भाजपचे नेते ‘काँग्रेसमुक्त’ भारताचा नारा देत असले तरी प्रत्यक्षात त्यांना स्वत:च्या क्षमतेवर विश्वास नसल्यामुळे रोजच्या रोज काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश देण्याचे काम करत आहेत. सेना-भाजप हे दोन्ही पक्ष काँग्रेसवर टीका करीत असले तरी प्रत्यक्षात त्यांचेच काँग्रेसीकरण सुरु असल्याचा  टोला मनसेच्या नेत्यांनी लगावला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना सेना-भाजपच्या पालखीत बसवून ‘अच्छे दिन’ कसे अणणार असा रोकडा सवाल मनसेचे आमदार प्रवीण दरेकर यांनी केला.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीतच गुरुवारी सत्तेसाठी आसुसलेल्या भाजपच्या नव्या बाटलीत काँग्रेस नेत्यांची जुनी दारू भरण्यात आल्याची टीका मनसे आमदार नितीन सरदेसाई यांनी केली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असोत की भाजपचे अमित शहा, हे दोन्ही नेते एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस व शरद पवार यांच्यावर जोरदार टीका करतात आणि दुसरीकडे त्यांच्याच पक्षाच्या मंत्र्यांना व नेत्यांना सेना-भाजपमध्ये पायघडय़ा घालून घेतले जात आहे. उद्या याच काँग्रेस-राष्ट्रवादीमधून आलेल्यांना विधानसभेची उमेदवारी दिली जाईल आणि सेना-भाजपच्या कार्यकर्त्यांना त्यांची पालखी उचलावी लागेल, असा टोला आमदार प्रवीण दरेकर यांनी लगावला. उत्तर मुंबईत ज्या प्रकाश सुर्वे यांनी शिवसेनेशी कायम उभा दावा केला होता त्यांनाच आता शिवसेनेत घेऊन उमेदवारी देण्याचे घाटत आहे. या दोन्ही पक्षात निष्ठावंतांना केवळ पालखीचे भोई म्हणूनच काम करावे लागणार आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीने गेल्या पंधरा वर्षांत लाखो करोडोंचे घोटाळे केल्याचे उच्चारवाने सेना-भाजपचे नेते सांगत आहेत आणि त्याच पक्षामध्ये अनेक वर्षे मंत्रिपदे उपभोगलेल्यांना भाजपच्या पालखीत बसवत आहेत. सेना-भाजपचे काँग्रेसीकरण करून ‘अच्छे दिन’ असे येणार असा सवाल प्रवीण दरेकर यांनी केला.
प्रत्यक्षात या दोन्ही पक्षांना स्वत:वर विश्नास नसल्यामुळेच डझनावारी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेते व मंत्र्यांना दररोज प्रवेश देण्याचे काम सुरु आहे. उद्या याच मंडळीना उमेदवारी मिळून राज्याच्या मंत्रिमंडळात दिसतील तेव्हा सेना-भाजपच्या कार्यकर्त्यां आपल्याच पक्षाचे काँग्रेसीकरण झाल्याचे दिसून येईल. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत अशा माजी मंत्र्यांना अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये देण्यात आलेला प्रवेश ही अच्छाईकडे भाजपची वाटचाल आहे का  हे जनता निवडणुकीत दाखवेल, असे सरदेसाई म्हणाले.