मुख्यमंत्र्यांचे ‘वर्षां’ निवासस्थान नवीन मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी सज्ज होत असून त्यांचा मुक्काम पुढील आठवडय़ात तेथे हालविला जाण्याची शक्यता आहे. नूतनीकरणावर फार खर्च करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फारसे अनुकूल नाहीत. त्यामुळे सरकारच्या काटकसरीचे धोरण जपण्यासाठी ज्या सुविधा उपलब्ध आहेत, त्या तशाच ठेवून ‘वर्षां’ निवासस्थानी मुक्काम हालविण्याचा फडणवीस यांचा विचार आहे.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दोन दिवसांपूर्वी निवासस्थान सोडल्यानंतर आता साफसफाई व डागडुजीचे काम सुरु आहे. ते दोन दिवसांत पूर्ण झाल्यावर मुख्यमंत्री फडणवीस हे कुटुंबियांसमवेत मंगळवारी तेथे भेट देऊन पाहणी करतील. त्यांना ज्या बाबींमध्ये बदल हवा आहे, नवीन रंग द्यायचा आहे, दुरुस्तीची कामे व नूतनीकरण करायचे आहे, ते पाहून लवकरात लवकर ती कामे पार पाडली जातील. त्यामुळे सुयोग्य मुहूर्त पाहून पुढील आठ-दहा दिवसांत नवीन मुख्यमंत्री वर्षां निवासस्थानी दाखल होतील, असे सूत्रांनी सांगितले.