महायुतीमधून शिवसेनेला बाहेर काढणाऱ्यांचा पराभव करा, असे फर्मान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोडले असले, तरी भाजपच्या तीन बिनीच्या चेहऱ्यांनी आपापल्या मतदारसंघांचे गड मजबूत बांधले असल्याने, ठाकरे यांचे स्वप्न वास्तवात आणण्यासाठी शिवसैनिकांची दमछाक होणार आहे. शिवसेना-भाजप युती संपुष्टात आल्याची घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, एकनाथ खडसे आणि विनोद तावडे यांनी एकत्रितपणे एका पत्रकार परिषदेत केली होती. त्यामुळे हे तिघे नेते ‘फुटीचे शिल्पकार’ असल्याचा ठपका शिवसेनेने त्यांच्यावर ठेवला असून, ‘त्यांना पाडा’ असा उद्धव ठाकरे यांचा आदेश आहे.
युती ‘तोडणारे’तावडे बोरीवलीत सुरक्षित!
लोकसभा निवडणुकीत विक्रमी मताधिक्य मिळालेल्या उत्तर मुंबईतील बोरीवली हा भाजपचा सुरक्षित बालेकिल्ला मानला जातो. विनोद तावडे यांनी स्वतसाठी जाणीवपूर्वक या मतदारसंघाची निवड केली. या मतदारसंघात प्रतस्पिध्र्याचे आव्हानच तोकडे असल्याचे लोकसभेच्या निवडणुकीत स्पष्ट झाल्याने, विनोद तावडे निश्चिंत आहेत. भाजपचे गोपाळ शेट्टी यांनी आपल्या कामातून आणि जनसंपर्कातून मजबूत बांधलेला हा गड भेदणे शिवसेनेसाठी सोपे नाही. शेट्टी यांनी या मतदारसंघात केलेल्या उद्यानांच्या उभारणीमुळे अतिक्रमणाला खीळ तर बसलीच, पण पर्यावरणाच्या दृष्टीनेही हा परिसर सुरक्षित झाला आहे. शिवाय, मतदारसंघातील बहुसंख्य गुजराती मतदारांची भक्कम मतपेढी ही भाजपची जमेची बाजू आहे. तावडे यांच्या विरोधात शिवसेनेचे उत्तमप्रकाश अगरवाल आणि मनसेचे नयन कदम हे उमेदवार असल्याने, सेना-मनसेच्या मतविभागणीचा फायदा तावडे यांना मिळू शकतो, असे कार्यकर्त्यांना वाटते. राष्ट्रवादी व काँग्रेसदेखील स्वतंत्र लढत असल्यामुळे पक्षाच्या पारंपरिक मतांचे विभाजनही तावडे यांच्यासाठी लाभदायक ठरेल, असा दावा आहे. मुळात शिवसेनेला मनसेचे तर काँग्रेसला राष्ट्रवादी काँग्रेसचे आव्हान असल्याने, त्यातच पक्षांच्या कार्यकर्त्यांना शक्ती वेचावी  लागणार असल्याने, तावडे यांच्यासाठी निवडणूक अधिक सुरक्षित झाली आहे.
एकनाथ खडसेंसाठी विजय आव्हानात्मक 
फडणविसांचा पराभव हे निव्वळ दिवास्वप्न?