होत आहेत. बाळासाहेबांवर असलेली श्रद्धा व आदर यामुळे शिवसेनेवर मी टीका करणार नाही,’’ अशी चतुर खेळी करीत मोदी यांनी शिवसेनेवरच कुरघोडी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सध्या राज्यात प्रचार मोहीम सुरू असून, रविवारी सांगली जिल्ह्यातील तासगाव येथे त्यांची सभा झाली. या सभेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. छत्रपती शिवाजी महाराज यांनी अवलंबलेल्या जलनीतीचा वापर पवार यांनी केला नाही. तो जर केला असता तर महाराष्ट्र सिंचन क्षेत्रामध्ये मागासलेला राहिला नसता, असे मोदी म्हणाले. मुख्यमंत्री आणि कृषिमंत्री म्हणून राज्यातील शेतकरी व सर्वसामान्यांच्या समस्या सोडविण्यात ते अपयशी ठरले, असा टोलाही मोदींनी लगावला.
नर्मदा प्रकल्पाला काँग्रेसचा विरोध
नर्मदा प्रकल्पाला विरोध करण्याचे धोरण तत्कालीन कांॅग्रेसच्या यूपीए सरकारने राबविले. यामध्ये महाराष्ट्राचे नुकसान झाले, कारण या प्रकल्पातून तयार होणारी ४०० कोटींची वीज महाराष्ट्राला देण्यात येणार होती. कारगील युद्धात वीरमरण आलेल्या सनिकांची घरे बळकावण्याचे पाप या भ्रष्टाचारी लोकांनी केले असून जनतेने आता या लोकांना थारा देऊ नये.
आमच्या शिवभक्तीला आव्हान नको
शरद पवार हे नेहमी शिवाजी महाराजांचे नाव घेऊन राजकारण करत आहेत. मात्र त्यांच्या बारामतीमधील पुतळ्यापेक्षा मोठा पुतळा आम्ही सुरत येथे उभारला आहे. मुंबई विमानतळ आणि रेल्वे स्थानकाला शिवरायांचे नाव देण्याचा वाजपेयी सरकारचा निर्णय होता. त्यामुळे आमच्या शिवभक्तीला आव्हान देऊ नका. गुजरात हा १९६०च्या विभाजनापूर्वी  महाराष्ट्राचा भाग होता. त्यामुळे गुजरात हा महाराष्ट्राचा लहान भाऊ आहे, हे आम्ही कधीही अमान्य केलेले नाही, असे मोदी म्हणाले.
प्रचाराच्या तोफा
नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान झाले तरी ते अजूनही गुजरातचे मुख्यमंत्री असल्यासारखेच वागतात. भाजप नेते गोपीनाथ मुंडे आज असते तर मला महाराष्ट्रात यावे लागले नसते, असे सांगून नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील भाजप नेत्यांची लायकी काढली आहे.
– राज ठाकरे, भांडुप येथील सभेत

शिवजयंतीला हप्तेवसुली करण्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फ डणवीस यांनी केला. मग २५ वर्षांच्या सोबतीत तुम्हीही हप्त्याचे वाटेकरी होता काय? एकदा ज्याला दैवत मानले, त्याच्या नावावर हप्तेवसुली करण्याचा कृतघ्नपणा आम्ही करणार नाही.
उद्धव ठाकरे, वध्र्यातील सभेत

मोदी सरकारने शेतीमालाच्या निर्यातीवर घातलेल्या बंदीमुळे महाराष्ट्रातील शेतकरी उद्ध्वस्त होण्याचा धोका उत्पन्न झाला आहे. मोदी गुजरातचे पंतप्रधान असल्यासारखे वागत आहेत. महाराष्ट्रामध्ये येणारे उद्योग आणि प्रकल्प मोदींमुळे गुजरातला पळविले जात आहेत.
शरद पवार, सांगलीतील सभेत