आज तरी जयललिता पुन्हा बाजी मारतील, असे चित्र असले तरी  दोन महिन्यांत काय राजकीय घडामोडी घडतात यावरही बरेच अवलंबून आहे. जयललिता यांनी सत्ता कायम राखल्यास  करुणानिधी यांच्या राजकारणाची ती अखेर असेल..

तामिळनाडू विधानसभेच्या २३४ जागांसाठी १६ मे रोजी मतदान होत असले तरी राजकीय वातावरण निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच तापले आहे. अण्णा द्रमुकच्या जे. जयललिता आणि द्रमुकचे एम. करुणानिधी या पारंपरिक राजकीय विरोधकांमध्ये पुन्हा एकदा सामना रंगणार आहे. निवडणुकीचा कार्यक्रम शुक्रवारी जाहीर झाला असला तरी त्याआधी दोन दिवस मुख्यमंत्री जे. जयललिता यांनी राजकीयदृष्टय़ा मोठी खेळी करून सर्वच राजकीय पक्षांची कोंडी केली आणि राज्याचे राजकारण ढवळून काढले. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्याकांडातील जन्मठेपेची शिक्षा झालेल्या सात जणांची तुरुंगातून सुटका करण्यासाठी केंद्र सरकारला पुन्हा एकदा प्रस्ताव पाठवून तामीळ अस्मितेचा मुद्दा पुढे आणला आहे. तामीळनाडूतील राजकारण हे लाटेवर चालते. १९९१ पासून म्हणजेच गेली २५ वर्षे सत्तेत असलेला पक्ष पुन्हा लागोपाठ दुसऱ्यांदा सत्तेत आलेला नाही. या राज्यातील मतदार एकदा जयललिता  तर पुढील निवडणुकीत करुणानिधी यांच्या पारडय़ात भरभरून मते टाकतात. जयललिता पुन्हा बाजी मारतील, असे चित्र असले तरी पुढील दोन महिन्यांत कशा राजकीय घडामोडी घडतात यावरही बरेच अवलंबून आहे. जयललिता यांनी सत्ता कायम राखल्यास ९२ वर्षीय एम. करुणानिधी यांच्या राजकारणाची अखेर असेल, असे मानले जाते.

महाराष्ट्रात मराठीचा मुद्दा निवडणुकीच्या राजकारणात तेवढा प्रभावी ठरत नाही. २००९च्या निवडणुकीत राज ठाकरे यांच्यामुळे मराठीच्या मुद्दय़ावर मतदान झाले होते. पण तामिळनाडूमध्ये तामीळ किंवा आंध्र प्रदेशात तेलगू हे मुद्दे अस्मितेचे ठरतात. राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांची तुरुंगातून सुटका करावी, अशी मागणी जयललिता यांनी करताच त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी एम. करुणानिधी यांनीही तोच सूर लावला. वास्तविक करुणानिधी यांच्या द्रमुकने काँग्रेसबरोबर आघाडी केली असली तरी तामीळ अस्मितेचा मुद्दा प्रतिकूल ठरू शकतो हे लक्षात घेऊनच करुणानिधी यांना जयललिता यांच्या सुरात सूर मिसळावा लागला. प्रादेशिक पक्षांच्या तुलनेत काँग्रेस व भाजप या राष्ट्रीय पक्षांचे अस्तित्व तसे नगण्यच आहे. राजीव गांधी यांचे मारेकरी असल्याने त्यांच्या सुटकेला काँग्रेसचा ठाम विरोध आहे. पण भाजपने मध्यममार्ग पत्करला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आरोपींच्या सुटकेबाबत निर्णय घेतला जाईल, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी जाहीर केले आहे. या मारेकऱ्यांच्या सुटकेचा विषय निवडणुकीच्या प्रचारात मुद्दा होऊ शकतो.

