जागावाटप, युती, आघाडीचं ते काहीच मार्गी लागत नाही, अजून दोन दिवस टाइमपास कसा करायचा, काहीच समजत नव्हते. उद्या उशिरा उठायचं, असं रात्रीच ठरवूनच भाऊंनी ताणून दिली होती.
दहा वाजून गेल्यावर भाऊंचा पीए दबकत बेडरूममध्ये आला.
‘भाऊ, उठा’.. त्यानं हलकेच साद घातली, आणि भाऊ दचकून जागे झाले.
‘उठा म्हणजे, दहा वाजून गेले ना’..चाचरत पीए म्हणाला, आणि भाऊ हसले.
‘हो, हो.. ते उठा.. मला वाटलं’.. भाऊ बोलले, आणि स्वत:शीच, ‘उठा, उठा’ म्हणत बेडवरून उतरले.
‘आज कोणवार आहे रे?’.. ब्रश करता करता भाऊंनी पीएला विचारलं.
‘सोमवार, भाऊ.. अजून दोन दिवस आहेत’.. पीए म्हणाला, आणि चूळ भरून नॅपकीनला तोंड पुसतच भाऊ हसले.
‘बुधवारी आहे का, अमावास्या?’.. भाऊंनी विचारलं. पीएनं मान हलवली.
चहा घेता घेताच भाऊ वर्तमानपत्र चाळू लागले. कालच्या सगळ्या बातम्या मनाप्रमाणे सुटल्या होत्या. समाधानानं मान हलवत त्यांनी वर बघितलं. पीएसमोर उभाच होता. त्याच्या हातात आजचं कार्यक्रमाचं शेडय़ूल होतं.
‘आज बाबांनी बोलावलंय’.. पीए हलक्या आवाजात, इकडेतिकडे पाहात म्हणाला, आणि भाऊंनी खुर्चीत बसल्या बसल्या डावा पाय उजव्या मांडीवर ठेवला.
‘माहीत आहे’.. ते हळूच म्हणाले, आणि निघायची तयारी सुरू झाली.. भाऊ बाबांच्या घरी पोहोचले. बाकीचे अगोदरच आले होते.
सगळे हॉलमध्ये बसले, आणि अचानक भिंतीवरच्या एलसीडी स्क्रीनवर महाराष्ट्राचा नकाशा उमटला. भाऊंनी डोळे मिटले.
‘सर्वात पुढे आहे, हा महाराष्ट्र माझा’.. हॉलमध्ये गाणं घुमलं आणि भाऊ ताडकन उठले. खिशातून कापसाची कांडी काढून कान खाजवत भाऊंनी सूर लावला..
‘ओम नमो.. अब महाराष्ट्र, सब महाराष्ट्र’..
पण सूर लागतच नव्हता.. टिपेच्या सुरात सुरुवात केलेलं गाणं त्यांनी एका ओळीतच आवरतं घेतलं.
मग दादा सरसावले.. ‘मी राष्ट्रवादी, महाराष्ट्रवादी’..
दादांचा आवाज हॉलमध्ये घुमला, तेवढय़ात बाजूला कुणी तरी अचानक ओरडलं, ‘उठा!’..
सगळे दचकले.  
‘उठा.. चला, महाराष्ट्र घडवू या’..तोच आवाज घुमला, आणि बाबा हॉलमध्ये येरझारा घालू लागले. दादांच्या कपाळावर आठय़ा चढल्या. शर्टाच्या बाह्य़ा वर करून त्यांनी आवाजाच्या दिशेने पाहिलं, आणि हात वर करून ते आणखी जोरात ओरडले,
‘मी राष्ट्रवादी, खरा, महाराष्ट्रवादी’..
बाबांनी हसतच बाहेर बघून खूण केली. दोन-चार जण आत आले, आणि एका सुरात गाऊ लागले,
‘सर्वात पुढे आहे, महाराष्ट्र माझा..माझा.. माझा!’
भाऊंनी कापसाची कांडी कानातून काढून खिशात ठेवली, घसा खाकरला आणि पुन्हा सूर लावला..
‘अब महाराष्ट्र, सब महाराष्ट्र.. ओम नमो’..
सगळे एकाच वेळी ओरडत होते, ‘महाराष्ट्र माझा’.. हॉलमध्ये बेसूर गोंधळ सुरू झाला.
तेवढय़ात बाजूच्या खिडकीतून वाऱ्याचा एक जोरदार झोत आत घुसला..
भिंतीवरला महाराष्ट्राचा नकाशा जोरात फडफडत होता. तिकडे कुणाचंच लक्ष नव्हतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व विधानसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: My maharashtra
First published on: 23-09-2014 at 03:15 IST