पाकिस्तानकडून मोठय़ा प्रमाणात गोळीबार होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचारात व्यस्त असून, गोळीबारबद्दल एक शब्दही बोलत नाहीत. संपुआ सरकारच्या काळात सीमेवर गोळीबाराच्या घटनांना दिल्लीला जबाबदार धरणारे पंतप्रधान मोदी पाकिस्तानकडून सीमेवर होत असलेल्या गोळीबारात अनेक नागरिक मारले जात असताना गप्प का बसले आहेत? असा सवाल काँग्रेसने केला आहे.
सीमेपलिकडून होत असलेला गोळीबार रोखण्यात रालोआ सरकारची नीती अपयशी ठरली आहे काय? असा सवालही माजी केंद्रीय मंत्री व वरिष्ठ काँग्रेस नेते अजय माकन यांनी केला. संरक्षण मंत्री अरुण जेटली आणि परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराजदेखील या मुद्दय़ावर मूग गिळून बसले आहेत. पंतप्रधान  मोदी यांनी लष्कराची उच्चस्तरीय बैठक बोलवायला हवी. शिवाय प्रमुख विरोधी पक्षांशी त्यांनी चर्चा केली पाहिजे, असेही ते म्हणाले.