विसाव्या शतकाच्या अखेरच्या टप्प्यात माहितीच्या मायाजालाने जगभरातील अनेक तरुणांना मोहात पाडले होते. अनेक जिज्ञासू तरुणांनी त्यात उडी घेतली. पण त्यातील काहीच तरले. अनेक जण त्या प्रवाहात फार काळ टिकू शकले नाहीत. याचे कारण दूरदृष्टी नसणे हे होते. अशीच अवस्था नोकिया आणि याहू या दोन बलाढय़ कंपन्यांची झाली आणि त्यांच्यापुढे विलीनीकरणाशिवाय पर्याय उरला नाही..

‘गुगल’चे मुख्याधिकारी सुंदर पिचाई नुकतेच भारतीय दौऱ्यावर आले होते. त्या वेळी त्यांना एका विद्यार्थ्यांने विचारले होते की, गुगलचे सर्च इंजिन, जिमेल, यूटय़ूब, मॅप्स अशा काही मोजक्या सेवा वगळता इतर संशोधने अपयशी का ठरत आहेत? त्याला उत्तर देताना पिचाई यांनी कंपनीचे संस्थापक लॅरी पेग यांची भूमिका विद्यार्थ्यांसमोर मांडली. पेग म्हणाले होते, आपण काळाच्या खूप पुढे जाऊन संशोधन केले पाहिजे. इतका पुढचा विचार करायचा की स्पर्धकांना तिथपर्यंत पोहोचायलाही खूप काळ लागेल..

उद्योगांचे हे यशसूत्रच. आजचा ग्राहक खूप हुशार आहे. अधिकाधिक मागणारा आहे. पूर्वी पिढय़ान्पिढय़ांचा ग्राहक असे. आज पिढीचा काळच आटला आहे. तीन ते पाच वर्षांत पिढी बदलते आहे. अशा बदलत्या ग्राहकाला खूश करायचे तर कंपन्यांना सतत नवे काही देणे आवश्यक असते. गुगलने, अ‍ॅपलने, अगदी सॅमसंगनेही दूरदृष्टीने काही निर्णय घेतले आणि त्या कंपन्या बाजारावर अधिराज्य गाजवू लागल्या. पण असे नवे काही न दिल्यास ती कंपनी एका दिवसात कालबाह्य़ ठरू शकते. अलीकडेच आपण याचे सर्वात मोठे उदाहरण पाहिले. ते म्हणजे ‘नोकिया’. आता ‘याहू’ही याच मार्गावर आहे..

कोणे एके काळी ‘याहू डॉट कॉम’वर आपला ई-मेल आयडी असणे हे प्रतिष्ठेचे मानले जात असे. तेव्हा याहूची नुकतीच सुरुवात झाली होती. याहूचा ई-मेल आयडी असलेल्यांचा एक विशेष गटही भारतात स्थापन करण्यात आला होता. हे लोक आपण काळाच्या पुढे आहोत असे स्वतस मानत असत. अर्थात ते खरेही होते. ते काळाच्या पुढे असल्यामुळेच ई-मेल आयडी सुरू करण्याचे महत्त्व त्यांना कळले होते. त्या वेळी ई-मेल आयडी असणे म्हणजे खूपच मोठी गोष्ट होती. कारण तेव्हा संगणकाने नुकताच भारतात प्रवेश केला होता. संगणक, इंटरनेट या गोष्टी सामान्यांच्या ऐकिवातही नव्हत्या. त्या काळात याहूने जगभरातील तंत्रप्रेमींना भुरळ घातली. याहूचा पाया हा गुगलप्रमाणेच शोध इंजिन हाच होता. याहूच्या आधीही काही कंपन्यांनी शोध इंजिन बाजारात आणले होते, मात्र त्यांना फारसे यश मिळाले नव्हते. त्यांच्यातील त्रुटी दूर करीत याहूने त्यांचे शोध इंजिन आणले. ‘वर्ल्ड वाइड वेब’चा जन्म होऊन काही वर्षेच उलटली होती. त्याच सुमारास म्हणजे १९९४ मध्ये स्टॅन्फोर्ड विद्यापीठातील जेरी यांग आणि डेव्हिड फिलो यांनी एक संकेतस्थळ माहितीजालात आणले. हे संकेतस्थळ म्हणजे इतर संकेतस्थळांची डिरेक्टरी मानली जायची. कालांतराने याचे रूपांतर सर्च इंजिनमध्ये झाले आणि त्याचा विस्तार वाढला. १९९७ मध्ये याहूने रॉकेटमेल ही कंपनी नऊ कोटी ६० लाख डॉलर्सना विकत घेतली आणि ई-मेल सेवा सुरू केली. त्या वेळेस याहू या कंपनीचे अस्तित्व इतके मोठे मानले जायचे की रॉकेटमेल या कंपनीसमोर कोणाला विकले जायचे यासाठी मायक्रोसॉफ्ट आणि याहू असे पर्याय होते, तर तिने याहूला पसंती दिली. कारण याहूकडे उत्तम व्यावसायिक मूल्य असल्याचे रॉकेटमेल कंपनीचे संस्थापक मार्विन गेविन यांचे मत होते. विसाव्या शतकाची अखेर जवळ आली आणि ‘वाय टू के’चा बागुलबुवा उभा राहिला. तेव्हाही याहू या कंपनीला धक्का पोहोचवू शकेल असा कुणीही स्पर्धक उभा नव्हता. १९९९ मध्ये याहू कंपनीच्या एका समभागाचे बाजारमूल्य हे ५०० डॉलर्स इतके होते. यानंतर मायाजालात घडलेल्या घडामोडी या सर्वज्ञात आहेत. पण याही कालावधीत याहूला फारसा धक्का बसला नव्हता. मात्र ‘वाय टू के’मधून तरून आलेल्या काही कंपन्यांपैकी एक म्हणजे स्टॅनफोर्ड विद्यापीठातील लॅरी पेग आणि सर्जी ब्रीन या द्वयीने उभारलेली गुगल ही कंपनी.

