खासदारांचा सातबारा
लोकसभेच्या निवडणुकांचे ढोल-ताशे वाजण्यास सुरुवात झाली आहे. आणखी काही महिन्यांतच आपले
‘तडफदार आणि लाडके’ उमेदवार मतांचे दान मागण्यासाठी मतदारराजाच्या दारी येतील. अशा वेळी गेल्या निवडणुकीत आपण ज्यांना निवडून दिले त्यांनी लोकांसाठी नेमके काय केले? पाच वर्षांत विकासाची कोणती कामे केली? किती निधी खर्च केला? त्यांच्याबद्दल मतदारांचे, विरोधकांचे काय म्हणणे आहे? याची पक्की नोंद दर रविवारी.. खासदारांचा सातबारा मध्ये..
पुढील रविवारी
नांदेड, अमरावती

शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातच चुरस
मुंबई, ठाण्यानंतर शिवसेनेने बाळसे धरले ते औरंगाबादमध्ये. १९८५ मध्ये शिवसेनेने मुंबई महापालिकेची निवडणूक जिंकली आणि हळूहळू मराठवाडय़ात बस्तान बसविले. नामांतर आंदोलन आणि धार्मिक तेढ हे दोन मुद्दे शिवसेनेला फायदेशीरच ठरले. १९८९ पासून सातत्याने या मतदारसंघावर  शिवसेनेचे वर्चस्व राहिले आहे. मोरेश्वर सावे, प्रदीप जयस्वाल यांच्यानंतर १९९९ पासून चंद्रकांत खैरे सतत निवडून येत आहेत. खैरे हे लोकसभेत बसतात खरे, पण त्यांचे सारे लक्ष हे औरंगाबाद महापालिकेत असते, असा त्यांच्याबद्दल नेहमीच आक्षेप घेतला जातो. उद्योगजगताशी जवळचे संबंध ठेवणारे खैरे यांचे साऱ्याच पक्षांतील नेत्यांबरोबर उत्तम संबंध आहेत. त्याचा त्यांना राजकीय फायदाही होतो. खैरे यांच्याबाबत पक्षांतर्गत रोष अलीकडे वाढू लागला आहे. त्यांच्या निर्णयांना आप्तस्वकीयांचा विरोध होतो. महापालिकेत त्यांचे जास्त लक्ष इतरांना सलते. हा मतदारसंघ प्रामुख्याने शहरी असून, महापालिकेत अनेक वर्षे शिवसेनेची सत्ता आहे. औरंगाबाद शहराच्या दुरवस्थेस शिवसेनेला दोष दिला जातो. असे असले तरी कोणत्याही निवडणुकीपूर्वी धार्मिक कट्टरता या मुद्दय़ावर शिवसेनेचा फायदाच होतो, असा अनुभव आहे. आताही तसे प्रयत्न सुरू झाल्याचे बोलले जाते. हैदराबादस्थित मजलीस -ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एमआयएम) या संघटनेने मराठवाडय़ात हळूहळू विस्तारण्यास सुरुवात केली आहे. अलीकडेच झालेल्या नांदेड महापालिका निवडणुकीत या संघटनेने चुणूक दाखविली. दुसरीकडे काँग्रेसमध्ये आनंदीआनंदच आहे. शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा हे मतदारसंघाच्या बाहेर लक्ष देत नाहीत. स्थानिक काँग्रेस गटातटात विभागली गेली असली तरी विधान परिषदेच्या औरंगाबाद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात अलीकडेच शिवसेनेचे आमदार तनवाणी यांचा पराभव करून काँग्रेसचे झांबड हे निवडून आल्याने काँग्रेसजनांचा उत्साह वाढला आहे.
गेल्या वेळी शांतीगिरी महाराजांना सुमारे दीड लाखांच्या आसपास मते मिळाली होती. तिरंगी लढतीत खैरे हे निवडून आले होते. यंदा शांतीगिरी महाराजांनी हाताचा पंजा घ्यावा म्हणून काँग्रेसजन कामाला लागले आहेत. एकूणच बालेकिल्ल्यात शिवसेनेसाठी लढत यंदा चुरशीची होणार आहे.
लोकसभा मतदारसंघ : औरंगाबाद
विद्यमान खासदार : चंद्रकांत खैरे (शिवसेना)
मागील निकाल : काँग्रेसचे उत्तमसिंह पवार यांचा पराभव.
मतदारसंघातील कामगिरी :
*औरंगाबाद शहराला समांतर जलवाहिनीचा प्रस्ताव मंजूर करून आणणे हे सर्वात महत्त्वाचे काम.
*शहराला पाणीपुरवठय़ासाठी केंद्र सरकारकडून यूडीआयएसएसएमटी या योजनेतून समांतर जलवाहिनीसाठी निधीचा पहिला टप्पा  मिळवून दिला.
*बेगमपुरा थत्ते नहर राष्ट्रीय स्मारक घोषित न करण्यासाठी पाठपुरावा केल्याने २५ हजार घरांच्या बांधकामाचा प्रश्न मार्गी लावला.
*राष्ट्रीय महामार्ग क्र. २११ (सोलापूर-धुळे) चौपदरी रस्ता मंजुरीकरणासाठी प्रयत्न.
*जिल्हा विद्युतीकरणाच्या ८५ बैठका घेऊन समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न.
लोकसभेतील कामगिरी
*सभागृहात उपस्थित केलेले प्रश्न : ६२६ ’तारांकित : ४५ अतारांकित : ५८१
*नियम ३७७ अंतर्गत उपस्थित केलेले मुद्दे : ८, विशेष उल्लेख : ११, खासगी विधेयके : ६,  विविध चर्चांमध्ये सहभाग : ११ एकूण हजेरी : १९९ दिवस (३१६ दिवसांपैकी)

