रूढी, परंपरा यांच्या नावाखाली स्त्रियांना धर्माकडून नेहमीच दुय्यमत्वाची वागणूक दिली गेली आहे. धर्मग्रंथात काही वेळा थेट उल्लेख नसले तरी त्याचे सोयिस्कर अर्थ लावून स्त्रियांना प्रमुख स्थानापासून दूर ठेवण्यात आले. स्त्रियांना स्वावलंबी, स्वतंत्र जगायचे असल्यास धर्म नाकारण्यातच शहाणपणा आहे. मात्र ज्यांना हे टोकाचे पाऊल वाटत असेल किंवा त्याआधीची पायरी म्हणून स्त्रीला दुय्यमपणा देणाऱ्या रूढी, परंपरांचे अंधपणे पालन करणे टाळायला हवे, असे मत ती आणि धर्म या चर्चासत्रात व्यक्त करण्यात आले.

धर्मात अधिक दुजाभाव

कमीअधिक प्रमाणात सर्वचधर्म़, परंपरांनी महिलांवर अन्याय केला असला तरी मुस्लीम धर्मात दुजाभावाचे प्रमाण अधिक आहे. १९९३ नंतर मुस्लिमांवर वेगळी ओळख लादण्याचा प्रयत्न सुरू झाला. बुरखा पद्धत आता अधिक दिसू लागली आहे. सध्या बुरखा पद्धतीत स्त्रिया नखशिखान्त शरीर झाकून घेतात. खरे तर महम्मद पैगंबरांनाही ते अभिप्रत नसावे. बुरखा म्हणजे मर्यादा. स्त्री व पुरुष या दोघांनीही आपल्या वागण्यात भान ठेवावे. भौगोलिक आणि सामाजिक स्थितीनुसार पेहेराव, भाषा, काही चालीरीती बदलणे स्वाभाविक आहे. केवळ स्वतंत्र ओळख जपण्यासाठी विशिष्ट पेहेरावाचा आग्रह धरणे चुकीचे आहे. पूर्वी कोकणी मुसलमान सहजपणे खुदा हाफीज म्हणत होते. ते आता अल्ला हाफीज म्हणू लागले आहेत. कुराणातील मजकुराचा शब्दश: अर्थ शिकविला जातो. मात्र त्याचा अन्वयार्थ कुणीच समजून देत नाही. हिंदू परंपरेत आता धर्मविषयक संकल्पनांविषयी खुली चर्चा होऊ लागली आहे. तशीच ती मुस्लीम धर्माविषयीसुद्धा होणे अपेक्षित आहे. ‘तलाक’विषयी बरेच गैरसमज आहेत. मुस्लिमांमध्ये लग्न हा एक करार असून तो मोडण्याचा पुरुषांप्रमाणे स्त्रियांनाही अधिकार आहे. त्याला खुल्ला म्हटले जाते. मात्र महम्मद पैगंबराने स्त्रियांना दिलेला हा अधिकार पुरुषप्रधान संस्कृतीने डावलला. धर्मग्रंथातील उल्लेखांचा सोयीनुसार अर्थ लावला जाऊन महिलांवर बंधने लादली गेली. स्त्रियांना शिक्षण आणि स्वातंत्र्य या दोन अधिकारांपासून वंचित ठेवण्याबाबत सर्व धर्माचे एकमत दिसते.

प्रा. मोहसिना मुकादम

बंधने झुगारावी लागतील..

