01 March 2021

News Flash

जे आले ते रमले.. : अलेक्झांडर किनगहॅमचे पुरातत्त्वीय संशोधन (२)

निवृत्तीनंतर त्यांना पुरातन नाणी आणि बिल्ले यांचा संग्रह आणि अभ्यास करण्याचा छंद जडला.

भारताचा पुरातत्त्वीय अनमोल सांस्कृतिक वारसा पुढील पिढय़ांसाठी सुरक्षित राहावा यासाठी झपाटले गेलेले ईस्ट इंडिया कंपनीचे लष्करी इंजिनीअर अलेक्झांडर किनगहॅम यांनी स्वत: पदरमोड करून उत्खनन आणि संशोधन केले. त्यांच्या प्रयत्नांमुळेच तत्कालीन ब्रिटिश सरकारने १८६१ मध्ये ‘ऑर्किऑलॉजिकल सव्‍‌र्हे ऑफ इंडिया’ स्थापन करून त्यांना त्याचे सर्वेक्षक म्हणून नेमले. या संस्थेच्या कार्याची व्याप्ती वाढल्यावर पुढे १८७० ते १८८५ अशी १५ वर्षे अलेक्झांडर यांनी या संस्थेचे डायरेक्टर जनरल म्हणजे महासंचालक पदावर काम केले.

प्राचीन भारतीय ऐतिहासिक स्थळे शोधून तिथले अवशेषांचे संशोधन, जतन आणि संवर्धन करण्यासाठी अलेक्झांडर यांनी चिनी प्रवासी ह्य़ू एन त्संग याच्या नोंदींचा आधार घेऊन सारनाथ, सांची येथील बौद्ध स्तुपांच्या परिसरात उत्खनन करून अज्ञात इतिहास जगापुढे मांडला.  अलेक्झांडरनी काश्मीरच्या दरीखोऱ्यांत हिंडून, तेथील मंदिर स्थापत्याचे वेगळेपण विशद करून, त्याचे नकाशे बनवले. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात त्यांनी बोधगया येथील मंदिरांचे अवशेष शोधून काढले आणि तेथील साफसफाई आणि किरकोळ डागडुजी केली. येथील प्रमुख मंदिराचे शिखर दीडशे फुटांहून अधिक उंच आहे. चिनी प्रवाशांनी त्यांच्या लिखाणात काही प्राचीन शहरांचा उल्लेख केला होता. अलेक्झांडर यांनी त्यातील तक्षिला (तक्षशिला), ओमोस, संगला, शृघना, अहिष्छत्र, बरात, सांकिसा, श्रावस्ती, पद्मावती, वैशाली, नालंदा, कौशंबी वगैरे ठिकाणे शोधून यांपैकी अनेक ठिकाणी उत्खनन आणि संशोधन केले. शाह-ढेरी येथील त्यांचे संशोधन महत्त्वाचे ठरले. निवृत्तीनंतर त्यांना पुरातन नाणी आणि बिल्ले यांचा संग्रह आणि अभ्यास करण्याचा छंद जडला. हा नाणीसंग्रह ब्रिटिश सरकारने १८९३ साली, त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नीकडून विकत घेतला.

अलेक्झांडर यांनी त्यांच्या पुरातत्त्व- संशोधनावर एकूण १२ ग्रंथ लिहिले. त्यापैकी ‘ऑर्किऑलॉजिकल सव्‍‌र्हे ऑफ इंडिया’चे तीन खंड, ‘द स्तूपा ऑफ भारत’, ‘द एन्शन्ट जिऑग्राफी ऑफ इंडिया’, ‘लडाख’, ‘कॉइन्स ऑफ एन्शन्ट इंडिया’, ‘महाबोधी’ हे विख्यात आहेत.

सुनीत पोतनीस sunitpotnis@rediffmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 4, 2018 5:03 am

Web Title: archaeological research of alexander kingham
Next Stories
1 अलेक्झांडर किनगहॅम (१)
2 थॅलिअम
3 कुतूहल : उपयोगी की घातक?
Just Now!
X