शरद पवार व अजित पवार यांच्या बारामती या बालेकिल्ल्यात पवारकन्या सुप्रिया सुळे यांचा लोकसभेला कसाबसा विजय झाला. बारामती, इंदापूर, भोर वगळता इतर तीन मतदारसंघांमध्ये सुळे पिछाडीवर होत्या. या धक्क्य़ातून सावरत असतानाच धनगर आरक्षणाच्या वादामुळे आघाडीमध्ये पुन्हा अस्वस्थता आहे. त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काँग्रेस नेते सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार संग्राम थोपटे यांच्यातील कुरघोडी सुरूच आहेत. दौंडमध्ये आमदारकीचे उमेदवार राहुल कुल राष्ट्रवादी सोडून गेले आहेत.. अशा घटनांच्या पाश्र्वभूमीवर पवारांच्या या जिल्ह्य़ात राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांसमोर धक्क्य़ातून सावरण्याचे आव्हान असेल.
राजकारणात काहीही गृहीत धरता येत नाही, हेच गेल्या लोकसभा निवडणुकीने दाखवून दिले. आतापर्यंत सहजी निवडून येणाऱ्या पवार कुटुंबीयांना लोकसभेसाठी झगडावे लागले. राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर ७० हजार मतांनी हरले, तरी तेच हिरो ठरले होते. त्यानंतर पुणे जिल्ह्य़ात राष्ट्रवादी व काँग्रेस यांच्यातील समन्वय वाढेल अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात मात्र अजित पवार आणि जिल्ह्य़ातील काँग्रेस नेत्यांमध्ये शह-काटशहाचेच राजकारण सुरू आहे. इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील यांना, तर भोरमध्ये संग्राम थोपटे यांना अडचणीत आणण्याच्या हालचाली सुरू आहेत. काँग्रेसकडूनही पुरंदर व इतरत्र स्वाभाविकपणे प्रतिक्रिया येत आहेत. निवडणुकीच्या तोंडावरच धनगर आरक्षणाचा मुद्दा उचलण्यात आला आहे. या पाश्र्वभूमीवर आघाडीचे नेते लोकसभेच्या धक्क्य़ातून किती सावरले आहेत, हे या निवडणुकीत पाहायला मिळेल.
बारामती
हा मतदारसंघ अजित पवार यांच्या पाठीशी राहतो. मात्र, महादेव जानकर यांनी पेटविलेला धनगर समाज आरक्षणाचा मुद्दा आणि बारामती तालुक्यातील २२ गावांच्या पिण्याचा पाण्याच्या मुद्दय़ामुळे लोकसभेला विरोधकांना चांगले मतदान झाले. आता अजित पवार मतदारांची नाराजी कसे दूर करणार हे पाहावे लागेल. लोकसभेच्या निवडणुकीत वादग्रस्त ठरलेल्या मासाळवाडी सहीत अनेक गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यात त्यांना यश आले. ते धनगर समाजाची मते कशी व किती वळवतील हाच मुद्दा आता महत्त्वाचा ठरेल.
इंदापूर
काँग्रेसचे मंत्री हर्षवर्धन पाटील यांना शह देण्यासाठी राष्ट्रवादी काँगेसकडून पुन्हा २००९ प्रमाणे बंडखोरी होण्याची शक्यता आहे. हे अर्थातच अजित पवार यांच्या इशाऱ्यावर असेल. संभाव्य उमेदवार म्हणून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व धनगर समाजातील नेते दत्तात्रय भरणे पुन्हा नशीब आजमावण्याच्या तयारीत आहेत. गेल्या निवडणुकीत भरणे यांना विविध स्थानिक नेत्यांनी भक्कम साथ दिली होती. आता ही मंडळी कोणता पवित्रा घेतात हे पाहावे लागेल. धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मुद्दयावरून हर्षवर्धन पाटील यांच्यावर शाई फेकण्याच्या प्रकारामुळे त्यांच्यामागे मराठा समाज एकवटण्याची चिन्हे आहेत. लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात सुप्रिया सुळे यांना २४ हजार मतांची आघाडी मिळाली होती.
