केवळ नारायण राणेंचा मुलगा असल्यामुळे नाही तर  मतदारसंघात केलेल्या विकासकामांच्या जोरावरच पक्षाने आपल्याला उमेदवारी दिल्याचे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणेंनी म्हटले आहे. माझी इच्छा असती तर, मी २००९ मध्येच कणकवलीमधून निवडणूक लढवू शकलो असतो. मात्र, तसे न करता मी ‘स्वाभिमान संघटने’च्या माध्यमातून तरूणांना रोजगार मिळवून देण्यासाठी स्वत:ला झोकून दिले. त्यामुळे २००९मध्ये माझ्याऐवजी रविंद्र फाटक यांना येथून उमेदवारी देण्यात आली होती.
मी काँग्रेसचा सामान्य कार्यकर्ता आहे. राजकारणात नेत्याची जनतेशी नाळ जुळणे महत्त्वाचे असून, आपण सध्या त्यासाठी प्रयत्न करत असल्याचे नितेश यांनी म्हटले. अनेक समर्थकांनी साथ सोडल्यामुळे नारायण राणे आता त्यांच्या मुलांवर अवलंबून असल्याचा विरोधकांनी चालवलेला प्रचार खोटा असल्याचेही त्यांनी सांगितले.
नारायण राणे यांनी रविंद्र फाटक यांच्यासारख्या सहकाऱ्यांना प्रत्येक वेळी संधी दिली. मात्र, आता स्वत:चे अपयश लपवण्यासाठी हेच सहकारी राणे कुटुंबीय आणि स्थानिक नेत्यांमध्ये तणाव निर्माण करत असल्याची टीका नितेश राणेंनी यावेळी केली. आगामी काळात आपण मतदारसंघाच्या विकासासाठी प्रयत्न करणार असून, शिवसेना आणि भाजपकडे गेलेले तरूण मतदार आपल्याला यावेळी नक्की पाठिंबा देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.