भाजपच्या नेतृत्त्वाखालील महायुतीला राज्यात पूर्ण बहुमत मिळेल. मात्र, बहुमताचा आकडा गाठण्यासाठी काही जागा कमी पडल्यास भाजप कोणत्याही स्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत जाणार नाही, असे भाजपचे नेते एकनाथ खडसे आणि विनोद तावडे यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी राज्यात आगामी सरकार बनविण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल, असे मत ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केले होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले होते. त्या पार्श्वभूमीवर भाजपने पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला.
विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी राज्यात मतदान झाले. मतदारांनी कोणाच्या पारड्यात आपला कौल दिला आहे, हे आता येत्या रविवारी मतमोजणीनंतरच स्पष्ट होईल. दरम्यान, विविध एक्झिट पोलनी भाजप राज्यात सर्वांत मोठा पक्ष ठरण्याची शक्यता वर्तविली आहे. काहींनी भाजपच्या नेतृत्त्वाखाली युतीला स्पष्ट बहुमत मिळण्याचा अंदाज व्यक्त केला आहे तर काहींनी भाजपला सत्ता प्राप्त करण्यासाठी इतर पक्षांची मदत घ्यावीच लागेल, असे म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर भाजप कोणाची मदत घेणार, यावरून विविध तर्क लढविले जात आहेत. प्रचाराच्या काळात शिवसेनेने भाजपवर सडकून टीका केली होती. त्यामुळे आता मतमोजणीनंतर दोघे एकत्र येतील का, शिवसेना भाजपला पाठिंबा देईल का, असे प्रश्न पुढे येऊ लागले आहेत. त्याचवेळी शिवसेनेने भाजपला पाठिंबा दिला नाही, तर राष्ट्रवादी कॉंग्रेस सरकार स्थापनेसाठी भाजपला पाठिंबा देईल का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी सरकार स्थापनेत आपला पक्ष महत्त्वाची भूमिका बजावेल, असे म्हटल्यामुळे विविध चर्चांना सुरुवात झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व विधानसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: We will not go with ncp says bjp leader eknath khadse
First published on: 16-10-2014 at 05:00 IST