विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत विदर्भातील काही मतदारसंघांमध्ये चुरस, तर काही मतदारसंघात एकतर्फी लढत पाहायला मिळाली. काही ठिकाणी दोन तर काही ठिकाणी तीन प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या मतांच्या अंतरामध्ये चढउतार होत असल्याने कोण जिंकून येणार, याचा अंदाज लावणे अतिशय कठीण झाले होते. सुरुवातीपासून आघाडीवर असलेले उमेदवार अखेरच्या दोन-तीन फ ेऱ्यांमध्ये माघारले जाऊन पराभूत झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. एकेकाळी काँग्रेसचा गड मानला जाणाऱ्या विदर्भात यावेळी मात्र भाजपने ६२ पैकी ४४ जागेवर यश मिळवून विदर्भावर वर्चस्व निर्माण केले, तर सेनेला केवळ ४ जागा मिळाल्या. काँग्रेसला केवळ ११ जागेवर समाधान मानावे लागले.  
लोकसभा निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या यशानंतर राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत विदर्भाने विजयी परंपरा कायम राखणार की नाही, याबाबत अनेकांना शंका असताना वैदर्भीयांनी पुन्हा एकदा भाजपवर विश्वास टाकला. भाजपला मिळालेल्या यशामुळे विविध जिल्ह्य़ातील कार्यकर्त्यांंनी ढोलताशांच्या निनादात फटाक्याची आतषबाजी करीत जल्लोश केला. विदर्भात अमरावती, अकोला, नागपूर, वर्धा, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या मतदार संघातील अनेक मतदारसंघांवर काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेचे वर्चस्व असताना त्या जागा भाजपने काबीज केल्या आहेत. अमरावतीत काँग्रेसमधून भाजपमध्ये  आलेले डॉ. सुनील देशमुख, डॉ. अनिल बोंडे, बच्चू कडू, रवी राणा, वीरेंद्र जगताप, अकोला जिल्ह्य़ातून प्रकाश भारसाकळे, गोवर्धन शर्मा, चंद्रपूर जिल्ह्य़ात भाजपाचे सुधीर मुनगंटीवार, नाना शामकुळे, संजय धोटे, तर काँग्रेसचे विजय वडेट्टीवार विजयी झाले. बुलढाणा जिल्ह्य़ातून भाजपाचे चैनसुख संचेती व काँग्रेसचे कांबळे विजयी झाले. गोंदिया जिल्ह्य़ात काँग्रेसचे गोपाल अग्रवाल आणि भाजपाचे राजकुमार बडोले विजयी झाले. यवतमाळ जिल्ह्य़ात माजी मंत्री शिवाजीराव मोघे, वसंतराव पुरके, माणिकराव ठाकरे यांचा मुलगा राहुल ठाकरे हे मातब्बर नेते पराभूत झाले आहेत. या मतदारसंघात सात पैकी पाच जागांवर भाजपाने, तर सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी एका जागेवर समाधान मानावे लागले. भाजपाचे मदन येरावार आणि काँग्रेसचे मनोहर नाईक विजयी झाले. डॉ. नितीन राऊत, राजेंद्र मुळक, अनिल देशमुख, शिवाजीराव मोघे, वसंत पुरके राज्य सरकारमध्ये मंत्री असलेले नेते पराभूत झाले आहे. राष्ट्रवादीला विदर्भात केवळ एका जागेवर यश मिळाले. पक्षाचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख काटोल आणि रमेश बंग हिंगणा मतदारसंघातून पराभूत झाले. कारंजा मतदारसंघात भाजपाचे राजेंद्र पाटणी आणि रिसोड मतदारसंघातून अमित झनक विजयी झाले. अमरावती जिल्ह्य़ात माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचे सुपुत्र रावसाहेब शेखावत आणि शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसुळ यांचे सुपुत्र अभिजित अडसुळ यांचा पराभव झाला.
विदर्भात सर्वात जास्त मतांनी सेनेचा संजय राठोड ८९ हजार ९६४ मतांनी विजयी झाले. त्यांना १ लाख ३१,३१६, तर राष्ट्रवादीचे वसंत घुईखेडकर यांना ४१ हजार ३५२ मते मिळाली. सर्वात कमी मतांनी देवळी मतदार संघातून काँग्रेसचे रणजित कांबळे केवळ ३७० मतांनी विजयी झाले.
विदर्भात बसपाच्या नेत्या मायावती आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या जाहीरसभा झाल्या असल्या तरी त्यांना विदर्भात दोन्ही पक्षाने खाते उघडले नाही. मात्र, बसपाच्या अनेक उमेदवारांनी भाजपला चांगलीच लढत दिली. विशेषत उत्तर नागपुरात बसपाचे किशोर गजभिये दुसऱ्या स्थानावर असून त्यांनी डॉ. नितीन राऊत यांनी तिसऱ्या स्थानावर पाठविले. नागपूर जिल्ह्य़ात १२ पैकी तब्बल ११ जागा जिंकून भाजप-नागपूर शहर व जिल्ह्य़ावर वर्चस्व मिळविले आहे, तर सतीश चतुर्वेदी, अनिस अहमद, रमेश बंग, अनिल देशमुख, डॉ. नितीन राऊत या दिग्गजांच्या पराभवामुळे काँग्रेस जबर धक्काबसला आहे. भाजपाचे कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, सुधाकरराव देशमुख आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस पुन्हा विजयी झाले, तर डॉ. मिलिंद माने आणि सुधाकर कोहळे यावेळी प्रथमच निवडून आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लक्षवेधी निकाल
अलीकडेच काँग्रेसमधून भाजपवासी झालेले माजी मंत्री संजय देवतळे यांना वरोरा मतदारसंघात पराभवाची नामुष्की सहन करावी लागली. शिवसेनेचे बाळा धानोरकर यांनी त्यांच्यासमोर कडवे आव्हान निर्माण केले होते. त्यामध्ये धानोरकर विजयी झाले.

माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे चिरंजीव रावसाहेब शेखावत हे अमरावती मतदारसंघातून पराभूत झाले. अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या या लढतीत भाजपचे सुनिल देशमुख यांनी त्यांचा पराभव केला.

 

मराठीतील सर्व विधानसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vidarbha verdict in bjp fevour
First published on: 20-10-2014 at 06:54 IST