विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून कितीही दबाव आणला जात असला, तरी आघाडीचा निर्णय हा काँग्रेसच्या पद्धतीनुसारच होईल, अशा स्पष्ट शब्दात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादीच्या दबावापुढे झुकणार नसल्याचे सांगितले.
विधानसभा निवडणुकीसाठी आघाडी करण्याचे भाष्य दोन्ही पक्षांकडून केले जात असले तरी प्रत्यक्षात मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीने स्वतंत्रपणे प्रचारास सुरुवात केली आहे. शिवाय जागांच्या मुद्यावर दोन्ही पक्ष आपापल्या भूमिकेवर ठाम असल्याने आघाडी होणार की नाही याबाबत दोन्ही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. याबाबात आज मुख्यमंत्र्यांना छेडले असता, जागा वाटपाबाबत चर्चा सुरू आहे. आघाडी होईल, मात्र कोणी कितीही आणि कोणत्याही प्रकारे दबाव आणला तरी आघाडीचा निर्णय हा काँग्रेसच्या पद्धतीनुसारच होईल, असे सांगत चव्हाण यांनी राष्ट्रवादीस सबुरीचा सल्ला दिला. सध्या दोन्ही पक्षांकडून स्वतंत्र प्रचार सुरू असला तरी आघाडीनंतर एकत्र प्रचार आणि जाहीरनाम्याचा निर्णय होईल असेही त्यांनी सांगितले.