आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रात धडाक्याने क्षमतावर्धन होते आहे. पण आपण ‘जीव’ आहोत!

आज शारीर अंगाने घडणारे डायलेक्टिक्स पाहू..

जोपर्यंत न्यूटन-प्रणीत भौतिकी पुरेशी होती त्या काळात जडवाद आणि नियतीवाद यांना विज्ञानाकडून अतीच पाठबळ मिळत राहिले. क्वांटम-फिजिक्सच्या उदयामुळे विचारपद्धतीत व ज्ञानशास्त्रात क्रांतिकारक बदल घडले. क्वांटम-फिजिक्सने वैज्ञानिकांना कडू औषध देऊन पुढील धडे शिकवले : (१) तरंग खरा की कण खरा? याचे उत्तर, एकच गोष्ट उभयस्वरूप असू शकते! हे आहे. ही स्वरूपे परस्परपूरक व सुसंगत असतात. (२) यापैकी कोणते स्वरूप व्यक्त होईल हे बघणाऱ्यावर अवलंबून (द्रष्ट्रसापेक्ष) असते. (३) सूक्ष्म जगात नेहमीचे गणित लागू नसते व संभाव्यता (प्रोबेबिलिटी)वर आधारित संख्याशास्त्र (स्टॅटिस्टिक्स) मान्य करावे लागते. (४) यदृच्छा (रॅण्डमनेस) ही गोष्ट अज्ञानमूलक नसून निसर्गाचाच अविभाज्य घटक आहे.

जाणिवेचे स्वरूप काय आहे? हा सध्या सर्वाधिक महत्त्वाचा प्रश्न बनला आहे. आपल्याला येणाऱ्या आत्मगत व्यक्तिनिष्ठ अनुभवांचा- ओघ, हे तिचे थेट स्वरूप आहे. पण त्याच वेळी अनुभव शक्य होण्याला, एक शारीर-अंगही असते. आपली संवेदन-इंद्रिये, यत्न-इंद्रिये, हार्मोन्स आणि मज्जासंस्था व तिचा कळस म्हणजे मेंदू, असे हे शारीर-अंग असते. ही जाणिवेची वस्तुगत बाजू झाली. आत्मगत बाजू आणि वस्तुगत बाजू यांच्यापैकी वस्तुगत बाजूच ‘खरी’ आणि आत्मगत बाजू आभासी अशी भूमिका अनेक शास्त्रज्ञ (व जडवादी) घेत असतात.

परंतु क्वांटम-फिजिक्सने दिलेली ‘उभयस्वरूपता’ ही डायलेक्टिकल दृष्टी मिळाल्याने, (१) आत्मगत बाजूही तितकीच सत्य आहे. (२) जाणीव या एकाच नाण्याच्या वस्तुगत व आत्मगत बाजू किंवा अंगे आहेत. (३) एकीत काही बदल केला तर तो दुसरीतही दुसरीच्या टम्र्समध्ये उतरतो.  — हे तत्त्वत: मान्य करणे आता शक्य झाले आहे. आपण बाहेरून बघतो की आतून बघतो यानुसार त्या बाजू व्यक्त होतात असे म्हटले की, जाणीव हे रहस्यच राहत नाही.

जैविक – चिन्हमीमांसा

क्वांटम- फिजिक्सखेरीज, बायोकेमिस्ट्री, जनुकशास्त्र, उत्क्रांतिशास्त्र यांनीही आपल्या समजेत क्रांतिकारक बदल केले. अजीवातून सजीव निर्माण होणे ही एक अफलातून घटना आहे. डीएनएचा जीनोम यदृच्छय़ा बनला आणि जीवनसंघर्षांत टिकून राहिला. ए टी सी जी ही अक्षरे, त्यांचे शब्द व वाक्ये ही चिन्हकाची बाजू झाली. पण जीनोम हा, नुसते एक टेक्स्ट नसून, तो त्याच वेळी रसायनांचे मूळ छापे बनवण्याचा कारखानादेखील असतो. ‘चिन्हकाचे अर्थ लावणे’ हे काम करणारे आर एन ए रेणूही जीनोममध्येच असतात. ते रसायनाचा छाप (चिन्हित) घेऊन बाहेर पडतात. या छापावर भोवतालची अमिनो-अ‍ॅसिड्स चिकटून अपेक्षित रसायन (अर्थ) तयार होते. जैव-चिन्हव्यवस्था अफलातून अशासाठी की, चिन्हके, चिन्हिते, डीकोडर (इंटरप्रीटर) आणि अर्थ-रसायन ही सगळी मंडळी तिच्या आतच उपस्थित असतात. यामुळे बायो- सेमियॉटिक्स ही नवी विद्याशाखाच निर्माण झाली आहे. ही बंदिस्त, अंतर्भूत आणि स्वयंभू चिन्हव्यवस्था असते. उत्क्रांतीचा सारा वारसा घेऊन ती आलेली असते.

