News Flash

चतु:सूत्र : कोऽयं विभेदभ्रम:?

आपण कोण आणि परके कोण हे ठरवताना या सामुदायिक स्मृती अगदी मध्यवर्ती भूमिका निभावतात.

इतिहास  राज्यशास्त्र. समाजशास्त्र. अर्थशास्त्र.

श्रद्धा कुंभोजकर

समाजविज्ञानाचे भाग असलेल्या चार शास्त्रांच्या सैद्धान्तिक दृष्टिकोनातून समकालीन विचारप्रवर्तनाच्या दिशा शोधणाऱ्या चार अभ्यासकांच्या लेखमालिकेतला हा पहिला लेख. पहिल्या आठवडय़ातलं अभ्यासक्षेत्र आहे इतिहासाचं.. 

इतिहास म्हणजे कोणता इतिहास? लिहिला गेलेला तेवढाच; की लिहिला गेला नाही तोही? लोकस्मृती किंवा सामुदायिक आठवणींच्या शास्त्रोक्त अभ्यासातून ‘इतिहास’ लिहिता येतो.. पण लोकस्मृतीत काय असावं आणि नसावं हे कसं ठरत जातं?

एकदा शंकराचार्य गंगास्नान करून येत असताना एक अस्पृश्य मानला गेलेला माणूस त्यांच्यासमोर आला. ‘बाजूला हो, मला विटाळ होईल’ असं सांगणाऱ्या शंकराचार्याना त्यानं विचारलं, ‘‘‘दूर हो, दूर हो’ असं तू म्हणतोयस खरा, पण नक्की कोणाला कशापासून तू दूर करू पाहतोयस? सूर्याचं प्रतििबब गंगेच्या पाण्यात आणि अस्पृश्याच्या अंगणातल्या डबक्यात वेगवेगळं दिसत नाही. आपल्या सर्वाठायी एकच चतन्य असेल, तर हा वेगळेपणाचा खोटा भेद कशासाठी? कोऽयं विभेदभ्रम:?’’  त्याच्या म्हणण्याची सत्यता जाणवून हा आपल्या गुरुस्थानी असल्याची शंकराचार्याना खात्री पटली. शंकराचार्यानी १२०० वर्षांपूर्वीच माणसांमाणसांमधले भेद हे भ्रामक आहेत असं सांगितलं, तरी आज आपण अधिकच कृत्रिम असे भेद जिवापाड जपत आहोत. परक्या जातीचे, वेगळ्या धर्माचे, निराळ्या लैंगिक धारणा असणारे, आपल्या देशाचं नागरिकत्व सिद्ध करू शकत नसणारे, अशा अनेक माणसांना कायदेशीर भाषेत ‘दूर हो’ असं सांगताना खरं तर माणूस म्हणून आपण एक आहोत या सत्याकडे डोळेझाक करत आहोत.

‘आपण’ आणि ‘ते’ या ओळखी कशा ठरवल्या जातात? इतिहास आणि स्मृतींच्या अभ्यासक्षेत्रामध्ये मूलभूत विचार मांडलेल्या वारबुर्ग आणि हाल्बवाख्स या अभ्यासकांच्या मते एखादी व्यक्ती ही कोणत्याही समुदायाचा घटक बनते, याचं कारण म्हणजे त्या समुदायाच्या अशा काही खास आठवणी-स्मृती असतात, ज्या या व्यक्तीनेदेखील आत्मसात केलेल्या असतात. उदाहरणार्थ- बाई म्हणून आपण अमुक पद्धतीचे कपडे घालत नाही, आपल्या आर्थिक वर्गामध्ये अमुक व्यसने करत नाहीत, आपल्या जातीत माशाचं वाटण करताना त्यात अमुक घालत नाहीत, आपल्या धर्मात प्रार्थना अमुक भाषेत करतात, आपल्या देशात अमुक गाण्याला राष्ट्रगीत मानतात, अशा असंख्य सामूहिक आठवणी लक्षात ठेवून दरेक समुदायाचे सदस्य त्या त्या प्रसंगी ती ती ओळख जपत असतात; किंबहुना त्या सामुदायिक आठवणीच्या विरुद्ध वागणं म्हणजे सदस्य म्हणून समुदायाशी फारकत घेण्याचं पहिलं पाऊलच ठरतं.