गाईला तासाआड आणि बाईला दिसाआड मारा म्हणजेच ती उत्तम काम करू शकेल, अशी शिकवण देणाऱ्या धर्माकडून स्त्रियांना न्याय मिळणे अशक्य आहे. ‘यत्र नार्येस्तु पूज्यंते’ असे म्हटले जात असले तरी त्यातील पूज्यंतेचा अर्थ अलंकारांनी मढलेली असा आहे. म्हणजे अगदी पूर्वापार अंगावरील सोन्याच्या दागिन्यांवरून तिची किंमत ठरवली गेली. हिंदू धर्मात राहून दलित समाजाला न्याय मिळणार नाही, हे लक्षात आल्यावर बाबासाहेबांनी अनुयायांसह बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. बौद्ध धर्मीयांमध्ये हिंदू धर्माच्या तुलनेत अतिशय कमी म्हणजे जन्म, लग्न आणि मृत्यू असे तीनच संस्कार आहेत. पुन्हा त्यातील प्रतीके वस्तुस्थितीला धरून आहेत. खरे तर ज्याला आपण धर्म म्हणतो त्यात स्त्रियांना कोणतेही स्थान नाही. आपल्याकडे पुत्रप्राप्तीचे विविध उपाय सांगितले आहेत. मात्र स्त्रियाच नसतील तर पुरुष कसे काय जन्म घेऊ शकतील, याचा कुणी विचार करीत नाही. महाभारत असो वा आताचे आधुनिक भारत महिलांवर अन्याय, अत्याचार सुरूच आहेत. महिलांनाही या अन्यायाचे काही वाटेनासे झाले आहे. लग्नानंतर स्त्रिया मोठय़ा हौसेने गळ्यात जे मंगळसूत्र घालतात, त्यातील वाटी म्हणजे पुरुषाच्या लिंगाचे प्रतीक आहे. स्त्रियांनी कायम पुरुषांच्या दयेवरच, दुय्यम आयुष्य जगावे, असेच धर्म आणि परंपरेला अभिप्रेत असलेले दिसते. त्यामुळेच माणूस म्हणून जगायचे असेल तर ही बंधने झुगारून देणे आवश्यक आहे.

ऊर्मिला पवार

रूढींच्या नावाने अन्यायाचा संस्कार

संस्कृतीची एक शाखा असणाऱ्या धर्माने जगभरात महिलांचा उपमर्दच केला आहे. स्त्रिया सर्वप्रथम गुहेमध्ये स्थिरावल्या. त्यातून मातृसत्ताक टोळ्यांचा उदय झाला. मात्र त्यानंतर आलेल्या व ‘मारा आणि मिळवा’ हे धोरण असणाऱ्या पुरुष टोळ्यांनी स्त्रियांना भोगवस्तू ठरवून त्यांचे सर्व अधिकार काढून घेतले. पुरुषांना पितृत्वाची जाणीव खूप नंतरच्या काळात झाली. मात्र त्या अधिकाराची जाणीव झाल्यावर त्यांनी स्त्रियांवर बंधने लादण्यास सुरुवात केली. हिंदू संस्कृतीत मातृसत्ताक आणि पुरुषसत्ताक टोळ्यांमधील संघर्ष हा देव-दानव, राम-रावण कथांद्वारे मांडण्यात आला. शूर्पणखेचा चेहरा विद्रूप करणारा आणि पत्नी सीतेला अग्निपरीक्षेला सामोरे जाण्यास भाग पाडणारा राम आपल्याकडे मर्यादापुरुषोत्तम ठरविला गेला. स्त्रिया मातृसत्ताक संस्कृतीच्या वाहक तर क्षुद्र वर्णीय चालक होते. त्यामुळेच पुढील काळात त्यांच्यावर र्निबध लादले गेले. मातृसत्ताक पद्धतीत मुक्त शरीरसंबंध होते. पुरुषप्रधान संस्कृतीत त्याला वेश्या व्यवसायाची अवकळा प्राप्त झाली. स्त्रियांना शिक्षणाचे संस्कार नाकारले गेले. चरितार्थाचा अधिकार त्यांच्यापासून हिरावून घेतला गेला. त्या कायम पुरुषांच्या वर्चस्वाखाली राहतील, अशी व्यवस्था पद्धतशीरपणे तयार केली गेली. त्याला रूढी, परंपरांचे नाव देण्यात आले. या अन्यायकारक संस्कारांचा प्रभाव शंभरएक वर्षांत नाहीसा होणे अशक्य आहे. मात्र मातृसंस्कृतीच्या या इतिहासाचा शिक्षणात अंतर्भाव केला तर याबाबतच्या बऱ्याचशा अंधश्रद्धा दूर होण्यास मदत होईल.

मंगला सामंत