डॉ. संदीप घरत

संसर्ग टाळण्यासाठी प्रयत्न करायचेच, पण स्वत:वर लक्ष ठेवणे, उपचारांची गरज असल्यास ते वेळीच मिळणे, हेही महत्त्वाचे असते. विलगीकरण काळातल्या एकटेपणात आपल्या कामी येतो तो साधेपणा, काहीसा भावुकपणा आणि भाविकपणासुद्धा. तो कसा, हे सांगणाऱ्या महिन्याभराच्या नोंदी..

माझी बॅग तयार ठेवली होतीच. मी लगेच निघालो. मंजिरी (पत्नी, प्रा. मंजिरी घरत) गेटपर्यंत सोडायला आली. मी अ‍ॅम्ब्युलन्समध्ये शिरलो. तिने हात हलवून बाय केले, परदेशी जाताना आम्ही एकमेकास निरोप देतो तितक्याच सहजपणे निरोप घेण्याचा हा प्रयत्न होता, पण तसे ते नव्हते हे दोघांनाही मनातून माहीत होते. आषाढीच्या दिवशी- १जुलै रोजी माझी वारी हॉस्पिटलला निघाली. एकटेपणाची जाणीव आता तीव्रतेने झाली. आता तो अदृश्य विषाणूच काय तो  माझ्यासोबत. तासाभरात हॉस्पिटलला पोहोचलो. आता माझी ओळख केवळ ‘कोविड-रुग्ण क्रमांक १२५’ हीच असणार होती.

पाचेक दिवसांपूर्वी मला ताप आल्याने कोविड टेस्ट केल्यावर मी आणि पत्नी कोविड पॉझिटिव्ह आलो होतो. तिला काहीच लक्षणे नव्हती. मला ताप होता, औषधे डॉक्टरी सल्ल्याप्रमाणे चालू होती, काय मॉनिटर करायचे (शारीरिक तापमान, ऑक्सिजनची पातळी, वगैरे) नीट माहीत असल्याने होम आयसोलेशनचा पर्याय घेतला होता. मला मधुमेह, उच्च रक्तदाब असे काही नव्हते, आमची जीवनशैली आम्ही नेहमीच प्रयत्नपूर्वक चांगली ठेवली होती. लॉकडाऊन काळात तर आहार, व्यायाम यांवर अधिक लक्ष दिले होते. त्यामुळे सौम्य इन्फेक्शनच्या वर काही होणार नाही असेच वाटत होते. मी तसा ठीक होतो. पण टेस्ट रिपोर्ट आल्याच्या दुसऱ्या दिवशी ऑक्सिजन पातळी थोडी कमी दिसू लागली. ताप कमी झाला होता, पण पूर्ण गेला नव्हता, थकवा होता. धाप किंचित लागू लागली.  तोवर सीटी स्कॅन केला होता, त्याचा रिपोर्ट आला. फुप्फुसात कोविडचे बस्तान दिसल्यावर विनाविलंब अ‍ॅडमिट होण्याचा निर्णय झाला.

हॉस्पिटलला जाताना आपले फार काही सीरियस नसेल असे एकीकडे वाटत असले तरी आपण सुखरूप घरी परत येऊ ना अशी शंकाही मध्येच डोक्यात येत होती हे खरं. हॉस्पिटलमध्ये रक्ताचे नमुने घेतले गेले, अँटिबायोटिक चालू केले. थोडय़ाच वेळात डॉक्टर आले आणि मला एक धक्का मिळाला : रक्ताच्या रिपोर्टमध्ये शुगर वाढल्याचे त्यांनी सांगितले. मी चक्रावलो. कारण मला कधीच शुगर नव्हती, पण ही कोविडची करामत. मधुमेह नसला तरी तणावामुळे शुगर वाढली होती आणि त्यामुळे इन्फेक्शन अधिक वाढले होते. आता कोविड रुग्णांच्या ‘सौम्य’ वर्गवारीत न राहता माझे प्रमोशन ‘मध्यम’ वर्गवारीत झाले. ऑक्सिजनच्या नळ्या लावल्या. दिवसभरात तोंडावाटे आणि शिरेवाटे असा भरपूर औषधांचा खुराक चालू झाला. जेवण, नाश्ता चांगला असायचा, पण खाण्याची इच्छा फारशी नव्हती. औषधे, अनेकदा रक्त काढणे आणि बोलताना किंवा थोडय़ा हालचाली केल्यावर लागणारी धाप यामुळे मी जरा जेरीसच आलो. पण त्यात बरी गोष्ट म्हणजे माझ्या रूममध्ये छान उजेड होता . हा प्रसन्न उजेड येथील खूप आधार द्यायचा.

