News Flash

‘त्यांची’ भारतविद्या : अजिंठा चित्रशोधाची दिंडी

जॉन ग्रिफिथच्या चित्रांमुळे आणि पुस्तकामुळे अजिंठ्याबद्दलची उत्सुकता चांगलीच चाळवली गेली होती.

चित्रकारांइतकाच इतिहास संशोधकांनाही अजिंठ्याचा चुंबक सतत खेचत राहिला आहे.

|| प्रदीप आपटे

गिल, ग्रिफिथनंतर अजिंठ्यात र्हेंरगहॅम आल्या, त्यांनी टेम्पराच्या तंत्राने चित्रे नकलली आणि पुस्तकेही लिहिली. पण अजिंठ्याच्या संशोधनाला कलाटणी मिळाली ती डॉ. वॉल्टर स्पिंक यांच्या संशोधनामुळेच…

कुमार गंधर्वांनी प्रथम वेरुळ लेणी पाहिली तेव्हा ते भारावून थक्क झाले. त्या अनुभवाने त्यांना बिहागमध्ये बंदिश स्फुरली. त्या बंदिशीमध्ये ‘कौन कैसन करम कर राख्यो है। आंखों में न भराए, रमाए’ असे उद्गार आहेत. अजिंठ्याबद्दल संशोधक आणि चित्रकारांची नेमकी अशीच अवस्था आहे. युरोपमध्ये देखील भित्तिचित्रकलेची परंपरा होती. पुनरुज्जीवन काळामध्ये त्या परंपरेलाही पुन्हा नवीन उजाळा आला. पण अजिंठा लेण्यांमधील चित्रांनी युरोपीय अभिरुचीला एक निराळे साक्षात्कारी दर्शन लाभले. या दर्शनामुळे परकीयांची दोन तऱ्हेची चौकस मोहिनी अजिंठ्याभोवती रुंजी घालते आहे. एकीकडे या कलेतली शैली आणि तंत्रे आणि दुसरीकडे त्यामध्ये दडलेला इतिहास! या मोहक आव्हानांचा चिकित्सक आढावा फार मोठा आहे. वानगीदाखल त्यातले काही शेलके बघितले तरी पुरे!