आपण आपल्या जगातसुद्धा चिन्हव्यवस्था वापरतच असतो. पण त्यात कोडमेकर कुणी तरी वेगळाच, चिन्हकवस्तू वेगळ्याच, चिन्हिताचे अर्थ वेगळे आणि ते लावणारा इंटरप्रीटर वेगळा असतो. आपल्या वापरातल्या भाषेत समाईक संदर्भ बनलेले असणे. रिलेव्हन्सनुसार अर्थ लावणे, लक्षणार्थ किंवा आलंकारिक बोलण्याचे सूचित अर्थ कळणे, शिवाय समोरासमोर आविर्भाव करणे, अशी प्रचंड समृद्धी असते. पण एकच एक अर्थ लागेल अशी सोय मात्र नसते. त्यामुळे भरपूर अनिश्चितता असते. म्हणजे मानवी चिन्हव्यवस्था जैवहून वेगळी आणि कम्प्युटर्सची तर आरपारच वेगळी असते.

कम्प्युटर्सकरिता, जिचा एकच एक परिणाम घडेल अशी कृत्रिम गणित-सदृश भाषा (फॉर्मल लँग्वेज) बनवावी लागते. त्यात प्रचंड संख्येने ऑन ऑफ होणाऱ्या स्विचेसचे जे जाळे असते, तेथे प्रत्यक्ष घडणाऱ्या क्रियांना मशीन-लँग्वेज म्हणतात. अनेक सोप्या प्रक्रिया जोडत जाऊन अवघड प्रक्रिया केल्या जातात. हे सगळे फक्त व्याकरणावर (सिन्टॅक्स) अवलंबून असते. अर्थ (सेमँटिक) आपल्यालाच चिकटवावा लागतो. प्रचंड वेग आणि साइजची अडचण नाही यामुळे बऱ्याच गुंतागुंतीच्या आणि रिपिटेटिव्ह प्रक्रिया घडवून आणता येतात. एखादी गोष्ट समरूपित (सिम्यूलेट) करायची असेल तर तिथे आत वेगळीच प्रक्रिया घडते व उत्तर कन्व्हर्ट करून मिळते. कम्प्युटरची रीती छोटे तुकडे जोडत मोठा आकृतिबंध, ते जोडून अधिक मोठा, अशी खालून वर जाणारीच असते. याचा तोटा असा असतो की ‘तुकडे पाडत गेले की सगळे उकलते’ अशी रिडक्शनिस्ट भूमिका कम्प्युटरवाल्यांमध्ये आपोआप रुजते. ‘पूर्णाकडून अंशाकडे’ ही दिशा ते गमावतात व जिवाला समजून घेण्यात चूक करतात. डायलेक्टिक्स विसरतात.

मेंदू-अभ्यास

या क्षेत्रात, जीव अजीवाहून वेगळा कसा? आणि मनुष्य इतर प्राण्यांपासून वेगळा कसा? याची महत्त्वाची उत्तरे मिळालेली आहेत. मेंदूत न्युरॉन्स (मज्जापेशी), डेंड्राइड्स (आखूड तंतू), अक्सॉन्स (लांब तंतू) आणि सायनॅप्सेस (आंतरिम रासायनिक घटक, जो सिग्नल अ‍ॅम्प्लिफाय करतो). एक अब्ज मज्जापेशी असून प्रत्येक मज्जापेशी अधिकतम दहा हजार मज्जापेशींशी जोडली जाऊ शकते. म्हणजे कनेक्शन्सची संख्या किती प्रचंड असेल पाहा. आपण जसजसे शिकतो तशी ही कनेक्शन्स फिजिकली जोडली जातात. कमी अधिक क्षमतेची व कमी अधिक टिकाऊ सायनॅप्सेस तयार होतात. पुढे पाठवण्याचा संदेश किती मज्जापेशींना जोडायचा आहे यानुसार सायनॅप्सकडून तो ऊर्जित केला जातो. आपण निर्धाराने मन घडवितो तेव्हा नकळत सायनॅप्सेस जास्त ऊर्जित करत असतो. याउलट  सायनॅप्सेसच्या केमिस्ट्रीने जर मार खाल्लेला असेल तर निर्धार टिकत नाही व आपण विकाराधीन होतो. येथेही उभयस्वरूपता ही भन्नाट गोष्ट दिसून येते. यात स्पीड मात्र कम्प्युटरपेक्षा कमी असतो.

