काँग्रेसने केलेले काम आपण केले असे सांगण्यात नरेंद्र मोदी तरबेज आहेत. काँग्रेस पक्षाने राबवलेल्या योजनांची नावे बदलून पुढे चालवली जात आहेत. शंभर दिवसाच्या कालावधीत मोदी शासनाने जनतेचा अपेक्षाभंग केला आहे, असा आरोप राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी गुरुवारी येथे केला.
राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा प्रारंभ सोनिया गांधी यांनी करवीरनगरीतून केला. प्रचाराच्या पहिल्याच सभेत गांधी यांनी दहा मिनिटाच्या भाषणात पंतप्रधान मोदी यांच्या कारभारावर टीकास्त्र सोडले.
तर आौरंगाबादच्या सभेत त्यांनी पवारांवर टीका केली. विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष शिवसेना-भाजपशीही हातमिळवणी करू शकतो, अशा आशयाचे वक्तव्य काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी येथे जाहीर सभेत केले. ‘कालपर्यंत आमच्याबरोबर होते, ते पुढे कोणाशी हातमिळवणी करतील,’ असे प्रश्नार्थक विचारत त्यांनी राष्ट्रवादीच्या भूमिकेवर शंका घेतली.
कोल्हापूरच्या सभेत त्यांनी मोदींनाच लक्ष्य केले. लोकसभा निवडणुकीवेळी देश बदलून टाकण्याची स्वप्ने दाखवली होती, त्याचे काय झाले, असा सवाल उपस्थित करीत सोनिया गांधींनी भाजपाने दिलेली आश्वासने पाळली नसल्याचे सोदाहरण स्पष्ट केले. त्या म्हणाल्या, शंभर दिवसात महागाई कमी झाली का असे विचारल्यावर त्यांना वाईट वाटते. पाकिस्तानला धडा शिकवण्याचा प्रश्न उपस्थित केल्यावर ते त्रस्त होतात. विदेशातून काळा पसा देशात आणणे, तरुणांना रोजगार मिळवून देण्याचे काम झाले का,असे विचारल्यावर ते नाराज होतात. शंभर दिवसाचा हिशोब मागू लागले की मोदी ६० वर्षांत काँग्रेसने काहीच केले नसताना आमच्याकडे ६० दिवसाचा हिशोब का मागतात असा प्रश्न करतात. भोळयाभाबडया जनतेला फसवणे सोपे आहे पण दाखवलेली स्वप्ने प्रत्यक्षात आणणे कठीण आहे, अशी टीका त्यांनी केली.
‘लोकसत्ता’च्या छायाचित्रकारास धक्काबुक्की
कोल्हापूर येथे सोनिया गांधींच्या निवडणूक प्रचारसभेचे छायाचित्रण करण्यासाठी गेलेले ‘लोकसत्ता’चे वरिष्ठ छायाचित्रकार प्रशांत नाडकर यांना पोलिसांनी अपमानास्पद वागणूक देऊन धक्काबुक्की केली.सभेतील भाषण संपवून परत जाण्यासाठी निघालेल्या सोनिया गांधी मोटारीतून उतरून व्यासपीठाच्या डाव्या बाजूला उभ्या असलेल्या महिलांना भेटायला आल्या. हा प्रसंग कॅमेऱ्यात टिपण्यासाठी प्रशांत नाडकर प्रयत्न करत होते.  सुरक्षाव्यवस्थेची जाणीव ठेवून ते ‘डी’मध्ये शिरले नव्हते. परंतु बंदोबस्ताला असलेले पोलीस निरीक्षक गोडसे यांनी नाडकर यांची कॉलर धरून त्यांना खेचले व शिवीगाळ केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 

मराठीतील सर्व विधानसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sonia gandhi targets modi pawar
First published on: 10-10-2014 at 03:45 IST