काँग्रेसचा विदर्भात ज्याप्रमाणे प्रचार सुरू आहे, त्यावरून या पक्षाने लोकसभेतील दारुण पराभवातून काहीच धडा घेतल्याचे दिसून येत नाही. एकीकडे भाजपने पंतप्रधान मोदी आणि इतर केंद्रीय मंत्र्यांना राज्यातील निवडणुकीच्या प्रचारात उतरविलेले असताना अद्याप काँग्रेसच्या कोणत्याही स्टार प्रचारकांनी सभा घेतलेली नाही. या पक्षाच्या ज्या काही सभा झाल्या त्याही फार गाजल्याही नाहीत. यामागे अंतर्गत गटबाजीचे कारण सांगितले जात आहे.  
पृथ्वीराज चव्हाण विधानसभा निवडणुकीसाठी नागपुरात आले खरे; परंतु एखादे सिक्रेट मिशनप्रमाणे शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्या दौऱ्याची कल्पना स्थानिक नेत्यांना देण्यात आलेली नव्हती. माजी मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात जिल्ह्य़ातील सभांविषयी गोपनीयता बागळून काँग्रेसने काय साधले, याचीच चर्चा सुरू आहे. चव्हाण मुंबईहून थेट नागपुरातील जिल्ह्य़ातील पारशिवनी येथील प्रचारसभेला गेले. रामटेक मतदारसंघात काँग्रेसचे सुबोध मोहिते रिंगणात आहेत. तेथून ते माजी आमदार पुत्र अ‍ॅड. अभिजित वंजारी यांच्या प्रचारासाठी नागपुरात आले. त्यांनी पूर्व नागपुरातील पारडी येथे सभा घेतली आणि मुंबईला रवाना झाले.
काँग्रेसचे नागपूर शहराध्यक्ष विकास ठाकरे पश्चिम नागपुरातून निवडणूक लढवीत आहेत. याशिवाय, शहरात आणि नागपूर ग्रामीणमध्ये तीन माजी मंत्री निवडणूक मैदानात आहेत. त्यामुळे माजी मुख्यमंत्री म्हणून चव्हाण त्यांच्या मतदारसंघात प्रचाराला जाणे अपेक्षित होते; परंतु काँग्रेसमधील गटबाजीमुळे तसे घडले नाही. लोकसभेत सपाटून मार खाल्ल्याने परस्परांतील हेव्यादाव्यांना तिलांजली देऊन काँग्रेसकडून नव्या उमेदीने या निवडणुकीत मतदारांना साद घातली जाईल, असे राजकीय पंडितांना वाटत होते; परंतु काँग्रेसच्या कार्यशैलीत आणि देहबोलीत तसूभरही फरक पडल्याचे कुठेच जाणवत नाही. माजी मुख्यमंत्र्यांचा विदर्भ दौरा असो वा अन्य नेत्यांचा, देवडिया काँग्रेस भवन किंवा काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना त्याची खबरबात नसणे आणि प्रचाराची जबाबदारी त्या त्या मतदारसंघातील उमेदवारावर सोपविणे, या साऱ्या प्रकारातून काँग्रेसमधील सांघिक भावनेला पडलेले मोठे भगदाड अद्याप बुजण्याच्याही प्रक्रियेत नसल्याचे दिसून येते.
या संदर्भात नागपूरचे माजी खासदार विलास मुत्तेमवार यांना विचारले असता, ते म्हणाले, चव्हाण यांना विकास ठाकरे यांच्या मतदारसंघात सभा घेण्याची विनंती केली होती. जमल्यास सभेला येऊ, असे सांगितले होते; परंतु त्यांना मुंबईला  तातडीने जाणे आवश्यक होते. त्यामुळे त्यांनी पूर्व नागपुरात केवळ दहा मिनिटे सभा घेतली आणि मुंबईला रवाना झाले. प्रचारसभांचा कार्यक्रम पाठवा, पुन्हा नागपुरात प्रचाराला येईन, असे त्यांनी सांगितले आहे, असेही मुत्तेमवार म्हणाले.