करोना प्रतिबंधासाठी देशपातळीवर आजपासून लसीकरणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. ही जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम ठरणार असल्याचा सरकारचा दावा आहे. या मोहिमेविषयी..

* लसीकरणाचे टप्पे काय असतील?

– जोखमीच्या गटांना प्राधान्याने लसीकरण केले जाणार असून यात पहिल्या टप्प्यात शासकीय आणि खासगी आरोग्य संस्थामधील अधिकारी आणि सर्व कर्मचारी, आशा, अंगणवाडी सेविका आदींचा समावेश आहे. त्यानंतर पहिल्या फळीतील कर्मचारी उदाहरणार्थ राज्य व केंद्रीय पोलीस दल, सशस्त्र कृती दल, गृहरक्षक दल, महानगरपालिकेचे कर्मचारी इत्यादींचे लसीकरण दुसऱ्या टप्प्यात होईल. तिसऱ्या टप्प्यात ५० वर्षांवरील सर्व व्यक्ती व ज्यांना अन्य आजार व्याधी आहेत अशा ५० वर्षांखालील व्यक्तींचा समावेश आहे. त्यानंतर टप्प्याटप्याने इतर सर्वासाठी लस उपलब्ध केली जाणार आहे.

* लसीकरणासाठी पात्र आहे, कसे ओळखावे?

-वरील पैकी तीन गटांची नोंदणी टप्प्याटप्प्याने केली जाणार आहे. सध्या आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी सुरू आहे. नोंदणी केल्यावरच लस मिळू शकते. नोंदणी करताना आधारकार्ड, मतदान ओळखपत्र, वाहन चालक परवाना, पॅनकार्ड, पासपोर्ट, सेवानिवृत्तीची कागदपत्रे, मनरेगा जॉब कार्ड, बँकेचे पासबुक इत्यादींपैकी कोणतेही छायाचित्रित ओळखपत्र सोबत बाळगावे. नोंदणीकृत मोबाइल नंबरवर लसीकरणाची तारीख, दिनांक, लसीकरण केंद्र आणि वेळ याचा संदेश प्राप्त होईल. लसीकरणासाठी जातानाही ओळख पटविण्यासाठी ओळखपत्र दाखविणे आवश्यक आहे. लसीकरण पूर्ण झाल्यानंतरही मोबाइलवर याची माहिती दिली जाईल. तसेच लशीच्या सर्व मात्रा दिल्यानंतर मोबाइल नंबरवर क्यूआरकोड आधारित प्रमाणपत्रही पाठवले जाईल.

* करोनामुक्त झालेल्यांनी लस घेणे आवश्यक आहे का?

-आधी संसर्ग झाला असला तरी स्वत:ची सुरक्षा आणि रोगाचा प्रसार रोखण्यासाठी लस घेणे आवश्यक आहे. यामुळे रोगप्रतिकारकशक्ती अधिक बळकट राहण्यास मदत होईल.

* सहव्याधी असल्यास लस घेता येऊ शकते का?

-कर्करोग, मधुमेह, उच्च रक्तदाब इत्यादी आजार असलेल्या व्यक्ती जोखमीच्या गटात असून यांनी लस घेणे गरजेचे आहे.

* करोना झालेल्यांना म्हणजेच उपचाराधीन (सक्रिय) रुग्णांना लस घेता येऊ शकते का?

-करोनाचे निदान झालेल्या रुग्णांना लसीकरणासाठी जाऊ नये. कारण लसीकरणाच्या ठिकाणी विषाणूच्या प्रादुर्भावाचा धोका वाढू शकतो. तेव्हा संसर्ग झालेल्या व्यक्तींनी संबंधितांना याबाबत कळवावे. त्यानुसार लक्षणे पूर्णपणे बरे होईपर्यत १४ दिवसांसाठी लसीकरण पुढे ढकलले जाईल.

* लशीच्या मात्रांमध्ये किती अंतर असेल आणि किती दिवसांनी प्रतिपिंडे विकसित होतील?

-लशीची पहिली मात्रा घेतल्यानंतर २८ दिवसांच्या अंतराने दुसरी मात्रा घेणे आवश्यक आहे. दुसरी मात्रा घेतल्यावर दोन आठवडय़ांनी शरीरात प्रतिपिंडे तयार होतात. लस घेतल्यावर प्रतिबंधात्मक उपायांचे पालन करणे आवश्यक आहे.

* लसीकरणाच्या ठिकाणी काय काळजी घ्याल?

-लस घेतल्यानंतर किमान अर्धा तास लसीकरणाच्या ठिकाणी आराम करावा. मानसिक किंवा शारीरिक अस्वस्थता वाटत असल्यास तातडीने केंद्रावरील आरोग्य अधिकाऱ्यांना कळवावे. लसीकरणाच्या ठिकाणी करोना प्रतिबंधात्मक उपायांचे पालन काटेकोरपणे करावे. लस घेतल्यानंतर सौम्य ताप, वेदना इत्यादी सामान्य लक्षणे जाणवू शकतात. त्यामुळे अशी लक्षणे जाणवल्यास काळजी करू नये.