विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आता टिपेला पोहोचली आहे. तुंबळ प्रचारयुद्ध सुरु झाले आहे आणि एकमेकांच्या उखाळ्यापाखाळ्या काढणाऱ्या जाहिरातींचा शस्त्रासारखा वापर करण्यात येत आहे. ‘कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा’ या जाहिरातीने तर सोशल मिडियात धुमाकूळ घातला आहे. मात्र याच जहिरातीची लय पकडून रिपब्लिकन पक्षातील गटबाजी आणि सौदेबाजीच्या राजकारणामुळे अस्वस्थ झालेले आंबेडकरी कार्यकर्ते, ‘कुठे घेऊन गेलात रिपब्लिकन पक्ष’ अशी व्यथा मांडत आहेत.
भीमशक्ती नावाने ओळखल्या जाणाऱ्या रिपब्लिकन पक्षाची अनेक शकले झाली आहेत. परिणामी निवडणुकीत आंबेडकरी समाजाच्या मतांचेही उभेआडवे विभाजन होते. त्याचा फायदा काही प्रमाणात गटाच्या नेत्यांना होतो आणि ते ज्या पक्षाशी युती करतात, त्या पक्षांना होतो, परंतु रिपब्लिकन पक्षाची अस्मिता व अस्तित्व पार संपुष्टात आल्याची खंत कार्यकर्ते बोलून दाखवत आहेत.
आंबेडकरी चळवळीतील एक तरुण कार्यकर्ते सचिन मोहिते हे रामदास आठवले यांचे समर्थक व त्यांच्या गटाचे पदाघिकारी असले तरी, रिपब्लिकन राजकारणाला आलेल्या अवकळेबद्दल आपण व्यथित असल्याचे त्यांनी सांगितले. युती व आघाडी तुटल्यामुळे शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सारेच पक्ष स्वतंत्रपणे लढत आहेत. अशा वेळी सर्व रिपब्लिकन गटांनी एकत्र येऊन आपली ताकद दाखवायला हवी होती, असे त्यांचे मत आहे. १९९८ ला रिपब्लिकन ऐक्यात चार नेते लोकसभेवर निवडून गेले, ते वैभव पुन्हा रिपब्लिकन पक्षाला प्राप्त व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
आंबेडकरी चळवळीत गेली वीस वर्षे काम करणारे आणि आता रिपब्लिकन सेनेच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा संभाळणारे काशिनाथ निकाळजे यांनी सध्याची आंबेडकरी राजकारणाची अवस्था अस्वस्थ करायला लावणारी आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.  मुंबईतील काही तरुणांनी एकत्र येऊन फेसबूक आंबेडकराईट मुव्हमेंट (फॅम) या नावाने एक संघटना स्थापन केली आहे. हरिष निरभवणे व संतोष गायकवाड या संघटनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी सर्व रिपब्लिकन गट व बसप यांनी एकत्र यावे, यासाठी प्रयत्न केले. परंतु सत्तेच्या सौदेबाजीत मग्न झालेल्या नेत्यांनी त्यांना कसलाही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे हे तरुण कार्यकर्तेही निराश झाले आहेत.

गटा-तटाच्या राजकारणामुळे रिपब्लिकन पक्षाचे अस्तित्व संपल्यात जमा आहे. प्रस्थापित नेतृत्वाकडून फार काही अपेक्षा नाहीत, परंतु नवनेतृत्वाकडून रिपब्लिकन राजकारणाला  योग्य दिशा दिली जाईल.
-काशिनाथ निकाळजे, रिपब्लीकन सेनेते प्रदेशाध्यक्ष

रिपाइंच्या गटातटांमुळे चिंता आहे. सारे गटतट विसर्जित करुन एकच रिपब्लिकन पक्ष उभा करावा.
-काकासाहेब खंबाळकर,रिपाइं नेते