खासदार शिवसेनेचा, पण सहापैकी पाच आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे.. अशी स्थिती असलेल्या शिरूर मतदारसंघात या वेळी काय होणार याबाबत उत्सुकता आहे. हा भाग राष्ट्रवादीचे प्रभावक्षेत्र असलेला. मात्र, या पक्षाचे नेते दिलीप वळसे-पाटील यांचे कार्यकर्ते असलेले शिवाजीराव आढळराव हे शिवसेनेत गेले आणि सलग तीन वेळा खासदारही झाले. तरीसुद्धा आमदारकीला सेनेला इनमीन एक आमदार निवडून आणता आला. लोकसभा निवडणुकीत आढळराव यांनी सर्व सहाही विधानसभा मतदारसंघात आघाडी घेतली.  आढळराव यांच्या आक्रमक नेतृत्वाने राष्ट्रवादीला चांगलेच आव्हान उभे केले आहे. तरीसुद्धा त्याचा आमदारकीसाठी उपयोग करून घेण्यात त्यांना यश आलेले नाही. हडपसर मतदारसंघात सेनेचे महादेव बाबर यांचा अपवाद वगळता इतरत्र राष्ट्रवादीचे आमदार आहेत. पक्षाचे बळ टिकविण्यासाठी अजित पवार प्रयत्नशील आहेत.
आंबेगाव
विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांचा हा मतदारसंघ. ते सलग पाच वेळा आमदार झाले आहेत. त्यांचेच पूर्वीचे शिष्य अरूण गिरे नुकतेच शिवसेनेत गेले असून, ते वळसे यांच्याविरुद्ध लढण्याची शक्यता आहे. गिरे यांना वळसे यांचे विरोधक खासदार शिवाजीराव आढळराव यांचे बळ लाभले आहे. त्यामुळे खरी लढत वळसे आणि आढळराव यांच्यातच असेल. आढळराव यांनी गिरे यांची उमेदवारी जाहीर केली. मात्र, गिरे यांच्या नावाला सेनेतील जयसिंग एरंडे, विजय पवार व अन्य कार्यकर्त्यांचा विरोध आहे.
जुन्नर
या मतदारसंघावर राष्ट्रवादीचे आमदार वल्लभ बेनके यांचा प्रभाव आहे. ते १९८५ पासून सहा निवडणुकांपैकी चार वेळा विजयी झाले. प्रकृतीमुळे ते पुत्र अतुल बेनके यांच्या उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत. अ‍ॅड. संजय काळे यांनीही उमेदवारी मागितली आहे. शिवसेनेच्या वतीने जिल्हा परिषद सदस्या आशाताई बुचके, माऊली खंडागळे, नेताजी डोके, संभाजी तांबे इच्छुक आहेत. ऐनवेळेस अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनाही उमेदवारी मिळू शकते. मनसेतर्फे शरद सोनवणे हे प्रमुख उमेदवार असू शकतील.
शिरूर-हवेली
राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असला तरी  गटबाजीमुळे स्वकीयांशीही झुंजावे लागते. राष्ट्रवादीच्या वतीने आमदार अशोक पवार, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप कंद इच्छुक आहेत. लोकसभा निवडणुकीत मिळालेले मताधिक्य आणि भाजपची असणारी एक गठ्ठा असणारी मते या जोरावर भाजपच्या आशा वाढल्या आहेत. भाजपाकडून माजी आमदार बाबुराव पाचर्णे आणि जयश्री पलांडे हे इच्छुक आहेत. मनसेच्या वतीने संदीप भोंडवे आणि शेतकरी संघटनेच्या वतीने बाळासाहेब घाडगे हे उमेदवारीकरिता इच्छुक आहेत.
खेड
राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार दिलीप मोहिते यांना पक्ष पुन्हा संधी देणार की भाकरी फिरवणार, याबाबत उत्सुकता आहे. सुरेश गोरे, शरद बुट्टे, अनिल राक्षे हेही इच्छुक आहेत. त्यामुळे बंडखोरी व पक्षांतर्गत विरोध महत्त्वाचा ठरणार आहे. लोकसभा निवडणुकी दरम्यान सेनेत अनेक जणांनी प्रवेश केला. त्यामुळे शिवसेनेतही उमेदवारीसाठी चुरस आहे. राम गावडे, अमृता गुरव, राजेश जवळेकर, रामदास ठाकूर की अन्य कोणाला उमेदवारी मिळते याकडे सर्वाचे लक्ष
आहे.
भोसरी
आमदार विलास लांडे हॅट्ट्रिकच्या प्रयत्नात आहेत. त्यांचे भाचेजावई, स्थायी समितीचे अध्यक्ष महेश लांडगे आणि शिवसेनेच्या प्रतिस्पर्धी उमेदवार गटनेत्या सुलभा उबाळे यांचे आव्हान त्यांच्यासमोर असेल. लांडगे शिवसेनेच्या संपर्कात आहेत. लांडे किंवा लांडगे यांच्यापैकी एकाला उमेदवारी देण्याचे राष्ट्रवादीचे गणित आहे.  गेल्या निवडणुकीत लांडे यांच्याकडून उबाळे अवघ्या १२०० मतांनी पराभूत झाल्या. आता लांडगे यांची घुसखोरी व त्यांना स्वकीयांची साथ यामुळे उबाळे अस्वस्थ आहेत.
हडपसर
पुणे महापालिकेतील काही प्रभाग आणि ग्रामीण भाग असा मिळून हा मतदारसंघ तयार झाल्यामुळे त्याची भौगोलिक रचना संमिश्र आहे.आमदार शिवसेनेचे महादेव बाबर हेच पुन्हा येथून निवडणूक रिंगणात येतील. मात्र, आघाडीच्या वाटपात काँग्रेसकडे असलेला हा मतदारसंघ या वेळी काँग्रेसकडे राहणार का, याबाबत सध्या तरी चित्र स्पष्ट नाही.
(विनायक करमरकर, सतीश धुमाळ, सचिन कांकरिया, बाळासाहेब जवळकर यांच्याकडून मिळालेल्या मुद्दय़ांसह)
 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व विधानसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mp of shiv sena now who will be mlas in shirur constituency
First published on: 21-09-2014 at 04:56 IST