या गुगलने सरळ सरळ याहूला आव्हान दिले. २००१च्या सुमारास गुगल हे याहूपेक्षा जास्त हिट्स मिळवणारे संकेतस्थळ म्हणून ओळखले जाऊ लागले. संकेतस्थळाचे साधेपण आणि आत्तापर्यंतच्या सर्च इंजिन कंपनीच्या त्रुटी शोधून त्यावर दिलेले उत्तर यांसह गुगलने आपला प्रवास सुरू केला होता. यामुळे गुगल हे लोकांच्या पसंतीस उतरू लागले. यानंतर कंपनीने झपाटय़ाने बदल करीत संकेतस्थळावर छायाचित्र, व्हिडीओ, बातम्या आदी शोधांचा पर्याय उपलब्ध करून दिला. इतकेच नव्हे तर अल्पावधीत ई-मेल सेवाही उपलब्ध करून दिली. हे ग्राहकाला ‘नवे काही’ देणे होते. गुगलचा हा वेग याहूच्या लक्षात आलाच नाही. याहू सुशेगात होते. २००१ मध्ये याहूच्या एका समभागाचे बाजारमूल्य हे ८.११ डॉलर्स इथपर्यंत घसरले. त्या क्षणापासून याहूला घरघर लागली आणि माहितीजालातील ‘गुगली’वर कंपनीची ‘विकेट’ जाणार अशी चर्चा सुरू झाली. मात्र कंपनी कशीबशी तग धरू पाहत होती. याहूने सर्च इंजिनच्या उद्योगात वाढ करीत याहू मेसेंजर, व्हिडीओ शेअरिंग व्यासपीठ अशा एक ना अनेक सुविधा सुरू केल्या. पण गुगलचा वेग आणि दूरदृष्टी यांच्याशी स्पर्धा करणे त्यांना जमले नाही. याहूची ही अवस्था पाहत मायक्रोसॉफ्टने २००८ मध्ये कंपनीला ४४.४ अब्ज डॉलर्सला खरेदी करण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र तेव्हाही कंपनीला आत्मविश्वास होता की आपण बाजारात पुन्हा उभे राहू. यासाठी कंपनीने अनेक बदल केले. मात्र त्यातही त्यांना यश आले नाही. यामुळे अखेर आता व्हेरिजन ही कंपनी अवघ्या ४.८ अब्ज डॉलर्सना याहूची खरेदी करीत आहे.

यातून एक गोष्ट स्पष्ट झाली, ती म्हणजे आजच्या परिस्थितीत काळाच्या पुढे जाऊन संशोधन करणाऱ्या कंपन्यांच यशस्वी होत आहेत. ज्या कंपन्या वेळेवर काळानुरूप बदणार नाहीत त्यांना बाजारातून बाहेर जाण्याशिवाय पर्याय राहणार नाही. ‘गुगल’च्या लॅरी पेग यांचे सांगणे हेच आहे. ते लक्षात न घेतल्यास, व्यक्ती असो वा उद्योग, त्यांची अशाच एखाद्या गुगलीवर ‘विकेट’ गेल्याशिवाय राहणार नाही.

नोकियाचे अपयश

‘आम्ही काहीच चूक केली नाही; मात्र कोणत्या तरी मार्गाने आम्ही हरलो.’ या वाक्याने मायक्रोसॉफ्टने नोकियाची खरेदी केल्यावर नोकियाचे मुख्याधिकारी स्टीफन एलोप यांनी आपल्या भाषणाचा शेवट केला. मोबाइल फोन म्हणजे ‘नोकिया’ अशी एक व्याख्याच झाली होती. नोकियाला टक्कर देण्यासाठी विविध कंपन्या बाजारात दाखल झाल्या होत्या. मात्र त्या काळात त्यांना यश मिळाले नाही. पण २००७ मध्ये आयफोन बाजारात दाखल झाला आणि तोपर्यंत सर्वाधिक मोबाइलचा खप असलेल्या या कंपनीची उतरती कळा सुरू झाली. भविष्यात ग्राहकाची गरज बदलणार याचा अंदाज कंपनीतील चाणक्यांना आला होता. मात्र त्यावर कार्यवाही कशी करायची हे त्यांना उमजत नव्हते. कारण इतर कंपन्या प्रचंड वेगाने धावत होत्या. आपल्या हातात जे येणार होते ते स्पर्धकाच्या हातात गेले आणि आपण आता काहीच करू शकत नाही अशी त्यांची अवस्था झाली होती. झियाद जवाब्रा या व्यवस्थापन गुरूने लिंक्डइन या संकेतस्थळावर लिहिलेल्या ब्लॉगवर नोकियाच्या अपयशाबद्दल लिहिले आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, ‘त्यांनी नवीन शिकण्याची संधी चुकवली, बदलण्याची संधीही चुकवली. यामुळेच त्यांच्या हातात असलेली मोठे होण्याची संधी त्यांनी चुकवली. खूप पैसा कमविण्याची संधीच नव्हे तर आपला व्यवसाय तग धरण्याइतपतही क्षमता त्यांच्यात उरली नाही.’ नोकियाच्या अपयशाचे हे मुख्य कारण आहे. जे शिकण्यासाठी आणि बदलण्यासाठी तयार नसतात ते एक दिवस कालबाह्य होऊन जातात, असेही जवाब्रा यांनी ब्लॉगवर नमूद केले आहे. अशीच काहीशी चूक याहूकडूनही झाली.

 

नीरज पंडित

niraj.pandit@expressindia.com