गणपती म्हणजे ६४ कलांची देवता.. म्हणूनच प्रत्येक कलाकाराचं आणि गणपतीचं वेगळं नातं असतं. बालपणापासून पाहिलेल्या गणेशोत्सवाच्या आठवणी आणि किस्से, करोना संसर्गाच्या काळात होत असलेला गणेशोत्सव या विषयी सांगतेय अभिनेत्री श्रुती मराठे..

गणेशोत्सवाशी तुझं नातं काय?

* माझं आणि गणेशोत्सवाचं नातं लहानपणापासूनचं आहे. कारण माझ्या माहेरी, मराठेंकडे उजव्या सोंडेचा गणपती असल्याने गणपतीची मूर्ती आणून उत्सव साजरा केला जात नाही. त्यामुळे मी लहानपणी दरवर्षी गणेशोत्सवात मामाच्या घरी जायचे. मामाकडे गणेशोत्सवाच्या आधीच जाऊन लहान-मोठे सगळे मिळून अगदी तयारीपासून सगळी कामं करायचो. मी हरतालिकेचा उपासही केलेला आहे. मामाच्या घरचा गणपती दीड दिवसच असायचा. पण तो दीड दिवसाचा कालावधी खूप धमाल असायचा. साग्रसंगीत स्वयंपाक, नैवेद्य, मोदक सारं काही उत्साहानं

के लेलं असायचं. त्यामुळे गणेशोत्सव म्हटलं, की मला मामाच्या घरचाच गणपती डोळ्यासमोर येतो. आता लग्नानंतर घाटणेकरांकडेही खूप उत्साहात गणेशोत्सव साजरा के ला जातो. गौरवची सगळी भावंडंही घरी येतात. त्यामुळे सासरच्या घरीही खूप धमाल वातावरण असतं.

गणेशोत्सवाची खास आठवण सांगशील?

* तशा आठवणी खूप आहेत. पण एक गंमतशीर आठवण आहे. मामाकडे मोदक खाण्याची जवळपास चढाओढ असायची. आग्रहानं मोदक वाढले जायचे. त्यामुळे तेरा-चौदा मोदक खाल्लय़ाचं मी पाहिल्याचं मला आठवतंय. आम्हा मुलांना काही तेवढे मोदक खाता यायचे नाहीत.

गणेशोत्सवात कलाकारांचा महत्त्वाचा सहभाग असतो. त्या विषयी काय वाटतं?

* प्रत्येक कलावंतासाठी गणेशोत्सव महत्त्वाचा आहे. अगदी मूर्तिकारांपासून व्हॉईस ओव्हर कलाकार ते अगदी तंत्रज्ञ असे सगळेच कलावंत गणेशोत्सवाशी जोडलेले असतात. गणेशोत्सवात प्रत्येकाला, प्रत्येक कलाप्रकाराला संधी मिळते. सहा वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या कलावंतांच्या ढोलताशा पथकात माझा सहभाग असतो. त्यामुळे मला विसर्जन मिरवणुकीमध्ये ढोल वाजवण्याची संधी मिळते.

करोनाच्या काळात होत असलेल्या गणेशोत्सवाबद्दल काय वाटतं?

* सध्याची करोना संसर्गाची स्थिती पाहता सार्वजनिक गणेशोत्सव साजरा न होणंच आवश्यक आहे. गेले चार-पाच महिने आपण करोना संसर्गाची परिस्थिती चांगल्या पद्धतीने हाताळली आहे. आता तशीच काळजी घेतली, तर ते आपल्या सर्वासाठीच चांगलं असेल. मार्चपासूनचा काळ सर्वासाठीच अवघड आहे. कलावंतांचं तर उत्पन्नच थांबलं आहे. करोनामुळे आतापर्यंत झालेलं नुकसान मोठं आहे. पण भविष्याचा विचार करून आताच काळजी घेतली पाहिजे. सर्वाना आपापल्या घरात गणेशोत्सव साजरा करता येणारच आहे. त्यामुळे आपण या वर्षी गणेशोत्सवाकडे सकारात्मक दृष्टीने पाहायला हवं.

टाळेबंदीचा कालावधी तुझ्यासाठी कसा होता?

* टाळेबंदीच्या काळात कुटुंबाबरोबर राहता आलं. अनेकदा कामाच्या गडबडीत पुरेसा आराम करता येत नाही. तो आराम करता आला किंवा मला जे वाचायचं होतं ते वाचायला वेळ मिळाला. अभिनयाच्या दृष्टीने मला विचार करता आला. पण खरं सांगायचं, तर टाळेबंदीच्या कालावधीत मी विशेष असं काहीच केलं नाही. म्हणजे ठरवून काही नवीन शिकले असं झालं नाही. कारण तशी मानसिक स्थितीच नव्हती. आजूबाजूला खूप नकारात्मक वातावरण तयार होतं, त्यात काम सुरू नसल्यानं उत्पन्न काहीच नव्हतं. पण आता हळूहळू सगळं पूर्वपदावर येत आहे, असं वाटतं. आता सकारात्मक वातावरण तयार होतं आहे.

येत्या काळात तुझ्या कोणत्या कलाकृती येणार आहेत?

* ‘सरसेनापती हंबीरराव’ हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नाही. आता परिस्थिती पूर्वपदावर आल्यावर तो चित्रपट प्रदर्शित होईल.