जनसंपर्क
दांडगा म्हणता येईल असा जनसंपर्क. उद्योगजगतापासून ते सर्वसामान्यांपर्यंत ते पोहोचतात. रात्री १२ वाजताही त्यांच्याशी संपर्क करता येतो, हे विशेष. भ्रमणध्वनीवर उपलब्ध असतात. सहसा कोणाशी बोलायचे टाळत नाही. इतर पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांशीही त्यांचे सौहार्दाचे संबंध आहेत.
महत्त्वाचे प्रश्न :
*वेगळ्या विदर्भाची निर्मिती रोखण्यासाठी पावले उचलण्याची मागणी
*वंदे मातरम्चा अवमान करणाऱ्या जमाते
उलेमा ए हिंदूवर कारवाईची मागणी
*अयोध्येतील राम जन्मभूमीवर राम मंदिर उभारण्याचा मुद्दा
*राज्य महामार्ग क्र. ६० च्या चौपदरीकरणासाठी निझाम बंगला हस्तांतरित करण्याची मागणी
*औरंगाबादमधील साईच्या क्रीडा संकुलासाठी केंद्रीय निधीची मागणी

विकासासाठी सदैव प्रयत्नशील
औरंगाबाद शहर आणि जिल्ह्य़ाच्या विकासासाठी सदैव प्रयत्न केले. केंद्रातील बहुतांश योजना औरंगाबादमध्ये याव्यात, यासाठी प्रश्न मांडले. पर्यटनाची राजधानी अशी औरंगाबादची ओळख असल्याने मेगा सर्किट योजनेतून २३ कोटी रुपये मिळविले. पासपोर्ट कार्यालय, गोलवाडी ते नगरनाका चौपदरीकरण, रस्त्यांचे प्रश्न, विद्युतीकरणाचे प्रश्न सोडविले. सोलापूर-जळगाव नवीन लोहमार्ग, पीट लाईन, शिर्डी-पुणतांबा लोहमार्गाची आग्रही मागणी केली.
खासदार चंद्रकांत खैरे

खैरे झकास; जिल्हा भकास
डॉ. रफीक झकेरिया यांनी जो नावलौकिक औरंगाबाद शहराला मिळवून दिला होता, तो खैरे यांनी धुळीला मिळविला.  त्यांनी लक्ष घातल्यामुळेच महानगरपालिका ‘महानरकपालिका’ अवस्थेत गेली आहे. शहरात अनेक उड्डाण पुलांची गरज आहे. ते काम झाले नाही. केंद्राच्या बहुतांश योजना त्यांनी आणल्याचा दावा केला असला तरी त्या योजना सुरूच झाल्या नाहीत. ठेकेदारांची साखळी उभी केली आणि आपल्याच बगलबच्च्यांना श्रीमंत केले. स्वत: खैरे झकास आणि जिल्हा मात्र भकास असेच म्हणावे लागेल.
उत्तमसिंह पवार, काँग्रेस