जॉन ग्रिफिथच्या चित्रांमुळे आणि पुस्तकामुळे अजिंठ्याबद्दलची उत्सुकता चांगलीच चाळवली गेली होती. ख्रिस्तिआना हेरिंगहॅम या एक नाणावलेल्या चित्रकार होत्या. पण चित्रकारीइतकाच त्यांचा जीव महिलांना निवडणुकीत मतदान अधिकार मिळावा यासाठी चाललेल्या चळवळींमध्ये देखील गुंतला होता. अनेक चित्रसज्जांमध्ये चित्रांची आवृत्ती बनवण्याचे काम त्या करत. त्या काळात जलरंगासोबतीने अंड्याचा पांढरा बलक किंवा दुधापासून मिळणारे चीजसारखे ‘कॅसें’  मिसळून रंग वापरले जात. ही रीत प्राचीन आहे. तिला टेम्परा पद्धती म्हणतात. या पद्धतीला पुनश्च उजाळा देणारा प्रघात काही चित्रकारांनी सुरू केला होता. अशा चित्रकारांनी ‘सोसायटी ऑफ पेंटर्स इन टेम्परा’ अशी संस्थासुद्धा काढली होती. हेरिंगहॅम त्या संस्थेच्या संस्थापकांपैकी. ‘वुइमेन्स गिल्ड ऑफ आर्ट्स’ संस्थेच्याही त्या संस्थापक होत्या. त्या काळी ब्रिटिश म्युझियमच्या ‘छपाई आणि रेखाटन’ विभागाचा लॉरेन्स बिनयॉन हा प्रमुख होता. बिनयॉन याने दिलेल्या सूचना आणि प्रोत्साहनामुळे भारतातील प्राचीन चित्रकलेकडे हेरिंगहॅम यांचे लक्ष वेधले गेले. १९०६ साली त्यांनी प्रथम बुद्धाच्या भव्य मूर्तीचे मोठे रेखाटन केले. बिनयॉन त्यामुळे प्रभावित झाला. बिनयॉनच्या प्रोत्साहनामुळे १९०९-१० सालच्या हिवाळ्यात सहा आठवडे आणि पुन्हा १९१०-११ साली हिवाळ्यातले तीन महिने अजिंठ्याला त्या मुक्काम ठोकून राहिल्या. त्याकाळात अजिंठा परिसर निजामशाहीत होता. पण ‘ब्रिटिश म्युझियम’मुळे निजामाची ‘मेहेरबान परवानगी’ आणि ‘संरक्षण’ मिळाले. तिथली भौगोलिक स्थिती, गैरसोयी आणि सुविधांचा अभाव, रोजचा तीन साडेतीन तासांचा जिकिरीचा प्रवास या अडचणी होत्याच. सहकाऱ्यांच्या कामाची देखरेख, त्यांना सूचना सुधारणा देणे तर सतत चालू होतेच. पण त्याच जोडीने सहकारी आजारी पडणे, मग त्यांची शुश्रूषा, भेट देणाऱ्या पाहुण्यांचे आगतस्वागत एवढे सगळे झपताल त्या उत्साही जिद्दीने सांभाळत होत्या. त्यांचा एक फ्रेंच सहकारी चार्लस म्यूलरने या छावणीची रोजनिशी लिहिली आहे. त्यात तो म्हणतो, ‘‘दिवसाची भाजणारी भट्टी असो की रात्रीची बोचरी थंडी, वटवाघळांच्या विष्ठेने माखून निघाल्या, डोळ्यात घाण पडून वैताग झाला तरी यांचा दुर्दम्य उत्साह काही मागे हटत नसे. मचाणावर शिडीवर चढून प्रतिकृती रेखाटण्यात, रंगविण्यात काही बाधा पडत नसे’’. त्यांच्या प्रकल्पातली आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे त्यांना लाभलेले सहकारी! अवनीन्द्रनाथ टागोर (रवीन्द्रनाथांचे पुतणे) यांच्या साहाय्यामुळे कलकत्ता स्कूल ऑफ आर्टमधील पाच विद्यार्थी त्यांच्या चमूत दाखल झाले. त्यातले दोघे जण पुढे भारतीय चित्रकलेतील नव-पुनरुज्जीवनाचे दिग्गज म्हणून ख्याती पावले. पहिले म्हणजे असितकुमार हलधर आणि दुसरे नन्दलाल बोस! (शांतिनिकेतनमध्ये ‘अरे वृक्ष खालून वर वाढतात, ती गती पकडायला आपली नजर आणि हातपण तसा गेला पाहिजे’ असं सत्यजीत रायना शिकविणारे!)

हेरिंगहॅमनी आपल्या ‘प्रतिकृती चित्र’ संग्रहाच्या सोबत एक निबंधवजा टिपण लिहिले आहे. ‘ए नोट ऑन दि हिस्टरी अँड कॅरॅक्टर ऑफ पेंटिंग्ज’. रॉबर्ट गिल आणि जॉन ग्रिफिथप्रमाणेच या चित्रकर्तीलादेखील मोठा विस्मय वाटला. दृश्यातले वातावरण, त्यातली विविध‘वंशी’ माणसे, प्राणी, वनस्पती यांचे आकार, निरनिराळ्या कथनातले रेखाटन करताना त्यांचे बदललेले शारीरिक प्रमाण, भाव व्यक्त करण्यासाठी रेखलेली बोटे, हात, डोळे, उभे राहण्याची किंवा बसण्याची ढब, जनावरांच्या डोळ्यातील भाव, त्यांची हालचाल सुचविणारी ठेवण, चित्रणात उतरवलेली रेषांची गती ही अनोळखी शैलीची द्योतके त्यांनी मुद्दाम नोंदलेली आहेत. त्यांनी म्हटले आहे ‘‘या चित्रकारांना अंगविन्यास चितारण्याची कला कमालीची अवगत आहे. प्राणी असोत वा व्यक्ती, त्यांचे उठणे-बसणे चालणे, हातवारे, हावभाव, त्यातले सौंदर्य त्यांनी अपार जाणलेले आहे. हे सगळे ज्या लीलया केले आहे… त्यावरून चित्रकारांची तालीम फार उच्च दर्जाची आहे हे सहजी कळून येते. पानाफुलांचे रेखाटन अतीव सुंदर आहे. चित्रांमध्ये पाहताक्षणीच गोचर होणाऱ्या अनेक गती आहेत… काही रंगसंगती तर फार विविध आणि विशेष रोचक आहेत.’’

