महायुती कायम राहणार की तुटणार, याची उत्कंठा तासागणिक वाढत चालली असून, जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नसल्याचे भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांनी गुरुवारी दुपारी मुंबईमध्ये स्पष्ट केले. त्याचवेळी शिवसेनेचे नेते दिवाकर रावते यांनी भाजपच्या नेत्यांच्या वागणुकीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना, भाजपमध्ये गेल्या २५ वर्षांपासून असलेली युती तुटण्याची शक्यता अधिक आहे.
जागावाटपाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी भाजप आणि शिवसेनेचे नेते गुरुवारी सकाळी भाजपचे महाराष्ट्राचे प्रभारी ओम माथूर यांच्या निवासस्थानी जमले. या चर्चेमध्ये केवळ एका जागेवर एकमत होत नव्हते, असे शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी सांगितले. शिवसेनेने त्यांच्या जागांपैकी आणखी तीन जागा मित्रपक्षांसाठी सोडण्याची तयारी दर्शविली होती. त्यानंतरही केवळ एका जागेवर वाद असल्याने आम्ही उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून बोलून मार्ग काढण्याचा प्रयत्न करीत होतो. मात्र, आमचे प्रयत्न सुरू असताना रुडी यांनी दिल्लीतून युती तुटण्यासंदर्भात वक्तव्य केले, याबद्दल रावते यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. रुडी यांच्या वक्तव्यामुळे आणि राज्यातील भाजपच्या नेत्यांनी योग्य प्रतिसाद न दिल्यामुळे शिवसेना नेत्यांनी चर्चा थांबवून मातोश्रीवर जाण्याचा निर्णय घेतला.
शिवसेनेकडून येणाऱया प्रस्तावांमध्ये भाजप आणि मित्रपक्षांना सामावून घेण्याचा कोणताच विचार नसल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. शिवसेनेच्या प्रस्तावानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी पक्षाच्या कोअर समितीचे बैठक बोलावण्यात आली असून, त्यामध्ये पुढील निर्णय घेतला जाईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.