दौंड
विद्यमान अपक्ष आमदार रमेश थोरात यांनी नुकताच राष्ट्रवादी काँगेसमध्ये प्रवेश केला, तर राष्ट्रवादीचे राहुल कुल यांनी पक्षाला रामराम ठोकला. आता पुन्हा थोरात व कुल यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे. गेल्या वेळी कुल हे राष्ट्रवादीचे उमेदवार असताना थोरात यांनी राष्ट्रवादीतून बंडखोरी केली होती. त्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ताकद दिल्याची चर्चा आहे. कुल इतर पक्षांकडून उमेदवारीबाबत चाचपणी करीत आहेत. अन्यथा ते अपक्ष लढण्याच्या तयारीत आहेत. लोकसभा निवडणुकीत महायुतीचे महादेव जानकर यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर येथूनच २५ हजारांचे मताधिक्य घेतले होते. त्यामुळे भाजपात आनंद आहे, मात्र रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले दौंडची जागा मागत आहेत.
भोर
माजी मंत्री अनंतराव थोपटे यांना मानणारा मतदारसंघ. गेल्या निवडणुकीत त्यांचे चिरंजीव संग्राम थोपटे यांनी भाजप-सेना युतीचे उमेदवार शरद ढमाले यांचा पराभव करून विजय मिळवला होता. विशेष म्हणजे त्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे मानसिंग धुमाळ यांनी बंडखोरी करूनही थोपटे आमदार झाले. गेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात आघाडीच्या सुप्रिया सुळे यांना मताधिक्य मिळाले होते. तरीही या वेळी थोपटे यांच्या विरोधात राष्ट्रवादीकडून बंडखोरी होण्याची शक्यता आहे. शिवसेनेकडून शरद ढमाले पुन्हा इच्छुक आहेत.
पुरंदर
पूर्वीपासून जनता दलाचे माजी मंत्री दादा जाधवराव यांचा प्रभाव असलेला मतदारसंघ. मात्र, गेल्या दोन निवडणुकांमध्ये ते बाजूला पडत गेले. २००४ साली राष्ट्रवादीचे अशोक टेकवडे आणि २००९ साली शिवसेनेचे विजय शिवतारे यांनी आमदारकी मिळवली. आता जाधवराव घराणे मागे पडले. शिवतारे हे पवार घराण्यावर टीका करत असल्याने आणि त्यांच्या आक्रमक शैलीमुळे सतत चर्चेत आहेत. राष्ट्रवादी  इच्छुकांची संख्या अधिक आहे. त्यामुळे बंडखोरी होण्याची शक्यता आहे. याशिवाय काँग्रेसचे संजय जगताप बंडखोरी करण्याच्या तयारीत आहेत. येथून मनसेचा उमेदवारही लढणार आहे.
खडकवासला
नव्याने निर्माण झालेला हा मतदारसंघ. त्यात मनसेचे रमेश वांजळे यांनी विजय मिळवला. त्यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी हर्षदा यांनी राष्ट्रवादीकडमून निवडणूक लढवली. मात्र, भाजपचे भीमराव तापकीर यांनी त्यांचा पराभव केला. मुळात राष्ट्रवादीचा मानला जाणारा हा मतदारसंघ. तिथे भाजपचा आमदार आणि लोकसभेलाही सुळे यांच्याविरोधात जानकर यांना जास्त मते मिळाली. त्यामुळे आता काय होणार याबाबत उत्सुकता आहे.
(तानाजी काळे, सुधीर जन्नू, प्रकाश खाडे यांच्याकडून मिळालेल्या मुद्दय़ांसह)

ubt shiv sena candidate chandrahar patil meet congress leaders in sangli
बंडखोरीवर कारवाई टाळत मविआ उमेदवाराला विजयी करण्याचे पटोलेंचे आवाहन
challenge to Sharad Pawar to remove Santosh Chaudharys displeasure in Raver
रावेरमध्ये संतोष चौधरी यांची नाराजी दूर करण्याचे शरद पवार यांच्यासमोर आव्हान
Rohit Pawars allegations against Eknath Khadse
रोहित पवार यांचा एकनाथ खडसे यांच्यावर आरोप, म्हणाले, ‘अटकेच्याच भितीने…’
hemant patil
भाजपहट्टापुढे शिंदेसेना हतबल; हिंगोली, यवतमाळचे उमेदवार बदलण्याची नामुष्की