माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ‘आदर्श’ घोटाळा आणि राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यांबद्दल केलेल्या विधानांमुळे अस्वस्थता पसरलेली असतानाच पक्षाने या वादावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी याबाबत आपले स्पष्टीकरण यापूर्वीच दिले असल्याचे पक्षाच्या वतीने सांगण्यात येत आहे. या नेत्यांना कारागृहात टाकण्याची भाषा आपण कधीही केली नव्हती आणि त्यांनी तशा आशयाचे स्पष्टीकरण दिले आहे, असे पक्षाचे प्रवक्ते अभिषेक मनू सिंघवी यांनी म्हटले आहे; तथापि निवडणुकीचे मतदान होण्यापूर्वी चव्हाण यांनी अशा प्रकारची मुलाखत देणे अनावश्यक होते, असे पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याने म्हटले आहे.
‘आदर्श’प्रकरणी आपण विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे आणि अशोक चव्हाण या माजी मुख्यमंत्र्यांविरुद्ध कारवाई केली असती तर पक्ष फुटला असता, असे विधान पृथ्वीराज चव्हाण यांनी केल्याचे एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. या माजी मुख्यमंत्र्यांना आपण कारागृहात धाडले असते, तर पक्षाला त्याचा फटका बसला असता, पक्ष फुटला असता, असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटल्याचे मुलाखतीत म्हटले आहे.