आपला मेंदू हा बहुस्तरीय असतो. गाभ्यात प्राणिज प्रेरणा, त्याबाहेर भावनिक आवरण व त्या बाहेर बौद्धिक आवरण अशी दिशा असते. अर्थात हे स्तर म्हणजे तीन घट्ट आणि शुद्ध कप्पे नसून क्रमाक्रमाने नकळत-प्रेरणाप्रधानतेकडून हळूहळू कळत – बुद्धिप्रधानतेकडे जाणारे अनेकानेक स्तर असतात. प्रत्येक स्तरात पुढील व मागील स्तरांकडून काय घ्यावे किंवा द्यावे याचे नियम बनलेले असतात.

आपल्या मेंदूचे संघटन हे अनेक कार्यविभागा (मोडय़ूल्स)चे असते. समजा आठवलेला शब्द उच्चारण्यासाठी तोंडाकडे/ जिभेकडे पाठवणे याचे एक मोडय़ूल असेल. चेहरे लक्षात ठेवण्याचे एक असेल. अशी भरपूर संख्येने मोडय़ूल्स असतात. विशेष म्हणजे एकाच वेळी अनेक मोडय़ूल्स स्वायत्तपणे कार्यरत, पण एकमेकांशी जोडलेलीही असतात. पण सगळी आपल्या अनुभवात येत नाहीत.

विशेष महत्त्वाचे असे की मोडय़ूल्स ही बहुस्तरीय असतात. म्हणजेच विचारातून खाली यायचे, आवश्यक ती भावना मिळवायची आणि परत पुढे विचार करायचा असे त्यांचे काम चालते. कसा विचार केला की कशी भावना उमटेल व कोणत्या भावनेने कोणता विचार येईल हे अखंडपणे पारस्परिक आंतरक्रियेने चालत असते. विचाराचे स्टिअिरग आणि भावनांचे इंजिन हे सतत जोडलेले राहावे लागते. हे नुसते डेटाप्रोसेसिंग नाही, हे उघड आहे.

जिवाला असलेली वेदनशीलता (सेंटियन्स) आणि सहेतुकता (इंटेनशनॅलिटी) या गाभ्यांचा आधार न घेता कोणतीही विचारप्रक्रिया घडू शकत नाही. मनुष्याच्या समृद्ध जीवनरीतीमुळे, त्याच्या मेंदूला बरेच काही जाणिवेत आणावे लागते. तरीही प्रसंगानुसार प्रेरणा उद्युक्त करणे हे मूलभूत कार्य चालू असतेच.

आपला मेंदू आपल्याला काय ‘जाणवून द्यायचे’ याबाबत अनेक पवित्र्यात जातो. तसेच ‘आपण ठरवूनही’ मेंदूला विविध पवित्र्यात घालवू शकतो. आता नाटक बघतोय ते ‘नाटकाच्या नियमांनीच’ बघेन असे ‘आपण’ ठरवतो. मग ‘मेंदू’ भलत्या शंका काढणारे मोडय़ूल अव्यक्तात टाकतो! प्रश्न शारीर की मानस? असा नसून व्यक्त की अव्यक्त? असा असतो.

काय घडले तर कसा प्रतिसाद अपेक्षित? याला वर्तन- सादरीकरण (बिहेवियरल परफॉर्मन्स) म्हणतात. आपले अनेक परफॉर्मन्सेस आपण कम्प्युटरद्वारा समरूपित (सिम्युलेट) करू शकलो आहोत. परफॉर्मन्स या अर्थाने कम्प्युटर्स हे नपुण्यात आपल्या पुढेही गेलेले आहेत. त्याहीपुढे जाऊन ते नव्या परिस्थितीत नवे प्रतिसाद द्यायला ‘शिकत’सुद्धा आहेत. पण वेदनशीलता व सहेतुकता ही जीवांनाच असते. कम्प्युटर्सना नव्हे.

कम्प्युटर्सना प्रचंड वेग लाभलेला आहे. तसेच कवटीच्या जागेत मावले पाहिजे असे बंधन नाही. महान तंत्रज्ञांनी ‘क्षमता’निहाय पाहता मनुष्याला ओव्हरटेक करणारी यंत्रे बनविली आहेत. पण वृत्ती? ती मात्र आपल्याकडेच आहे. किती गुंतागुंत वाढवली तर रोबोंना इच्छाही व्हायला लागतील? असा प्रश्न पडणे म्हणजे, इच्छा मुळात जीवातच असू शकते, यंत्रात नव्हे, हे विसरणे होय.

लेखक तत्त्वज्ञान व सामाजिक शास्त्रांचे आंतरविद्याशाखीय अभ्यासक आहेत. ई-मेल :  rajeevsane@gmail.com