राज्याचे मुख्यमंत्री म्हणजे दिल्लीहून आणलेलं बुजगावणं असल्याचं म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे(मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी काँग्रेसवर चौफेर टीकास्त्र सोडले. ते मंगळवारी अमरावतीतील दर्यापूर येथे जाहीर सभेत बोलत होते.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टेलिव्हिजनवर सुरू असलेल्या काँग्रेसच्या ‘महाराष्ट्र पहिला’ या जाहीरातीवरून राज यांनी मुख्यमंत्र्यांना धारेवर धरले. बेरोजगारी, भ्रष्टाचार, शेतकऱयांच्या आत्महत्या या गोष्टींमध्ये महाराष्ट्र पहिला असल्याची टीका राज यांनी यावेळी केली. इस्त्राईलच्या वाळवंटात शेती कशी केली जाते हे पाहण्यासाठी यांनी इस्त्राईलवारी केली पण, येथे महाराष्ट्राचा वाळवंट करुन ठेवलाय त्याचं काय? असा खोचक सवालही राज यांनी यावेळी उपस्थित केला.
सभेत पुन्हा एकदा राज यांनी आपल्या ‘ब्लू प्रिंट’ मधील मुद्द्यांवर भर देताना राज्यात सत्ता आल्यास सरकारी सुरक्षा एजन्सी उभारणार असल्याचे म्हटले. हाती सत्ता द्या राज्यातील सर्व तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणे, पोलीस भरतीच्या प्रक्रियेत बदल करणे आणि ज्याठिकाणी पिकतं त्याठिकाणीच कारखाने उभारणे या अशा आणि इतर सर्व विकासाच्या योजना माझ्याकडे तयार आहेत. फक्त माझ्या बाजूने एकदा कौल द्या असे आवाहनही राज यांनी उपस्थितांना केले.
राज्यात सध्या सुरु असलेल्या फुटाफुटीच्या राजकारणावरही राज यांनी भाष्य केले. कोणीही कधीही उठून कुठल्याही पक्षात जातोय, कुठूनही उमेदवारी दाखल करतोय. सत्ताधाऱयांनी राजकारणाचा वैश्याबाजार मांडून ठेवला असल्याची जळजळीत टीका राज यांनी केली.