राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी बलात्कार केल्याचा आरोप ढोबळे यांच्याच शिक्षण संस्थेतील एका महिलेने केला आहे. या तक्रारीवरून बोरिवली पोलीस ठाण्यात ढोबळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  हे आरोप बिनबुडाचे आणि राजकीय सुडापोटी करण्यात आल्याचा आरोप ढोबळे यांनी केला आहे.
बोरिवलीमधील गोराई भागात लक्ष्मणराव ढोबळे यांच्या शाहू शिक्षण संस्थेचे नालंदा महाविद्यालय आहे. या महाविद्यालयात तक्रारदार महिला कार्यरत आहे. २०११मध्ये तिची संस्थेच्या इमारतीचे पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली. तिने शुक्रवारी बोरिवली पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार जानेवारी २०११ ते फेबुवारी २०१३ या कालावधीत ढोबळे यांनी तिच्यावर बलात्कार केला. या तक्रारीनुसार जानेवारी २०११मध्ये ढोबळे यांनी तिला जमिनीची काही कागदपत्रे घेऊन पाहणीसाठी बोलावले आणि प्राचार्याच्या दालनात नेऊन मारहाण करत बलात्कार केला. याची वाच्यता केल्यास गंभीर परिणाम होतील, अशी धमकीही दिली. नोव्हेंबर २०११ मध्ये तुझी अश्लील छायाचित्रे कुटुंबीयांना दाखवेन, अशी धमकी देत भेटायला बोलावून पुन्हा बलात्कार केला. अशाच प्रकारे फेब्रुवारी २०१३ मध्येही ढोबळे यांनी बलात्कार केल्याचे या महिलेने तक्रारीत म्हटले आहे. ढोबळे यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलीस उपायुक्त बालसिंह राजपूत यांनी दिली.
आधीच अडचणीत, त्यात ढोबळेंची भर
 पक्षाच्या विविध मंत्र्यांवरील आरोपांचा विरोधकांकडून मुद्दा करण्यात येत असतानाच पक्षाच्या एका माजी मंत्र्यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या अडचणींमध्ये वाढच झाली आहे. लक्ष्मण ढोबळे यांच्या विरोधात बलात्काराच्या गुन्हा हा निवडणूक घोषित झाल्यावर झाल्याने त्यामागे काही राजकीय षडयंत्र आहे का, हे बघावे लागेल. जर दोषी असल्यास ढोबळे यांच्या विरोधात पक्ष कारवाई करेल, असे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.  ढोबळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल होण्यामागे त्यांचे पक्षांतर्गत विरोधक असल्याची चर्चा आहे. ढोबळे यांच्याच मतदारसंघावर डोळा असलेल्या एका नेत्याचा त्यामागे हात असल्याचे बोलले जाते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठीतील सर्व विधानसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Laxman dhoble adds trouble to ncp
First published on: 14-09-2014 at 01:33 IST