लोकमान्य टिळकांच्या ग्रंथसंग्रहाबद्दलची ही नोंद त्यांचे लेखनिक आप्पाजी विष्णू कुलकर्णी यांच्या ‘लो. टिळक यांचीं गेलीं आठ वर्षे’ या पुस्तकातून..

नारायण पेठेतील गायकवाड वाडा टिळक यांनी घेतला त्या वेळीं तो मोडकळीस आला असल्यामुळें फक्त डागडुजी करून काही भाग त्यांनी तसाच ठेविला व काही भाग अजिबात उतरून तो पुन्हां नवा बांधला आहे. हा नवा बांधलेला भाग म्हणजे त्यांची राहाण्याची जागा हा होय. ही इमारत दुमजली असून खालच्या जागेंत जेवणाखाणाची सोय केली आहे; व वर दोन मोठे दिवाणखाने असून एकांत त्यांची नेहमींची बैठक असते. या बैठकीच्या जागेपासून बाहेरच्या रहदारीच्या रस्त्यावरील दुमजल्यावर ‘केसरी’ व ‘मराठा’ पत्रांच्या संपादकांस बसण्यासाठी ज्या खोल्या दिल्या आहेत तेथपर्यंत आंतील दरवाजावरून एक पूल केला आहे; व त्यायोगें प्रसंगविशेषी त्यांच्याकडे इतर संपादकांचें काम असलें किंवा त्यांना इतर संपादकांकडे जावें लागलें तर सुलभ झालें. राहण्याच्या जागेपुढेंच पटांगणाला लागून उत्तरेकडच्या बाजूस किंवा इतर संपादकांस ज्या खोल्या दिल्या आहेत त्यांना लागूनच पूर्वेकडील बाजूस सुमारे हजार लोक बसतील एवढा मोठा एक दिवाणखाना आहे; व त्यांत त्यांनीं जंगी लायब्ररी ठेविली आहे. रस्त्यावरील मोठा दरवाजा बराच उंच असल्यामुळे त्यावरील दुमजल्याचा दिवाणखानाही बराच उंच आहे, म्हणजे जवळच्या इमारतीपेक्षां ही जागा सरासरीने अडीचपट उंच आहे; व या उंचीवरूनच त्या जागेस त्यांच्या लहान मुलांच्या म्हणीवरून ‘अडचावा मजला’ असें नांव पडलें आहे. या अडचाव्या मजल्याच्या हॉलमध्येच  प्रो. श्रीधर गणेश जिनसीवाले यांच्या स्मरणार्थ त्यांची मोठी तसबीर लावून तेथें त्यांची लायब्ररी ठेविली आहे. संपादकांच्या खोल्याखालील जागेंत निरनिराळ्या सरकारी खात्यांचे आलेले रिपोर्ट आणि वर्तमानपत्रांच्या आणि मासिक पुस्तकांच्या फायली व चिकट बुकें ठेवण्याची सोय केली आहे.

मोठय़ा दिवाणखान्यांत जी लायब्ररी आहे तींत इतिहास, वाङ्मय, कायदा, शास्त्र, राजकारण, वगैरे निरनिराळ्या विषयांवरचे सुमारें दहा हजार ग्रंथ असून त्यांचीं निरनिराळीं बत्तीस कपाटें आहेत. हीं कपाटें दोन खिडक्यांमध्यें एकेक अशी भिंतीकडेला दोन्हीं बाजूनें रांगेनें ठेवलीं असून समोरच्या भिंतीला लागून जी कपाटे आहेत, त्यांतील एकांत एनसायक्लोपीडियाचे नवेजुने मिळून एकंदर ३५ भाग ठेविले आहेत. ‘लोकहितवादी’ या नांवाने प्रसिद्ध असलेले गोपाळराव हरि देशमुख यांच्या आणि रा. सा. वामन मोरेश्वर सोहनी यांच्या खासगी पुस्तकांचा सर्व संग्रह टिळक यांनीं या लायब्ररीकरतां डॉ. देशमुख आणि रा. रा. गणपतराव सोहनी यांजकडून मिळविला असल्यामुळें जुने कित्येक ग्रंथ आज जे दुर्मिळ झाले आहेत, त्यांचा संग्रह अनायासेंच या लायब्ररींत झाला आहे. वेदांची भाषांतरे, बखरी, ऐतिहासिक लेख; तुकाराम, मोरोपंत, वामनपंडित, वगैरे कवींची काव्ये, इत्यादी मराठी पुस्तकांचाही यांत संग्रह असून रा. रा. दाभोळकर, ग्रंथ-संपादक-मंडळी, जावजी दादाजी, वगैरेंनी प्रसिद्ध केलेले ग्रंथ आणि केसरीकडे अभिप्रायार्थ आलेलीं पुस्तकं यांचीही निराळीं कपाटे ठेविलीं आहेत. या खेरीज नामजोशी यांनी मराठी भाषेच्या लिहिलेल्या कोशाचे पंधरा-सोळा हस्तलिखित व्हाल्यूम आणि इतर कांही हस्तलिखित ग्रंथ यांचाही निराळा संग्रह आहे; आणि होता होईल तो इंग्रजी, मराठी, संस्कृत वगैरे निरनिराळ्या भाषेंत जे निरनिराळे उपयुक्त ग्रंथ आहेत, त्या सर्वाचा संग्रह करून या लायब्ररीचा लोकांना चांगल्या तऱ्हेने उपयोग होईल अशी टिळक हे तजवीज करून ठेवणार आहेत. ‘अडचाव्या मजल्या’वर प्रो. जिनसीवाले यांच्या पुस्तकांचा जो संग्रह केला आहे, त्यांत धर्म, इतिहास, वाङ्मय या ग्रंथांचा विशेष भरणा असून या लायब्ररीची किंमत सरासरी सात हजार रुपये होईल. पुण्यास लोकांस उपयोगी पडेल अशी चांगली लायब्ररी आजपर्यंत नव्हती; पण टिळक यांच्या प्रयत्नानें या दोन्ही लायब्रऱ्या यांच्या संस्थेसच नव्हे तर, एकंदर पुणें शहरास भूषण झाल्या आहेत असें म्हटल्यास त्यांत अतिशयोक्ती मुळींच होणार नाही.

