02 March 2021

News Flash

फणसासारखा काटेरी, पण आतून गोड माणूस

पूना गेस्ट हाऊसचे मालक चारुदत्त सरपोतदार यांचे शुक्रवारी निधन झाले.

ना गेस्ट हाऊसचे मालक चारुदत्त सरपोतदार

समाजातील अनेक गरजू आणि होतकरू कलावंतांचे आधारवड, जुन्या चित्रपटांचा चालताबोलता इतिहास अशी ख्याती मिळवलेले पूना गेस्ट हाऊसचे मालक चारुदत्त सरपोतदार यांचे शुक्रवारी निधन झाले. सात दशकांपासून त्यांच्याशी स्नेह असलेल्या ज्येष्ठ सुहृदाने जागवलेल्या त्यांच्या आठवणी..

एकदा व्याख्यानाहून एसटीने पुण्यात परतण्यासाठी रात्रीचे अडीच वाजून गेले होते. माझ्यासमवेत सात-आठ जण होते. इतक्या मध्यरात्रीनंतर कुठे हॉटेल उघडे असते? मग आम्ही सगळे पाणी पिऊन झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी कुठून तरी चारुदत्त सरपोतदार यांना हे समजले. ते लगोलग पुरंदरे वाडय़ावर आले तेच मुळी रागाच्या फणकाऱ्यात. ‘‘रात्री किती वाजता आलात? जेवलात का?’’ अशी प्रश्नांची सरबत्ती त्यांनी सुरू केली. जेवलात का? या प्रश्नाला मी, ‘नाही’, असे उत्तर देताच, ‘‘मग आम्ही काय मेलो होतो का?’’ असा प्रतिप्रश्न त्यांनी केला. ते रागावले होते तरी त्या रागावण्यामध्ये विलक्षण प्रेम होते याची मला कल्पना होती. तर, असे हे चारुदत्त सरपोतदार नावाचे वादळी व्यक्तिमत्त्व. वरून फणसासारखे काटेरी, पण फणसात जसे गोड गरे असतात तसा हा माणूस  आतून गोड होता. चारुकाका रागावले आणि कितीही कडक शब्दांत बोलले तरी आपला अपमान झाला असे कधी वाटायचे नाही. ‘ते तसेच बोलणार’ हे समोरच्याने आधीच गृहीत धरलेले असायचे. त्यांचा मायेचा हात आईसारखा असायचा. ते रागावून बोलले तरी दुसऱ्या क्षणाला राग विसरून दडपे पोहे, कांदाभजीची डिश समोर यायची. मग जणू काही घडलेच नाही, अशा आविर्भावात समोरची व्यक्ती त्या खाद्यपदार्थाचा आस्वाद घ्यायची. हे दृश्य ‘पूना गेस्ट हाऊस’वर मी अनेकदा पाहिले आहे. अनंत चतुर्दशी हा पूना गेस्ट हाऊसचा वर्धापन दिन. त्यानिमित्त तेथे सत्यनारायणाची पूजा असते. माझा आणि चारुकाकांचा इतक्या वर्षांचा म्हणजे जवळपास सात दशकांचा स्नेह; पण काही ना काही कारणाने गेल्या ७० वर्षांत मला कधीच अनंत चतुर्दशीला पूना गेस्ट हाऊसला जायला जमले नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी प्रसाद आणि खाद्यपदार्थ घेऊन चारुकाका घरी यायचे. ‘‘तुम्ही आता मोठे झाला आहात. आम्हाला कोण विचारतोय,’’ अशी प्रस्तावना करून प्रसाद आणि खाद्यपदार्थ माझ्यासमोर ठेवत. ‘‘खा ते आधी मुकाटय़ाने,’’ असे चारुकाका चक्क दरडावणीच्या सुरातच बोलायचे. त्यांचा राग पाहिल्यानंतर मग तो प्रसादाचा शिरा अधिकच गोड लागत असे. अशी आमची निर्व्याज मैत्री होती. वास्तविक चारुकाका माझ्यापेक्षा वयाने लहान, पण मला ते वडिलांसारखे भासायचे. मीही त्यांना वडिलांना देतो तसाच मान द्यायचो. त्यांची आणि माझी मैत्री जुळण्याला बाबा म्हणजे भालजी पेंढारकर हा समान दुवा होता. आम्ही एकमेकांचे इतके चांगले मित्र असलो तरी एकमेकांशी कधी एकेरीमध्ये संवाद साधला नाही. स्वार्थापलीकडचे मैत्र म्हणजे काय असते हे मला चारुकाका यांच्यामध्ये सदैव जाणवत राहिले. चारुदत्त हा प्रेमाचा सल्लागार, पण त्यांना सल्ला विचारण्याची वेळच कधी आली नाही. कारण त्याआधीच आमचे एकमत झालेले असायचे; इतकी आमची मने एकरूप झालेली होती.

