थोर विचारवंत नरहर कुरुंदकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच दलित च़ळवळ याविषयी विपुल लिखाण केले. त्यांचे विचार आजही लागू पडतात. त्यांच्या लेखांतील हे दोन प्रातिनिधिक, परंतु संपादित उतारे..

आंबेडकरांचे खरे भांडण हिंदूंच्या इतिहासाशी नव्हते. दीड हजार वर्षे तुम्ही आम्हाला गुलाम केले, अन्यायाने आमच्यावर अपमानित जीवन जगण्याची पाळी आणली, या मुद्दय़ांवर त्यांचे खरे भांडणच नव्हते. आंबेडकरांचे ग्रंथ बारकाईने वाचणाऱ्यांना ही गोष्ट लक्षात येईल की, जगभर असणाऱ्या गुलामीचा अतिशय रेखीव असा आढावा आंबेडकरांनी आपल्या लिखाणात अनेक ठिकाणी घेतलेला आहे. हिंदू धर्मात जातिव्यवस्था होती, हिंदूंची समाजरचना विषम होती, हिंदू समाजात अस्पृश्यता आणि गुलामगिरी होती, पण यापेक्षा निराळा असा इतिहास इतर संस्कृतींचाही नाही. ख्रिस्ती धर्मात जातिव्यवस्था नव्हती, तो धर्म माणसाची प्रतिष्ठा वाढवणारा असा प्रेमधर्म आहे; पण धर्माचे स्वरूप असे असले तरी सामाजिक जीवनात विषमता होतीच, गुलामगिरी होती; सामाजिक दास्य, राजकीय दास्य आणि धर्मदास्यही होते. हाच प्रकार इस्लामी संस्कृतीतही दिसतो. इस्लामी संस्कृतीतील दास्याचा तर आंबेडकरांनी अधिक वेळेला अधिक कठोर शब्दांत निषेध केलेला आहे. ही आंबेडकरांची मीमांसा त्यांनी तपशिलाने कोठे विचारात न घेतलेल्या बौद्ध समाजजीवनाचा विचार करून पूर्ण करता येईल. बौद्ध धर्मही प्रेमाचा, सेवेचा आणि समतेचा धर्म होता; पण बौद्ध संस्कृतीखाली असलेले समाजजीवन इतर सगळ्या संस्कृतींतील समाजजीवनाप्रमाणेच भ्रष्ट, विषमतेने आणि दास्याने बरबटलेले होते. सर्व जगातील, सर्व संस्कृतींतील सर्वच धर्मप्रभावाखाली असलेले समाजजीवन विषमतेने आणि दास्याने बरबटलेले होते. याचा बाबासाहेबांनी अनेकदा उल्लेख केलेला आहे. मानवजातीचा हा इतिहास खंत वाटण्याजोगा असला तरी त्याबद्दल हिंदू धर्माला विशेष दोषी असे गृहीत धरण्याची आंबेडकरांची इच्छा नव्हती. प्रश्न इतिहासाचा नसून वर्तमानकाळाचा होता.
आंबेडकरांनी स्पष्टपणे असे म्हटलेले नाही. तसे त्यांनी म्हटलेही नसते. इतिहासाच्या पापाबद्दल तुम्हाला सरसकट माफी देण्यात आलेली आहे, असे शिफारसपत्र सनातन्यांना देण्याची बाबासाहेबांची इच्छा नव्हती. म्हणून त्यांनी त्याबाबत वेगळीच पद्धत स्वीकारलेली आहे. ते म्हणतात, ‘‘मध्ययुगात सर्वच जगभर गुलामगिरी पसरलेली होती, तशी हिंदुस्थानामध्येही पसरलेली होती. याबद्दल हिंदू धर्माला विशेष दोषी असे आम्ही गृहीत धरीत नाही. हिंदू धर्माला विशेष दोषी गृहीत धरण्याचे कारण निराळे आहे. ते म्हणजे, जगातल्या कोणत्याही धर्माने विषमतेचे समर्थन करून गुलामगिरीला पावित्र्य दिलेले नाही. हिंदू धर्माने मात्र विषमतेला असे समर्थन आणि पावित्र्य देण्याचा खरा प्रयत्न केलेला आहे! या त्यांच्या भूमिकेतील सूचना अगदी स्पष्ट आहे. त्यांचा खरा राग इतिहासातल्या गुलामगिरीबद्दल नाही, तर धर्माचे नाव घेऊन आजही गुलामगिरीचे समर्थन करण्याच्या प्रयत्नांविषयी त्यांना खरा राग आहे!
सवर्ण हिंदूंच्या प्रामाणिकपणाविषयी आंबेडकरांना कधी खात्री वाटली नाही. अशी खात्री वाटावी असे प्रसंगही त्यांच्या जीवनात दीर्घकाळापर्यंत आले नाहीत. काही प्रसंग आले ते त्यांच्या आयुष्याच्या उत्तरार्धात- इतक्या उशिरा आले की, त्यांचा फारसा ठसा त्यांच्या मनावर उमटू शकला नाही. एक राष्ट्रभक्त म्हणून बाबासाहेबांच्या विचारांचा आरंभ होत असल्यामुळे हिंदू धर्माविषयीचे समत्व आणि प्रेम त्यांच्या मनात भरपूर होते. आपल्या राजकीय जीवनाच्या आरंभीच्या काळात हिंदू धर्माच्या पोटात राहून, हिंदू धर्मावर प्रेम करून व हिंदू म्हणून सन्मानाने जगूनच त्यांची कठोर निराशा होण्यासाठी जी विविध कारणे घडली त्यातले एक महत्त्वाचे कारण महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह हे होते..