हॉस्पिटलमध्ये मोबाइल हाच माझा मुख्य सखासोबती झाला होता. अनेक कॉल्स जरी काळजीने केलेले होते तरी त्या स्थितीत ते निश्चित नकोसे होते. त्यामुळे मी बरेचसे नंबर ब्लॉक केले. व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये लोकांनी हिरिरीने फॉरवर्ड केलेले कोविडसंबंधीचे अनेक नकारात्मक मेसेज त्या मानसिक अवस्थेत अजिबात पेलण्याजोगे नव्हते. मी अनेक ग्रुपमधून तात्पुरता बाहेर पडलो. निवडक मित्र आणि कुटुंबीय यांच्याशी मेसेजिंग चालू ठेवले. किती दिवस हॉस्पिटलला राहावे लागणार, किती दिवस थकवा आणि धाप राहणार या विचाराने जरा विमनस्कच व्हायला होत होते. पण तरी सर्व सकारात्मकता एकवटून मनोबल राखायचा प्रयत्न करत होतो. कोविडने दिलेली सवड व दाखवलेली भीती यामुळे हॉस्पिटल-काळ मला ‘रिलिजिअस र्रिटीट’ वाटला. मी त्याला १२ दिवसांचा विपश्यना काळही म्हणतो. अंतर्मनाशी संवाद चालू होता. अनेक विचार मानसिक कल्लोळ निर्माण करीत होते. माझे भाऊ आणि काही मित्र यांनी पाठवलेल्या प्रार्थनांपेक्षा मला त्यामागचा प्रेमळ व निर्मल भाव, आशीर्वाद महत्त्वाचा वाटत होता. ते ऐकून मला धीर यायचा. त्या एकाकी रूममध्ये पीपीई किट घातलेली नर्स किंवा वॉर्डबॉय आले तरी मला आनंद व्हायचा.

घरातील नोकरवर्ग, ड्रायव्हर यांना किंवा ऑफिसमध्येही कुणाला आमच्याकडून इन्फेक्शन संक्रमित झालेले नाही या विचाराने खूप समाधान वाटायचे. मात्र पत्नीही कोविड पॉझिटिव्ह आणि घरी एकटीच. पण ती खंबीर आहे, या विषयातील माहीतगार आहे, त्यामुळे सर्व व्यवस्थित निभावत असेल याची खात्री होती. माझे सुरुवातीचे ब्लड रिपोर्ट्स पाहून पत्नीही थोडी घाबरली होती. माझ्या शरीरात अनेक नको त्या रसायनांचे प्रमाण (मार्कर्स) वाढलेले दिसत होते. ‘वेळीच हॉस्पिटलमध्ये आलो नसतो तर काय झाले असते’ या  विचाराने अस्वस्थ वाटायचे. सर्व उपचार योग्यरीत्या चालू झाले आहेत हा विचार आत्मविश्वास देत होता, आणखी गुंतागुंत व्हायला नको अशी प्रार्थना मनोमन चालू होती. सात दिवसांनी माझा ऑक्सिजन काढला. नंतर तीन दिवस पूर्ण निरीक्षणाखाली ठेवले. १२ व्या दिवशी मी घरी आलो.

गेल्या १५ दिवसांत फुप्फुसांना इन्फेक्शनमुळे सहन करावे लागलेले आघात आणि अविरत उलटसुलट विचारांचे वादळ या दोन्हीमुळे पार थकून गेलो होतो. तब्बल सहा किलो वजन कमी झाले होते. घरी पूर्ण विश्रांती, चांगला आहार आणि पॉझिटिव्ह वातावरण ठेवत मी सुधारत आहे. पूर्ण नॉर्मल्सी यायला वेळ लागेल. पण तरीही हा लेख आवर्जून लिहावासा वाटला कारण माझे अनुभव इतरांना थोडे तरी उपयुक्त व्हावेत.

कोविडचा संसर्ग ८० टक्के लोकांमध्ये किरकोळ असतो, त्यांना फारसे उपचारही घ्यावे लागत नाहीत. पण काही टक्के लोकांमध्ये इन्फेक्शन जास्त पसरते. त्यामुळे पहिल्यापासून कोविडवर उपचार करणाऱ्या डॉक्टरचा सल्ला, लक्षणे चालूच राहिल्यास त्वरित अ‍ॅडमिट होणे, हे सगळे नंतरचा धोका कमी करतात, त्यामुळे विलंब न करता आपण कृती करायला हवी. शेवटी इतकेच म्हणेन की, कोविड प्रतिबंधाची सर्व काळजी आपण घेत राहूच, पण तरी जर लागण झालीच तर रुग्णाने स्वत:चे आणि इतरांनी रुग्णाचे मनोबल उच्च ठेवणे महत्त्वाचे आहे!

(लेखक रसायन-अभियांत्रिकीत पीएच.डी. असून त्याच क्षेत्रातील व्यावसायिक आहेत)