आपण कोण आणि परके कोण हे ठरवताना या सामुदायिक स्मृती अगदी मध्यवर्ती भूमिका निभावतात. दुसऱ्या शब्दांत सांगायचं तर आपली ओळख, म्हणजेच आपली अस्मिता ही सामुदायिक स्मृतींमुळे घडत असते. आणि त्याचवेळी, आपण कशाची आठवण जपणार आणि कुणाला सोयिस्करपणे विस्मृतीत ढकलणार हेही आपल्या अस्मितेवर अवलंबून असतं.

समुदायाच्या आठवणींमध्ये अर्थातच वस्तुनिष्ठपणे जे आणि जसं घडलं ते तसंच्या तसं लक्षात ठेवलं जात नाही. तर जी गोष्ट आठवून अभिमान वाटेल, प्रेरणा मिळेल, वर्तमानातील जखमांवर फुंकर घातली जाईल, अशा त्या त्या प्रसंगी आपण अंगीकारलेल्या ओळखीला साजेशा गोष्टी ठळकपणे सामोऱ्या येतात; आणि ज्या गोष्टींची आठवण आता आपल्याला लाजिरवाणी वाटत असेल, किंवा दु:खद असेल, त्यांची सामुदायिक स्मृतींमधून हकालपट्टी झालेली दिसते. एक जानेवारी रोजी भीमा कोरेगावमधील स्मृतिस्तंभापाशी अभिवादनासाठी येणाऱ्या लोकांच्या आठवणींचा या दृष्टीने विचार करता येईल.

१८१८ साली दुसऱ्या बाजीरावाच्या सन्याशी लढून आपलं वर्चस्व राखणाऱ्या ईस्ट इंडिया कंपनीच्या सनिकांच्या स्मृत्यर्थ हा जयस्तंभ उभारलेला आहे. जर आपण ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळवलेल्या भारतीय नागरिकाच्या नजरेतून या जयस्तंभाकडे पाहिलं, तर २०० वर्षांपूर्वी इंग्रजांच्या वतीनं आणि शेवटच्या पेशव्याच्या सन्याविरुद्ध लढलेल्या लोकांच्या विजयाची आठवण गौरवानं का जपली जाते हे कळणार नाही. त्यासाठी त्या काळातल्या समाजाच्या हाडीमाशी खिळलेल्या जातिव्यवस्थेचं दाहक वास्तव समजून घेणं गरजेचं ठरतं. इथल्या समाजामध्ये बहुसंख्य व्यक्तींना त्यांच्या जातिविशिष्ट व्यवसायांखेरीज इतर व्यवसाय करण्यास, ज्ञान मिळवण्यास बंदी होती. अशा परिस्थितीत जेव्हा इंग्रजी फौजेमध्ये पराक्रम गाजवून सन्मानाचं जिणं जगण्याची संधी या जातींतील माणसांना उपलब्ध झाली, तेव्हा अस्पृश्यता आणि गरिबीपेक्षा त्यांनी आत्मसन्मान आणि नियमित उत्पन्नाची निवड करून पराक्रम गाजवला. तरीही कोणताही पराक्रम गाजवण्याची क्षमता या जातींमध्ये नाहीच, कारण या जातीतील लोक जन्मजात लढवय्ये नाहीत, असे अशास्त्रीय दावे केले जात होते. ही पार्श्वभूमी लक्षात घेतली की- ‘या पराक्रमी वीरांची गौरवशाली स्मृती जपली पाहिजे’ असं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९२७ साली का सांगितलं आणि त्यानुसार ती आठवण का जपली जाते हे समजून घेणं सहजशक्य होतं. सामुदायिक आठवणींमधून आपली आजची अस्मिता, ओळख निर्माण होते हे डॉ. आंबेडकरांनी जाणलं होतं. त्यामुळे वर्तमान समाजात समानता हवी असेल, तर विविध समुदायांच्या गतकालीन आठवणींनाही सर्वानी समान आदर दिला पाहिजे असा त्यांचा विचार होता.

