निवडणुकीत दारुण पराभवाला सामोरे जावे लागल्याने नाराज झालेल्या मनसेच्या नेते, पदाधिकाऱ्यांनी राजीनाम्याचा सपाटा लावला आहे. या पाश्र्वभूमीवर मनसेचे नेते वसंत गीते, प्रवीण दरेकर आणि माजी आमदार रमेश पाटील यांची डोंबिवलीतील शुक्रवारी काही मोजक्या पदाधिकाऱ्यां समवेत गुप्त बैठक झाली.
नाराज गटातील काही नेत्यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भेटण्यास नकार दिल्यामुळे अस्वस्थ नेत्यांनी ही बैठक घेतली असल्याचे बोलले जाते.  काही पदाधिकाऱ्यांचे राज ठाकरेंभोवती एक कोंडाळे तयार झाले आहे. हे कोंडाळे राज ठाकरे यांना चुकीची माहिती देऊन पुढे नेत आहे. तळागाळात काय चालले आहे हे कोंडाळे राज यांच्यापर्यंत पोहचू देत नाही, अशी टीका या बैठकीत काही पदाधिकाऱ्यांनी केल्याचे बोलले जाते.  प्रवीण दरेकर यांनी ही बैठक झाल्याचे पत्रकारांना सांगितले. आपण या बैठकीला उपस्थित नसल्याचे स्पष्टीकरण रमेश पाटील यांनी दिले. या बैठकीत नक्की काय झाले याबाबत कोणीही उघडपणे बोलण्यास तयार नाही. मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांनी सांगितले, कल्याण डोंबिवलीतील सर्व मनसे कार्यकर्ते, पदाधिकारी राज ठाकरे यांच्यासोबत आहोत.