भाजप आणि शिवसेनेत जागावाटपावरून निर्माण झालेला तिढा कायम असला तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सोमवारी एक पाऊल मागे घेत पुन्हा एकदा चर्चा करण्याचा निर्णय घेतला आहे. आधीच्या सूत्रापेक्षा तीन-चार जागा वाढवून देण्याची काँग्रेसची तयारी असली तरी राष्ट्रवादी १३० पेक्षा कमी जागा स्वीकारण्यास तयार होणार नाही. परिणामी आघाडीचा चेंडू आता राष्ट्रवादीच्या कोर्टात असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीचे भवितव्य अधांतरी असतानाच काँग्रेसच्या वतीने तोडग्यासाठी पुढाकार घेण्यात आला. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि अहमद पटेल यांनी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्याशी संपर्क साधला. काँग्रेस नेत्यांनी चर्चेची तयारी दर्शविल्याने राष्ट्रवादीने आज कोणताही निर्णय घेण्याचे टाळले. उद्या सकाळी काँग्रेसकडून किती जागांचा प्रस्ताव सादर केला जातो यावरच पुढील निर्णय घेतला जाईल, असे पटेल यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादीबरोबर होणाऱ्या चर्चेच्या पाश्र्वभूमीवर रात्री काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक झाली. त्यात राष्ट्रवादीला जास्त जागा सोडण्यास विरोध करण्यात आला. काँग्रेस आघाडीसाठी आग्रही आहे. पण जागावाटपाचा तोडगा न मिटल्यास काँग्रेसपुढे अन्य पर्याय खुले असतील, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादीला किती जागा सोडणार ?
काँग्रेसचा १२४ जागांचा प्रस्ताव राष्ट्रवादीने फेटाळून लावला आहे. या पाश्र्वभूमीवर सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत आघाडीतील जागावाटपाच्या संदर्भात चर्चा झाली. काँग्रेस आणखी तीन ते चारपेक्षा जास्त जागा सोडण्यास तयार होणार नाही. राष्ट्रवादीने निम्म्या जागांची मागणी केली असली तरी वाटाघाटींमध्ये १३४ जागांवर दावा केला आहे. तसेच गेल्या वेळी काँग्रेसच्या वाटय़ाला आलेल्या आठ मतदारसंघांतील अपक्ष किंवा छोटय़ा पक्षांच्या आमदारांना कळपात आणले आहे. राष्ट्रवादीच्या वतीने १३० ते १३२ पेक्षा कमी जागा स्वीकारल्या जाणार नाहीत, अशी चिन्हे आहेत. यामुळे आघाडीचा तिढा सुटणे कठीण असल्याचे मानले जाते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राष्ट्रवादीचे लक्ष महायुतीकडे
काँग्रेसने सकारात्मक प्रतिसाद दिल्याने राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या नेत्यांच्या बैठकीत आघाडीबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. काँग्रेसकडून फार काही वाढीव जागा मिळणार नाही हा अंदाज राष्ट्रवादीने बांधला आहे. यातूनच प्रफुल्ल पटेल यांनी, गेली दहा वर्षे यूपीए सरकारमधील अनेक घटक पक्ष सोडून गेले तरी आम्ही शेवटपर्यंत बरोबर होतो याची आठवण काँग्रेसला करून दिली. राष्ट्रवादीच्या नेत्यांचे महायुतीच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे.

मराठीतील सर्व विधानसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress ncp once again decided to talk over seat sharing deadlock
First published on: 23-09-2014 at 02:49 IST