रामटेक
विदर्भातील काँग्रेसचा हक्काचा मतदारसंघ म्हणून या मतदारसंघाकडे बघितले जात असे, पण मोदी लाटेत अनपेक्षितपणे शिवसेनेचे कृपाल तुमाने यांनी काँग्रेसचे सरचिटणीस व माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक यांचा पराभव करून आश्चर्याचा धक्का दिला. रामटेक, सावनेर, काटोल, कामठी, हिंगणा व उमरेड या सहा विधानसभा मतदारसंघांचा या मतदारसंघात समावेश होतो. नागपूर ग्रामीण म्हणूनही ओळखल्या जाणाऱ्या या मतदारसंघात शेतकरी व शेतमजूर मतदारांची संख्या अधिक आहे. लोकसभेप्रमाणेच विधानसभेतही नवमतदार आपला करिश्मा दाखवतील, अशी अपेक्षा भाजप व सेनेला आहे.  
रामटेक
शिवसेनेचे आमदार आशीष जयस्वाल यांनी पाच वर्षांपूर्वी काँग्रेसचे सुबोध मोहिते यांचा ३ हजार ३६१ मतांनी पराभव केला होता. या वेळी बाहेरचा उमेदवार नको, अशी भूमिका काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी घेतली असतानाही त्यांनाच उमेदवारी देण्यात आली. सेनेतर्फे जयस्वाल तर भाजपने मल्लिकार्जुन रेड्डी यांना रिंगणात उतरवले आहे.
काटोल
चार महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला तब्बल ३८ हजार ४४६ मतांची ‘लीड’ मिळाल्याने राष्ट्रवादीच्या पायाखालची वाळू सरकली आहे. राष्ट्रवादीचे अनिल देशमुख १९९५ पासून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. सेनेतर्फे राजू हरणे यांना उमेदवारी मिळाली आहे. शेतकरी कामगार पक्षही रिंगणात आहे.
हिंगणा
गेल्या निवडणुकीत केवळ ७०० मतांनी विजय मिळवणारे भाजपचे विजय घोडमारे यांच्याऐवजी समीर मेघे यांना उमेदवारी देण्यात आली, तर सेनेतर्फे माजी खासदार प्रकाश जाधव रिंगणात उतरले आहेत. राष्ट्रवादीतर्फे माजी मंत्री रमेश बंगही दंड ठोकून आहेत. या मतदारसंघात हिंगणा आणि बुटीबोरी ही दोन औद्योगिक क्षेत्रे आहेत.
सावनेर
गेल्या निवडणुकीत फक्त ३ हजार मतांनी निवडून आलेल्या सुनील केदार यांच्यासाठी या वेळची निवडणूक आव्हानदायी आहे. नागपूर जिल्हा सहकारी बँक बुडाल्याने त्यांच्या विरोधात सर्वच वर्ग नाराज आहे. भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांना संधी द्यावी, अशी मागणी असल्याने सोनबा मुसळे यांना उमेदवारी देण्यात आली.
कामठी
भाजपचे विद्यमान आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनाच याही वेळी उमेदवारी मिळाली आहे. काँग्रेसने ऊर्जा राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांना रिंगणात, तर सेनेने जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तापेश्वर वैद्य यांना उमेदवारी दिली आहे. भाजप-सेनेचे उमेदवार समोरासमोर ठाकल्याने बावनकुळे यांना धोका होऊ शकतो.
उमरेड
भाजपचे विद्यमान आमदार सुधीर पारवे यांना, तर सेनेने ज.म.अभ्यंकर यांना उमेदवारी दिली आहे. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचेही उमेदवार रिंगणात आहेत. लोकसभा निवडणुकीत येथे बसप उमेदवाराला २३,६९३ मते मिळाल्यामुळे  बसपचा उमेदवाराकडेही बरेच लक्ष असेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व विधानसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress fight for existence in ramtek constituency
First published on: 30-09-2014 at 03:51 IST