निवडणूक प्रचारात भाजप नेत्यावर अफजल खान, बिल्ली, सर्वात मोठे शत्रू अशा शेलक्या विशेषणांनी टीका करणाऱ्या शिवसेनेच्या अरेरावीला न जुमानण्याची सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फडणवीस यांना केली आहे. शपथविधी समारंभाच्या पूर्वसंध्येला एकटेच दिल्लीत दाखल झालेल्या फडणवीस यांनी अमित शहा यांच्यासह मोदी यांच्याशी सुमारे तीन तास महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर चर्चा केली. प्रारंभी शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण देण्यासाठी फडणवीस दिल्लीत दाखल झाल्याचे भाजप गोटातून सांगण्यात येत होते. प्रत्यक्षात शिवसेनेशी कोणतीही सलगी न दाखवण्यावर फडणवीस यांच्या दिल्ली भेटीत चर्चा झाली.
शिवसेनेने आपली ताठर भूमिका निकालानंतरही न सोडल्याने भाजपने राष्ट्रवादीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना बचावासाठी सत्ताधाऱ्यांशी जुळवून घेणे आवश्यक असल्याने भाजपला सेनेची कोंडी करण्याची नामी संधी चालून आली आहे. दिल्लीत दाखल झाल्यानंतर फडणवीस थेट गडकरी यांच्या निवासस्थानी दाखल झाले. तेथे उभय नेत्यांनी एकत्रित भोजन करून सुमारे तासभर चर्चा केली. तेथून अमित शहा यांच्या निवासस्थानी दोनेक तास चर्चा करून फडणवीस व शहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. विशेष म्हणजे मोदी, शहा व फडणवीस भेटीत गडकरी मात्र उपस्थित नव्हते. तीनही नेत्यांमधील चर्चेचा तपशील अद्याप गुलदस्त्यात असला तरी शिवसेनेला अजिबात महत्त्व न देण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. भाजपशी शिवसेनेचा अद्याप ‘सामना’ सुरू आहे. त्यामुळे सेनेविरोधात भाजप नेत्यांमधील राग अद्याप शांत झालेला नाही.
शिवसेनेचा बहिष्कार?
सन्मान ठेवला जात नसल्याने भाजपबरोबर सत्तेत सहभागी न होण्याचे शिवसेनेने तूर्तास ठरविले असून शपथविधीच्या दुसऱ्या दिवशी, एक नोव्हेंबरला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच पक्षाचा निर्णय जाहीर करतील, असे समजते. शिवसेना आमदारांनी शपथविधी समारंभावरही बहिष्कार घालावा, असा पवित्रा घेतला असून स्वत: उद्धव ठाकरेदेखील या समारंभात सहभागी होणार नाहीत, असे या सूत्रांनी सांगितले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हेही शपथविधी समारंभास जाणार नाहीत.
सत्तेतील सहभागाबाबत भाजप नेतृत्वाने सन्मानजनक प्रस्ताव दिला तर तोडगा शुक्रवारीही निघू शकतो, असे शिवसेनेच्या गोटातून सांगण्यात आले. भाजपने ठोस प्रस्ताव न दिल्याने शिवसेना केवळ पाठिंबा देणार नाही. शिवसेनेच्या अटी मान्य केल्या तरच सत्तेत सहभागी होता येईल, अशी सेनेची भूमिका आहे.
फडणवीस यांनी ठाकरे यांना दूरध्वनी करुन शपथविधीचे निमंत्रण दिले. प्रत्यक्षात शिवसेनेचा वचपा काढण्याची संधी न सोडण्यावर भाजप ठाम आहे. त्यामुळे शिवसेनेला सत्तेत सहभागी करुन घेण्यास भाजपही फारसे उत्सुक नसून ते शिवसेनेची मनधरणी करण्याच्या मनस्थितीत नाहीत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व विधानसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Do not give importence to shiv sena
First published on: 31-10-2014 at 02:35 IST