पत्रकारितां म्हणून टिळक जीं पुस्तकें अथवा वर्तमानपत्रे वाचीत असत ती बहुधा इंग्रजीच असत. त्यांत मुख्यत्वेकरून मुंबईची ‘टाइम्स’, ‘ग्याझेट’, ‘अ‍ॅडव्होकेट’; मद्रासची ‘हिंदु’, ‘स्टँडर्ड’, ‘पेट्रिअट’; कलकत्त्याची ‘अमृतबझार पत्रिका’, ‘बेंगाली’, ‘इंडियन मिरर’, ‘वंदेमातरम्’; लाहोराचे ‘ट्रायब्यून’ हीं दैनिक असून ‘इंडियन स्पेक्टेटर’ (मुंबई), ‘युनायटेड इंडिया’ (मद्रास), ‘इंडियन पीपल’ (अलहाबाद), ‘वेन्सडे रिवू’ (मच्छलीपट्टण), ‘अ‍ॅडव्होकेट’ (लखनौ), वगैरे काही आठवडय़ांतून एकदां, दोनदां किंवा तीनदां निघणारी आहेत. विलायतेतील पत्रांपैकी ‘लंडन टाइम्स’ ते पूर्वी घेत असत; पण पुढे ते बंद करून तिकडील सर्व पत्रांतील हिंदुस्थानासंबंधाचे महत्त्वाचे लेख कापून पाठविणारी कंपनी आहे तिच्याकडून असले लेख विकत आणावीत असत. हे लेख दर आठवडय़ास सुमारे ५०-७५ तरी असत. या खेरीज ‘इंडिया’, ‘जस्टिस’, ‘इंडियन सोशिआलॉजिस्ट’, ‘गेलिक अमेरिकन’, ‘न्यू सेंचरी पाथ’, ‘इंडियन ओपिनियन’, वगैरे इंग्लंड, अमेरिका, अफ्रिका येथे प्रसिद्ध होणारी कांहीं पत्रेंही यांच्याकडे येत असत. इकडील इंग्रजी मासिक पुस्तकांपैकी ‘इंडियन रिवू’ (मद्रास), ‘मद्रास रिवू’, ‘हिंदुस्थान रिव्ह्य़ू’ (अलहाबाद), ‘मॉडर्न रिवू’ (कलकत्ता), ‘थिआसाफिस्ट’, ‘अस्ट्रालॉजिकल म्यागेझिन’, ‘ब्रह्मवादिन’, ‘प्रबुद्ध भारत,’ ‘ईस्ट अँड वेस्ट’, ‘इंडियन इकॉनामिस्ट’ (कलकत्ता), ‘टेक्सटाइल जर्नल’ (मुंबई), ‘इंडियन वर्ल्ड’ (कलकत्ता) ही आणि विलायतेतील मासिक पुस्तकांपैकी ‘रिवू ऑफ रिवूज’, ‘नाइन्टीन्थ सेंच्युरी’, ‘फॉर्ट नाइट्ली रिवू’, ‘कॉन्टेपररी रिवू’, ‘अपकारी,’ ‘पॉझिटिव्हिस्ट’ हींही केव्हां केव्हां वाचीत असत. या खेरीज ‘मराठा’ पत्रास मोबदला येणाऱ्या शेंदीडशे इंग्रजी पत्रांपैकी प्रसंगोपात्त काही पत्रे चाळीत असत. टाइम्स, पायोनियर, वगैरे कित्येक अँग्लो-इंडियन पत्रे नेटिवांचा द्वेष करणारी असल्यामुळे त्यांतील कुत्सित लेखांचे खंडन करून नेटिवांची बाजू व नेटिवांचे हक्क स्पष्टपणें सरकारापुढे मांडण्याची यांची प्रवृत्ती असल्यामुळे असा कोणताही प्रसंग आला तरी ते तो सहसा वायां जाऊ देत नसत. मराठी मासिक पुस्तकांपैकीं ‘विविधज्ञानविस्तार’, ‘ग्रंथमाला’, ‘सरस्वतीमंदिर’, ‘विश्ववृत्त’, ‘प्रभातट, ही व वर्तमानपत्रांपैकीं ‘इंदुप्रकाश’, ‘ज्ञानप्रकाश’, ‘सुधारक’, ‘नेटिव ओपीनियन’, ‘सुबोधपत्रिका’ हीं ते मधून मधून पहात असत.