..महाडच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहामुळे बाबासाहेब रागावले नाहीत. हिंदू म्हणून जगण्याचा व सन्मानाने जगण्याचा त्यांचा निश्चय कायम रहिला. ठिकठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सवात त्यांनी आग्रहाने गणेशपूजनाचा हक्क बजावण्याचा प्रयत्न केला. एका कार्यक्रमात तर सहा हजार अस्पृश्यांची सार्वजनिक मौंज करून त्यांनी सहा हजार जणांना जानवीही घातली; पण त्यांच्या या प्रयत्नांकडे सहानुभूतीने पाहण्यास कुणी तयार नव्हते. नाशिकच्या काळाराम मंदिर सत्याग्रहाचाही त्यांना विपरीत अनुभव आलेला होता. समाजसुधारणेच्या बाबतीत जोरजोराने बोलणारे आधुनिक सुशिक्षित हिंदूही मनाने सनातनीच असतील आणि खरोखर समाजाच्या आमूलाग्र परिवर्तनाला जर मनापासून त्यांचा पाठिंबा नसेल, तर सुधारणांचा विश्वास कुणाच्या आधारे धरावा, हा त्यांच्या मनाला पडलेला प्रश्न होता. परंपरागत जीवन जगणाऱ्या हटवादी, आक्रमक, पण मागासलेल्या अशा जुनाट हिंदू समाजाने बाबासाहेबांना दुखवले; पण त्यामुळे ते हिंदू समाजाला दुरावले नाहीत. या दुराव्याचे कारण सुधारणावादी म्हणवणारा वरिष्ठ वर्ग दांभिक आहे असा अनुभव त्यांना आला, हे होय..
..बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली, या घटनेविषयी सुशिक्षितांची अपेक्षित प्रतिक्रिया दिसून आली नाही. जर आधुनिक सुशिक्षित असे म्हणाले असते की, ‘‘मनस्मृती म्हणजे कायद्यांचे संकलन करणारे जुनाट पुस्तक, इतिहासाच्या अभ्यासाखेरीज त्याला कोणतेही महत्त्व नाही. सनातनी, जुनाट लोक सोडले, तर हा ग्रंथ कुणी आदरणीयही समजत नाही. मग तो जाळून तरी काय फायदा?’’ तर मग बाबासाहेब असे म्हणाले असते, ‘‘हा एक प्रतीकात्मक निषेध आहे इतकाच त्याचा अर्थ.’’ पण असे घडावयाचे नव्हते. मनुस्मृती जाळल्यावर आंबेडकरांविरुद्ध काहूर उठवण्यात आले! स्वत:ला आधुनिक म्हणवणाऱ्या कुणीही त्यांचे समर्थन केले नाही. राजकीय दृष्टीने जागृत असणारा नवसुशिक्षित हिंदू समाजही मनुस्मृतीकडे भक्तीने व आदराने पाहतो ही जाणीव दु:खद होती. शक्ती आणि लायकी असली तरीही शूद्रांना धन मिळविण्याचा अधिकार नाही, त्याने सेवाच केली पाहिजे. इथून प्रारंभ करून नानाविध अत्याचारी कायदे आदेश मानून सांगणारा हा ग्रंथ जर पूज्य आणि आदरणीय मानावयाचा असेल, तसे मानणे भाग असेल, तर या धर्मात अस्पृश्यांना उद्धाराची कोणतीच आशा नव्हती.. विषमता आणि अस्पृश्यता या बाबी हिंदू धर्माचा मूलभूत भाग आहेत, असे म्हणणे म्हणजेच गुलामांनी गुलामच राहिले पाहिजे, असे प्रतिपादन करणे आहे! स्पष्टपणे असे न बोलता हिंदू धर्माचा आणि मनूचा उच्च स्वरात गौरव करण्याची एक सोयीस्कर पद्धत आहे; ती सोयीस्कर पद्धत कितीही शिताफीने वापरली तरी त्यामुळे दलितांचे समाधान होण्याचा संभव नाही!
सत्तावीस साली मनुस्मृती जाळणारे आंबेडकर हिंदू होते, हिंदू संस्कृतीचे अभिमानी होते, हिंदू धर्मावर प्रेम करत. हिंदू म्हणून जगण्याची त्यांची इच्छा होती. अस्पृश्यांचा प्रश्न त्यांच्यासाठी केवळ दलितांना न्याय मिळवून देण्याचा प्रश्न नव्हता, दलितांना प्रतिष्ठित जीवन मिळवून देणे इतकाच त्यांचा हेतू नव्हता, तर हिंदू समाज एकसंध आणि बळकट कसा होईल याचाही विचार ते करत होते. भारत हे आधुनिक बलवान राष्ट्र कसे होईल याचाही विचार ते करत होते. सार्वजनिक आयुष्यातले एक तप म्हणजेच १९३६ पर्यंत या दिशेने त्यांचा विचार चालू होता. एका तपाच्या अनुभवानंतर त्यांनी धर्मपर्वितनाची घोषणा केली.
(‘आकलन’ या ग्रंथातून साभार)