भारतीय जनता पक्षाला राज्यात मिळालेले अभूतपूर्व यश, शिवसेनेचा स्वबळाचा फुटलेला फुगा, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मतदारांनी दिलेली चपराक आणि रुळावरून घसरलेले मनसेचे इंजिन यामुळे ही विधानसभा निवडणूक स्मरणात राहील; पण त्याहीपेक्षा अधिक ती आठवली जाईल ती राज्यातील मी मी म्हणणाऱ्या मातब्बरांच्या पराजयगाथेमुळे. या निवडणुकीत मतदारांनी अशा अनेक उमेदवारांना अस्मान दाखविले. १५ माजी मंत्र्यांसह अनेकांची संस्थाने खालसा केली. काँग्रेस राजवटीत मुख्यमंत्रिपदाचे नित्य दावेदार असलेले नारायण राणे, नवी मुंबईतील ‘दादा’ गणेश नाईक, शिवसेनेचे विधिमंडळ पक्षनेते सुभाष देसाई, राजेंद्र दर्डा, नितीन राऊत, शिवाजीराव मोघे यांच्यासारखे माजी मंत्री, सुरेशदादा जैन, गुलाबराव देवकर यांच्यासारखे तुरुंगातून निवडणूक लढविणारे महामहीम, बबनराव पाचपुते यांच्यासारखे ऐन वेळी पक्षांतर करून भाजपवासी झालेले नेते अशा अनेकांचा त्यात समावेश आहे. अत्यंत महत्त्वाकांक्षी नेते म्हणून प्रसिद्ध असलेल्या नारायण राणे यांना कोकणातील मतदारांनी घरचा रस्ता दाखविला. कोकण व विशेषत: सिंधुदुर्गचा विकास आपल्यामुळेच झाला, असा दावा राणे नेहमीच करतात, पण याच सिंधुदुर्गतील मतदारांनी राणे यांचा पाडाव केला. कायम मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर डोळा ठेवून राजकारण करणाऱ्या राणे यांच्यासाठी हा मोठा धक्का ठरला आहे. नवी मुंबईचे साम्राज्य एकहाती सांभाळणारे गणेश नाईक यांनाही मतदारांनी धडा शिकविला. सिंधुदुर्ग किंवा नवी मुंबईत सारे काही आपल्याच इशाऱ्यानुसार झाले पाहिजे या आवेशात वागणाऱ्या राणे आणि नाईक यांच्या दादागिरीलाच मतदारांनी लगाम लावला आहे. दादागिरीच्या जीवावर राजकारणात यशस्वी होता येत नाही, असा संदेश या दोन माजी शिवसैनिकांच्या पराभवाने गेला आहे. माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनाही पराभवाचा धक्का बसला. पाटील यांच्यासाठी हा पराभव चांगलाच जिव्हारी लागणार आहे. पाटील यांच्याप्रमाणेच १९९५ पासून कायम सत्तेत असलेले अनिल देशमुख यांचा पराभव पुतण्यानेच केला. राष्ट्रवादीचा मुंबईतील चेहरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन अहिर यांचाही हिरमोड झाला. संतेज उर्फ बंटी पाटील आणि राजेंद्र मुळक या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे उजवे आणि डावे हात समजल्या जाणाऱ्या दोन्ही माजी राज्यमंत्र्यांचा पराभव झाला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यासाठी प्रतिष्ठेची असलेल्या यवतमाळमधील निवडणुकीत त्यांच्या पुत्रास पराभव पत्करावा लागला आहे, तर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा मुंबईच्या अणुशक्तीनगरात पराभव झाला आहे. शिवाजीराव मोघे, सुरेश शेट्टी, नितीन राऊत, पद्माकर वळवी, संजय देवतळे या माजी मंत्र्यांना मतदारांनी नाकारले आहे. मराठवाडय़ातील बडे प्रस्थ राजेंद्र दर्डा यांनाही पराभवाचा धक्का बसला आहे. सुरेश धस आणि राजेंद्र गावित या दोन माजी राज्यमंत्र्यांना मतदारांनी नाकारले.
शिवसेनेचे गटनेते सुभाष देसाई तसेच मनसेचे गटनेते बाळा नांदगावकर यांचाही पराभव झाला. प्रवीण दरेकर आणि नितीन सरदेसाई या मनसेच्या मातब्बर नेत्यांचा पराभव झाला. बबनराव पाचपुते हे वादग्रस्त माजी मंत्री पक्षांतर करून भाजपच्या वतीने लढले, पण त्यांचाही पराभव झाला. मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष कृपाशंकर सिंग यांचा दारुण पराभव झाला. कालिना मतदारसंघात ते तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व विधानसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The great defeated in maharashtra assembly polls
First published on: 20-10-2014 at 03:56 IST