अर्थातच हेरिंगहॅम यांची रंग वापराची परंपरा गिल वा ग्रिफिथपेक्षा निराळी आहे. त्यांच्या हुकमी टेम्परा पद्धतीने ही चित्रे बनविलेली आढळतात. ग्रिफिथच्या ग्रंथाप्रमाणेच हेरिंगहॅमची पुस्तके देखील आंतरजालावर उपलब्ध आहेत. अर्काईव्ह.ऑर्ग या आभासी ग्रंथागारात ती मिळतील! जिज्ञासूंनी ती जरूर बघावी.

अजिंठा चित्रांची प्रतिकृती घडविण्याला असाच आणखी एक प्रकल्प साकार झाला होता. गुरुदेव रवीन्द्रनाथ ठाकूरांनी अराई काम्पो नावाच्या जपानी कलाकाराला निमंत्रण देऊन बोलावले होते. जपानी शैली आणि चित्रपद्धती शिकविण्यासाठी! १९१६ ते १९१८ या दोन वर्षांमध्ये त्याने जपानी कागदांवर या चित्रांच्या गिरविलेल्या प्रती करून घेतल्या. ही रेखाचित्रे तोक्यो इम्पिरिअल म्युझियममध्ये ठेवली गेली. पण १९२३ साली भूकंपामध्ये त्या नाश पावल्या! गिल आणि ग्रिफिथची चित्रे आगींमध्ये भस्मसात झाली होती. जणू ‘जे काही उपजते ते लय पावते’ हे ‘अनित्यतत्त्व’ अजिंठा प्रतिकृती चित्रांच्या भलतेच हात धुवून मागे लागले होते!!

चित्रकारांइतकाच इतिहास संशोधकांनाही अजिंठ्याचा चुंबक सतत खेचत राहिला आहे. त्या संशोधनाचा, त्यामधल्या वर्णनांचा आणि वादविवादांचा पसारा फार मोठा आहे. पण त्यामधला एक शोधप्रवास मोठा विलक्षणीय आहे. त्याचे कर्ते डॉ. वॉल्टर स्पिंक. अजिंठा लेण्यांपैकी पाच लेणी पूर्ण चित्रांकित लेणी आहेत. तीन अर्धवट म्हणावी अशी आहेत. १३ लेण्यांत जेमतेम सुरुवात म्हणावी एवढीच प्रगती आहे. आणि उरलेल्या लेण्यांत चित्रकारीचा मागमूसही नाही! अजिंठा लेणी सुमारे इसवी सन ४५० ते ६५० या काळात टप्प्याटप्प्याने घडत गेली अशी इतिहासकारांची धारणा होती. पण डॉ. वॉल्टर स्पिंक यांच्या संशोधनाने या समजुतीला आरपार छेद दिला आणि विवादांचा भोवरा उफाळला. स्पिंक यांनी अजिंठ्याचे केलेले निरीक्षण अगदी छोट्यामोठ्या तपशिलांनी बहरलेले आहे. निष्णात शल्यविशारदाला अगदी केसाहून बारीक रक्तवाहिनी माहीत असावी तशी त्यांनी धारदार सूक्ष्म नजरेने लेण्यांची न्याहाळणी केलेली आहे. त्यात काय नाही? ‘दरवाजे आत उघडणारे की बाहेर उघडणारे? ते कसे कधी कुठे वेगळे झाले? चित्रांवरची भिंतीवरची छिद्रे कसली? खिळ्यांची छिद्रे कुठली? खपल्या कुठल्या? अशा तपशिलांपासून नजीकच्या घटोत्कच लेण्यामधल्या शैलीचे असलेले साधर्म्य, बदामी लेणी आणि घारापुरी लेणीमधले शिल्पशास्त्रीय भेद, त्यांचा कालक्रम ठरविण्यात आलेला विपरीतपणा, म.म.वि.वा. मिराशींच्या ताम्रपट / शिलालेख वाचनातून साकारणारे कालदर्शन, दण्डीकृत दशकुमारचरितातील वर्णन… अशा भल्यामोठ्या पटावरचे त्यांचे संशोधनपर लिखाण आहे. आणि मुख्य म्हणजे या सगळ्या अवाढव्य व्यापाची सांगड घालणारे तर्कसूत्र त्यांच्या लिखाणामध्ये (आणि सोबतच्या रेखाटन व चित्रसंग्रहामध्ये)आहे. त्यांनी काढलेला निष्कर्ष भलताच खळबळजनक ठरला.