सामुदायिक आठवणींना शास्त्रोक्त पद्धतीनं विविधांगी पुराव्यांचं विश्लेषण करून लिखित इतिहासाचं स्वरूप देता येतं. तसं झालं तर दबलेल्या समुदायांच्या शोषणाच्या आणि त्यांनी दिलेल्या लढय़ांच्या स्मृती समाजापुढे मांडल्या जातात. परंतु आपल्या सामुदायिक स्मृतींपैकी, इतिहासात कुणाला स्थान द्यायचं आणि कुणाला विस्मृतीमध्ये लोटायचं याची निवड करण्याचा अधिकार समाजातील प्रभुत्वशाली लोकांकडे असतो. त्यामुळे विद्रोहाच्या कहाण्या लोकस्मृतीत असतात, पण इतिहासात त्यांना स्थान मिळेलच असं सांगता येत नाही.

उदाहरणार्थ, कोमल नावाच्या माझ्या एका विद्यार्थिनीच्या आजीच्या किशोरवयातली ही आठवण. ‘‘माझी आजी लहानपणी शेतात भुईमुगाच्या शेंगा आणि मिरच्या वेचायला जायची, पण मुली लवकर मोठय़ा दिसायला लागतात म्हणून त्यांना दाणे-मिरच्या खायला बंदी असे. तरी भुकेपायी सगळ्या मुली ते खायच्या आणि टरफलं, देठं शेतातच मातीच्या सरीखाली गाडून टाकायच्या. घरी कुणाला काही कळायचं नाही.’’ स्त्रियांवरच्या शारीरिक आणि मानसिक बंधनांचा इतिहास लिहिताना या लोकस्मृतीला कदाचित वळचणीलासुद्धा जागा मिळणार नाही. पण म्हणून मानवमुक्तीच्या वाटचालीत या छोटय़ाशा विद्रोहाच्या आठवणीचं मोल कमी ठरवता येत नाही.

‘ख्रिस्त महंमद मांग ब्राह्मणासी। धरावे पोटासी जोति म्हणे।।’ असं सांगून जोतिराव फुल्यांनी जातधर्माच्या पलीकडे असणारा करुणेचा मार्ग समाजाला दाखवला होता. परंतु माणसांमाणसांतले भेद अधोरेखित करण्यासाठी आज इतिहासाचा, कागदपत्रांचा आधार घेतला जाताना दिसत आहे. मात्र इतिहासाच्या या सापेक्ष स्वरूपाची डोळस जाणीव सावित्रीबाई फुले यांनी ‘बावन्नकशी सुबोध रत्नाकर’ या ऐतिहासिक रचनेत जागती ठेवली आहे. त्या सांगतात, ‘अशा कल्पनांचा इतिहास कावा। सत्यासत्य संशोधुनी बोध घ्यावा।’  त्यामुळे आजच्या आपल्या समाजाची वीण उसवू द्यायची नसेल, तर इतिहासाचा आणि स्मृतींचाही कावेबाजपणे केला जाणारा वापर, त्यातली सत्यासत्यता समजून घेतली पाहिजे. ३ जानेवारी हा सावित्रीबाईंचा जन्मदिवस आहे. यानिमित्ताने आपल्या समाजात इतिहासाच्या गैरवापरातून निर्माण केले जाणारे भेद हे भ्रामक आणि खोटे आहेत हा बोध घेणं सयुक्तिक ठरेल.

लेखिका ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा’त इतिहासाचे अध्यापन करतात.

ईमेल : shraddhakumbhojkar@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 2, 2020 4:32 am

Web Title: article about history interesting history article zws 70
Next Stories
1 साखळीचे स्वातंत्र्य : काचेचे इंजिन!
2 विश्वाचे वृत्तरंग : सिंहावलोकन करताना..
3 पुनर्विकास दृष्टिपथात..
Just Now!
X