चारुदत्त आणि मी एकमेकांना पहिल्यांदा कधी भेटलो किंवा पाहिले हे आता नेमकेपणाने सांगता येणे कठीण आहे. त्यांचे वडील नानासाहेब यांना मी पाहिले होते. आदमबाग परिसरात मूकपटांची निर्मिती करणाऱ्या आर्यन फिल्म कंपनीचा स्टुडिओ होता. पोरवयाचा मी तेथे चित्रीकरण बघण्यासाठी जात असे. ललिता पवार, दादा साळवी, झुंजारराव पवार, शंकरराव भोसले असे दिग्गज कलाकार मी तेथे पाहिले. या स्टुडिओमध्ये एक मुलगा सामील झाला. रूढार्थाने तो कलावंत नव्हता, पण बोलण्यात चतुर, तडफदार, परखड, पण सुसंस्कृत. हा मुलगा म्हणजे आमचा चारुदत्त सरपोतदार. त्या पोरवयात मला जो इतिहास समजला, वाचला आणि थोडाफार अभ्यासला तो मी चारुदत्त यांना गोष्टीरूपात ऐकवायचो. चारुदत्त हे माझे पहिले श्रोते. याच काळात दादासाहेब तोरणे यांच्या सरस्वती सिनेटोन कंपनीमध्येही आम्ही जात असू. शांता आपटे, शाहू मोडक, दिनकर कामण्णा ही कलाकार मंडळी आमच्या गप्पागोष्टींत सहभागी व्हायची. जसजसे वय वाढत गेले तसतसा आमच्या मैत्रीला खानदानी भारदस्तपणा येत गेला. सरस्वती सिनेटोनमध्येच आमची भालजींशी भेट झाली. ‘धर्मवीर संभाजी’, ‘स्वराज्याचा शिलेदार’, ‘भक्त प्रल्हाद’ या त्यांच्या चित्रपटांचा परिणाम आमच्या दोघांच्याही मनावर झाला. सरपोतदार कुटुंबीयांमधील मी एक असल्याने बाबा, व्ही. शांताराम, दामले-फत्तेलाल यांच्याशी परिचय झाला. ‘तू चित्रपटात काम कर की,’ असे मला कोणी म्हणाले नाही. इतकेच काय, पण चित्रपटातील ‘मॉब सीन’मध्येही माझा विचार झाला नाही. अर्थात त्याबद्दल माझी काही तक्रार नाही. कदाचित त्यांच्या हिशेबात मी बसलो नसेन; पण बाबांवरील आमचे प्रेम आणि भक्ती कधी कमी झाली नाही. बाबांसाठी काहीही काम करण्याची आमची तयारी असायची.

चारुकाका हे व्यक्तिमत्त्व तसे कुणालाच सर्वार्थाने उमगणारे नाही. मला त्यांच्यातील पडद्यामागे राहून काम करणारा सामाजिक कार्यकर्ता हा अधिक भावतो. कलाकारांची चलती असते तेव्हा त्यांना पैसे मिळतात. हे पैसे व्यवस्थितपणे साठवून ठेवले जात नाहीत. पैसे आले की मग व्यसने लागतात. व्यसनापायी पैसे गमावून बसल्यानंतर वार्धक्यामध्ये त्यांची अवस्था बिकट होते. अशा अनेक कलाकारांना चारुकाका यांनी केवळ सांभाळले असे नाही, तर त्यांच्या नाना तऱ्हांसह सांभाळूनही घेतले. सुलोचनादीदी या त्यांना थोरल्या बहिणीसारख्या होत्या. चारुकाका यांनी सरपोतदार कुटुंबीयांची जबाबदारी तर यशस्वीपणे पार पाडलीच, पण सरपोतदार वगळता त्यांचे कुटुंब इतके विशाल होते की, त्यांच्या सभासदांची गणतीच होऊ शकत नाही. अडल्या-नडलेल्या, गरीब-होतकरू अशा असंख्य लोकांना चारुकाकांनी त्यांच्या जीवनामध्ये यशस्वीपणे उभे केले. बाबा आजारी पडले आणि त्यांचे निधन होणार हे समजताच मी, चारुदत्त आणि लतादीदी (लता मंगेशकर) त्यांना भेटण्यासाठी गेलो होतो. बाबांचे निधन होईपर्यंत चारुदत्त अस्वस्थ होते. मात्र, नंतर त्यांच्यातील कार्यकर्ता जागा झाला आणि दु:ख विसरून त्यांनी सारे काही पार पाडले. पन्हाळगडावरील तीन दरवाजाजवळ बाबांचे स्मारक निर्माण करण्यामध्ये चारुकाकांचे मोठे योगदान होते.

‘राजा शिवछत्रपती’ ग्रंथाची पहिली प्रत त्या काळातील शंभर रुपये देऊन सुलोचनादीदी यांनी खरेदी केली होती. या पुस्तकाच्या विक्रीतून मिळालेले पैसे चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊसाहेब यांच्या भूमिका उत्तम करणाऱ्या कलाकारांना प्रत्येकी एक लाख रुपये पुरस्कार म्हणून द्यायचे असे मी ठरविले आणि कलाकारांची निवड करण्याचे अधिकार चारुकाका यांना दिले होते. ‘‘विचारायचे काय त्यात? चंद्रकांतदादा (चंद्रकांत मांढरे), माई (लीला) पेंढारकर, सूर्यकांत आणि सुलोचना यांना देऊन टाकू,’’ असे त्यांनी सांगितले. खरे तर, माझ्याही

मनात तीच नावे होती जी चारुकाकांच्या ओठातून बाहेर पडली. अशा प्रसंगी कडक वाटत असला तरी पदार्थातील तिखट-मिठाप्रमाणे प्रमाणबद्ध असलेले चारुकाका यांच्या निधनाने मी जिवाभावाचा मित्र गमावला आहे.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे

शब्दांकन : विद्याधर कुलकर्णी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 21, 2018 1:01 am

Web Title: article on owner of famous puna guest house charudatta sarpotdar
Next Stories
1 नकारात्मक मताधिकार घातक  
2 जलविज्ञानाचा विसर न व्हावा..
3 आता नवी डिजिटल भांडवलशाही
Just Now!
X