News Flash

विदर्भात मतदानास पाऊस, नक्षलवाद्यांच्या हल्ल्याचे गालबोट

‘हुडहुड’च्या प्रभावामुळे अनेक ठिकाणी आलेला पाऊस, विजांचा कडकडाट, नक्षलवाद्यांनी हिंसक कारवाई करून लावलेले गालबोट, पैसे वाटपाच्या तक्रारी व मारामारीच्या तुरळक घटनांच्या पाश्र्वभूमीवर आज विदर्भात सरासरी

| October 16, 2014 03:20 am

‘हुडहुड’च्या प्रभावामुळे अनेक ठिकाणी आलेला पाऊस, विजांचा कडकडाट, नक्षलवाद्यांनी हिंसक कारवाई करून लावलेले गालबोट, पैसे वाटपाच्या तक्रारी व मारामारीच्या तुरळक घटनांच्या पाश्र्वभूमीवर आज विदर्भात सरासरी ६५ टक्के मतदान झाले. लोकसभेच्या वेळी मतदारांमध्ये असलेला उत्साह यावेळी मात्र दिसून आला नाही. नागपूर शहर, वर्धा, वाशिम या जिल्ह्यात आज विजांच्या कडकडाटासह पाऊस पडला. पारशिवनी तालुक्यात आवंढा गावातील मतदान केंद्रावर आज सकाळी वीज कोसळून बंदोबस्तावरील एका पोलिस शिपायाचा मृत्यू झाला. या घटनेत चार मतदारही जखमी झाले. वर्धा जिल्ह्यात वीज पडून दोन भाऊ ठार झाले. नागपुरात काही ठिकाणी भाजप व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये मारामारी झाली. बल्लारपुरात भाजपच्या पदाधिकाऱ्याला मतदारांना पैसे वाटताना अटक करण्यात आली. गडचिरोली जिल्ह्यात चामोर्शीजवळ मतदान केंद्रावर नक्षलवाद्यांनी गोळीबार केल्याने पोलिस दलाचा एक जवान जखमी झाला, तर ताडपल्ली गावातही नक्षल्यांनी गोळीबार केला.
उत्तर महाराष्ट्रात मतदान शांततेत
*मालेगावमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी तसेच ‘एमआयएम’च्या कार्यकर्त्यांमध्ये वादविवाद, पोलिसांचा सौम्य लाठीमार
*धुळे शहर मतदारसंघात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून मतदानाच्या आदल्या रात्री ८० हजारांची तसेच पेट्रोलपंप चालकाकडून सहा लाखाची रोकड जप्त
*विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, राष्ट्रवादीचे छगन भुजबळ, माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित, तुरुंगातून निवडणूक लढविणारे माजी मंत्री सुरेश जैन व गुलाबराव देवकर या दिग्गजांच्या निकालाकडे लक्ष
*अनेक ठिकाणी यंत्रातील बिघाडामुळे मतदारांचा खोळंबा
नाशिक मध्य, नाशिक पश्चिम आणि नाशिक पूर्व या मतदारसंघात प्रथमच ‘व्हीव्ही पॅट’ यंत्रणेचा प्रायोगिक तत्वावर वापर
 मराठवाडय़ात ठिकठिकाणी पैसेवाटपाच्या तक्रारी
मराठवाडय़ातील ४६ मतदारसंघांत काही किरकोळ प्रकार वगळता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. मंगळवारी रात्रीपासून पैसे वाटल्याच्या तक्रारी अनेक मतदारसंघांत होत्या. उस्मानाबाद मतदारसंघातील कळंब तालुक्यात एका केंद्रासमोर उघडपणे पैसे वाटल्याचा प्रकार समोर आला. नांदेडमध्येही पैसेवाटपावर वाद झाल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलेल्या हल्ल्यात दोन शिवसैनिक जखमी झाले. औरंगाबाद पश्चिम मतदारसंघात मंगळवारी रात्री शिवसेनेचे ३ कार्यकर्ते पैसेवाटप करीत असल्याची तक्रार करण्यात आली. त्यांच्या मोटारीतून ५५ हजार रुपये जप्त करण्यात आले. या वेळी तिघांना अटक करण्यात आली. सायंकाळी ‘एमआयएम’चे उमेदवार इम्तियाज जलील यांच्या गाडीवर दगडफेक करण्याचा किरकोळ प्रकार वगळता शहरातील तीनही मतदारसंघांत शांततेत मतदान झाले. पाथरी येथे काँग्रेस, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले. हिंगोली जिल्ह्य़ातही मंगळवारी रात्री नारायणनगर परिसरात प्रलोभन दाखविण्याच्या आरोपावरून तिघांना अटक झाली. त्यांच्याकडून १२ हजार ५४० रुपये जप्त करण्यात आले. अंबड तालुक्यातील देशगव्हाण येथे रस्ता व गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळाली नसल्याने ९४६ मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकला.  
कोकणातही समाधानकारक  मतदान
रायगड जिल्ह्यात विधानसभेच्या सात मतदारसंघासाठीची मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली. जिल्ह्यात सरासरी ६९ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. १२ हजार १०५ अधिकारी आणि कर्मचारी या प्रक्रियेत सहभागी झाले. महाड येथे निवडणूक कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. योगेश भिसे (वय ३०) असे या कर्मचाऱ्याचे नाव असून तो पोलादपूर तहसील कार्यालयात  कार्यरत होता. गेल्या २० वर्षांत प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात शांततेत मतदान झाले. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार येथे ६२ टक्के मतदान झाले. सर्वत्र बहुरंगी लढती झालेल्या रत्नागिरी जिल्ह्य़ातील पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये मिळून सरासरी ६२ टक्के मतदान नोंदवण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 16, 2014 3:20 am

Web Title: rain and naxal hits vidarbha voting
टॅग : Naxal
Next Stories
1 विदर्भात सरासरी ६५ टक्के मतदान
2 उत्तर महाराष्ट्रात ६० टक्क्यांहून अधिक
3 नगर जिल्हय़ात थोरात, विखे, पाचपुते यांचे भवितव्य ‘यंत्रबंद’
Just Now!
X