अगदी ढोबळ स्वरूपात सांगायचे तर त्यांचे प्रतिपादन असे आहे : वाकाटक साम्राज्याचा सम्राट हरिषेण याचे राज्य कलिंगापासून कोकणपर्यंत पसरले होते. पण त्याच्या १७ वर्षाच्या राजवटीअखेरीला अश्मक राज्यांच्या धुरीणांनी कट करून हरिषेणाचा मृत्यू घडवून आणला. पण या बंडाळीच्या धामधुमीमध्ये युद्धाचे सावट असूनदेखील घाईगर्दीने या लेण्यांची निर्मिती चालू राहिली. या घाईगडबडीचे पडसाद देखील या अद्वितीय कलाकृतीमध्ये आढळतात. परिणामी हरिषेणाच्या १७ वर्षांच्या राजवट काळात आणि तीदेखील अखेरीच्या धामधुमी वर्षांसकट अजिंठ्याची लेणी निर्मिली गेली. असे अप्रतिम लेणे घडविणारे कलावंत त्या काळात पुरेशा बळाने आणि संख्येने उपलब्ध होते. कार्यरत होते. भित्तिचित्रांमध्ये दिसणारे सुवर्णवैभव हे त्या काळातले आहे. आणि त्यांच्या निर्मितीचा कालावधी २०० वर्षे नसून अवघा २० वर्षांइतका आहे! हा अर्थात त्यांच्या जटिल युक्तिवादाचा ‘एकश्लोकी रामायण’सारखा त्रोटक सारांश आहे. स्पिंक यांनी जवळपास ७० वर्षीय कारकीर्द अजिंठा इतिहास आणि कला आणि संलग्न अध्ययनात व्यतीत केली होती. अजिंठ्यावरील संशोधनाचे सात खंड आहेत. वर अगदी त्रोटक सारांशाने दिलेला निष्कर्ष त्यांच्या ‘खंड दोन’मध्ये सविस्तरपणे मांडलेला आहे. अर्थातच ही अजिंठा संशोधनाची दिंडी अजूनही संपुष्टात आलेली नाही. देशी संशोधकांबरोबरच जेम्स फग्र्युसन, जेम्स बर्गेस ते स्पिंक या विदेशी वारकऱ्यांसहित!

लेखक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सुप्रतिष्ठ प्राध्यापक असून ख्यातनाम अर्थतज्ज्ञ आणि विचक्षण अभ्यासक आहेत.

pradeepapte1687@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 11, 2021 12:21 am

Web Title: ajanta picture search europe tradition of graffiti john griffith women guild of arts akp 94
Next Stories
1 बेबंद निर्बंध नकोत!
2 सोलापूरची केळी आता परदेशात!
3 शेतीपूरक मत्स्यउद्योगातील नवे तंत्रज्ञान
Just Now!
X