आघाडय़ांचे राजकारण

जयललिता यांचे आव्हान असल्यानेच द्रमुकचे नेते एम. करुणानिधी यांनी काँग्रेसला आघाडीचे निमंत्रण दिले आणि काँग्रेसने कोणत्याही अटींविना आघाडी केली. एरव्ही काँग्रेसकडून जागा किती मिळणार हा मुद्दा शेवटपर्यंत घोळवत ठेवला जातो. १९४७ ते ६७ अशी तीन दशके तामिळनाडूची सत्ता भूषविलेल्या काँग्रेसला १९६७ नंतर मतदारांनी झिडकारले. जवळपास ५० वर्षे काँग्रेसला दुय्यम भूमिकेत वावरावे लागत आहे. माजी गृहमंत्री पी. चिदम्बरम यांच्या मुलाच्या मालमत्तेचा विषय येताच अण्णा द्रमुकच्या सदस्यांनी लोकसभेचे कामकाज बंद पाडले. द्रमुक-काँग्रेस युतीला बदनाम करण्याकरिताच अण्णा द्रमुकने ही खेळी केली. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला भोपळा फोडता आला नव्हता. यंदा द्रमुकवर काँग्रेसची सारी मदार आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत जयललिता यांच्याबरोबर युती करून दुसऱ्या क्रमांकाच्या जागा मिळालेल्या चित्रपट अभिनेता विजयकांत यांचा डीएमडीके हा पक्ष यंदा द्रमुक-काँग्रेसबरोबर आघाडी करण्याची शक्यता आहे.  कर्नाटकनंतर तामिळनाडू आणि केरळ या दोन राज्यांमध्ये पक्षाची ताकद वाढविण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. पण प्रादेशिक पक्षांच्या राजकारणात भाजपचाही निभाव लागलेला नाही. लोकसभा निवडणुकीत देशभर मोदी यांची लाट होती, पण तामिळनाडूमध्ये कन्याकुमारीचा अपवाद वगळता भाजपला यश मिळू शकले नाही. पंतप्रधान मोदी आणि जयललिता यांचे संबंध उत्तम असले तरी जयललिता ऊर्फ अम्मा यांना भाजपशी आघाडी करणे राजकीयदृष्टय़ा फायदेशीर ठरणारे नाही. दक्षिण भागातील मुस्लिम मतदारांची संख्या लक्षात घेता त्या भाजपबरोबर खुली आघाडी करण्याचा धोका पत्करणार नाहीत. पडद्याआडून अण्णा द्रमुक आणि भाजपमध्ये काही जागांवर समझोता होऊ शकतो. मात्र देशाची एकहाती सत्ता मिळालेल्या भाजपसाठी तामिळनाडूमध्ये फार काही आशादायी चित्र नाही. ज्या काही जागा मिळतील ते भाजपसाठी यशच मानावे लागेल.

जयललिता यांना बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी मध्यंतरी तुरुंगवास भोगावा लागला. द्रमुकचे नेते करुणानिधी यांची कन्या आणि खासदार कनिमोळी व पक्षाचे नेते राजा हे टूजी घोटाळ्यात तुरुंगात जाऊन आले आहेत. दोन्ही प्रमुख पक्ष भ्रष्ट असल्याचा आरोप करीत माजी केंद्रीय आरोग्यमंत्री अंबुमणी रामोदास यांच्या पट्टाली मक्कल काटची (पीएमके) पक्षाने तिसरी आघाडीच्या माध्यमातून पर्याय उभा करण्याचा प्रयत्न केला आहे. चित्रपट अभिनेते विजयकांत हे द्रमुक, भाजप वा पीएमके या सर्वच पक्षांबरोबर आघाडीकरिता बोलणी करीत आहेत.

अम्मा आघाडीवर

लागोपाठ दुसऱ्यांदा सत्ता मिळत नाही, असा तामिळनाडूचा अलीकडचा इतिहास असला तरी सध्याच्या राजकीय परिस्थितीत मुख्यमंत्री जयललिता यांच्या अण्णा द्रमुक पक्षाला पुन्हा सत्तेत येण्याची संधी असल्याचे चित्र आहे. अम्मांचा वर्चस्वाला रोखण्याकरिताच करुणानिधी यांनी काँग्रेस व अन्य पक्षांपुढे सहकार्याकरिता हात पसरला आहे. द्रमुकमध्ये सारे काही आलबेल नाही. करुणानिधी यांनी आपले राजकीय वारस एम. के. स्टॅलिन यांच्याकडे पक्षाची सूत्रे राहतील, अशी व्यवस्था केली आहे. दुसरे पुत्र एम. के. अलगिरी यांना पक्षाचे दरवाजे बंद करून द्रमुकमध्ये बंडखोरी वा स्टॅलिन यांच्या नेतृत्वाला आव्हान मिळणार नाही याची खबरदारी करुणानिधी यांनी घेतली आहे. अलीकडेच ‘नम्मकू नमे’ अशी राज्यभर यात्रा काढून स्टॅलिन हे निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत. कोणत्याही परिस्थितीत सत्ता मिळवायचीच हे त्यांचे उद्दिष्ट आहे. मुख्यमंत्रीपदाच्या काळात झालेली अटक, सरकारच्या कारभारावरून झालेले भ्रष्टाचारांचे आरोप किंवा डिसेंबरमधील चेन्नईचा महापूर योग्यपणे हाताळण्यात सरकारला आलेले अपयश व सत्ताधाऱ्यांच्या विरोधातील असलेली नाराजी हे मुद्दे जयललिता यांच्यासाठी तापदायक ठरत असले तरी समाजातील तळागाळातील जनतेसाठी विविध योजना राबवून जयललिता यांनी त्यांची प्रतिमा उंचावेल, असा प्रयत्न केला आहे. आपले राजकीय गुरू एमजी अण्णा रामचंद्रन यांच्याप्रमाणेच लागोपाठ दुसऱ्यांदा सत्तेत येण्याचा निर्धार करूनच अम्मा रिंगणात उतरल्या आहेत. पाच वर्षांने सत्तेत दुसऱ्यांदा संधी द्यायची हा कल तामिळनाडूमधील जनता कायम ठेवते का, यावरच अम्मा किंवा करुणानिधी यांचे भवितव्य अवलंबून आहे.