निरंजन घाटे हे मराठीतले जिज्ञासू विज्ञान-लेखक. अनेक महिन्यांच्या आजारपणातून उठल्यावर त्यांना दिसलं ते महासाथीनं भेदरलेलं, ‘टाळेबंदी’ हाच उपचार मानणारं जग! या जगातल्या वाचकांसाठी, घाटे यांच्या नोंदींपैकी या निवडक नोंदी..

सध्या करोनानं मरणाऱ्या लोकांत कॉकेशियन वंशाच्या लोकांची संख्या सर्वाधिक आहे. याचं कारण जी मानवी शाखा युरोपमध्ये गेली ती परिस्थितीनुरूप बदलली. त्यांनी वेळोवेळी इतर वर्णाच्या लोकांना युरोपमध्ये येण्यापासून रोखलं. ज्यूंना त्रास दिला. पंधराव्या शतकात स्पेनमधून मूरिश (इस्लामी) आणि ज्यूंना वेचून हाकलून दिलं. यामुळे तिथले जननिक आदानप्रदान थांबलं.चीनमध्येही तेच घडलं. पंधराव्या शतकानंतर चीननं जगाशी संपर्क तोडला. त्याआधीही चिनी लोकांचा जगाशी संपर्क नव्हताच. त्यामुळे चीनमध्येही जननिक आदानप्रदान नसल्यानं त्यांच्यात रोगप्रतिकारकशक्ती मर्यादित प्रमाणात राहिली. जगात इतरत्र त्या मानानं मोठय़ा प्रमाणात जननिक आदानप्रदान म्हणजे रोटी-बेटी व्यवहार होत राहिले.

माया संस्कृतीचा नाश (इ.स. ९००) अशाच प्रकारे जगाशी फटकून राहिल्यामुळं झाला, असं मानववंश शास्त्रज्ञ म्हणतात.

‘हर्ड इम्युनिटी’ हा शब्द अलीकडे अधिक प्रचारात येऊ लागला. ही दोन प्रकारची असते. जननिक प्रतिक्षमता आणि प्रजातीय प्रतिक्षमता म्हणजे जेनेटिक इम्युनिटी आणि स्पीशीज इम्युनिटी. इम्युनिटी सिस्टीमला पारिभाषिक शब्द ‘प्रतिक्षमन प्रणाली’ असा आहे. हर्ड इम्युनिटीला आपण ‘सामुदायिक प्रतिक्षमता’ म्हणजे रोगप्रतिकारकशक्ती असं म्हणू शकतो.

जेनेटिक म्हणजे जननिक प्रतिक्षमता ही आनुवंशिक असते. प्रत्येक प्राण्याला त्याच्या आई-वडिलांकडून ती प्राप्त होते. कुठलीही व्यक्ती ही सर्व रोगांशी लढू शकत नाही. आनुवंशिकतेमुळे तिला काही रोगजंतूंशी सामना करता येतो. इतर रोगजंतूंविरुद्धची प्रतिक्षमता तिला स्वत:च मिळवावी लागते.

स्पीशीज हर्ड इम्युनिटी म्हणजे एखाद्या प्राणीजातीची प्रतिक्षमता. कुठल्याही प्राणीजातीतील सर्वच प्राण्यांत एखाद्या रोगाविरुद्ध लढण्याची क्षमता असत नाही तर प्रजातीपैकी ५० ते ६० टक्क्यांतच ती असते. हे असं का आणि त्या प्रतिक्षमतेची साथीच्या रोगाशी लढण्यात कशी मदत होते, हे संशोधकांपुढलं कोडं आहे.

विषाणूजन्य आजारांना आपण आळा घालू शकत नाही, हे वारंवार सिद्ध झालं आहे. हेलिकोबॅक्टर पायलोरी या रोगजंतूंमुळे अल्सर होतो. सुमारे दीड लाख वर्षांपासून म्हणजे मानवजात अस्तित्वात येण्याआधीही अल्सर आपल्या ‘पूर्वजां’ना सतावत आला आहे.

माणूस सुमारे १ लाख २० हजार वर्षांपूर्वी कातडी गुंडाळून अंग झाकू लागला ही बाब पिसू आणि माणसाचा जननिक अभ्यास करून मानव शास्त्रज्ञांनी शोधून काढली. हे कसं शक्य झालं? परोपजीवी – मग ते कीटक असोत, सूक्ष्मजीव असोत किंवा विषाणू असोत; त्यांच्यात आणि माणसामध्ये डीएनए आणि आरएनए रेणूंची देवाणघेवाण होते. मानवी उत्क्रांतीला या देवाण-घेवाणीचा हातभार लागला, असंही शास्त्रज्ञ म्हणतात. हिवताप आणि मानवाचं साहचर्य असंच शोधून काढण्यात आलं. हिवताप गेली किमान दहा हजार वर्षे माणसाला छळतो आहे, त्याचं संक्रमण कसं होतं हे शोधून काढलं गेलं त्याला शंभराहून अधिक वर्षे झाली. आजही भारतात आणि अमेरिकेतसुद्धा हिवतापानं मरणाऱ्यांची संख्या काही लाखांत आहे. विषाणूजन्य आजारांपैकी फ्लूनं वेळोवेळी थैमान घातलं आहे. स्पॅनिश फ्लूनं १९१८ साली दीड ते दोन कोटी लोकांना ‘देवाघरी’ पाठवलं. १९५७च्या साथीतही जगभर १ कोटीहून अधिक बळी घेतले. तेव्हा ‘ब्रेकिंग न्यूज’ हा प्रकार नसल्यामुळं फारसा गाजावाजा न होता, या साथी आल्या आणि गेल्या.

प्रतिजैविकांना दाद न देणारे विषाणू बरेच आहेत. हे परोपजीवींचे ‘उत्परिवर्तन’. एखाद्या प्राणीजातीची संख्या जेवढी जास्त तेवढा या परोपजीवींना उत्परिवर्तित व्हायला वाव अधिक, त्यामुळेच माणसाला बाधणाऱ्या रोगकारकांचे प्रमाणही जास्त. करोनाचे आत्ताच उत्परिवर्तन (म्यूटेशन) होऊन दहा प्रकार झाले आहेत, असा एक अंदाज आहे. ते आणखीही वाढू शकतात.

जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार जगात ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढली असून एकूण मानवी लोकसंख्येच्या सुमारे ३५ टक्के लोक ज्येष्ठ नागरिक आहेत (मीही त्यातलाच). यातले ८० टक्क्यांहून अधिक लोक एक तर अकार्यक्षम आहेत; किंवा कसलाही उद्योग नसलेले आहेत. त्यांच्या वैद्यकीय खर्चाचा भार दुसऱ्यावर असतो.

दुसऱ्या टोकाला बाल-कुमारांची आणि कायद्याने सज्ञान पण बेकार अशा व्यक्तींची संख्याही ३५ टक्के एवढी आहे. साथीच्या रोगांमध्ये ज्येष्ठ नागरिक व सहा वर्षांखालील मुले मरण्याचे प्रमाण सुमारे ८० ते ८५ टक्के एवढे असते; पूर्वी एकत्र कुटुंबपद्धती होती. त्या काळी साथींच्या रोगांमुळे लोकसंख्या नियंत्रण होई.

मोठाल्या सदनिकांत/बंगल्यात म्हातारा-म्हातारी दोघे किंवा काही वेळा एकटेच असतात. मुलं परदेशात असतात. काही वेळा ते गेलेत, हे दोन-तीन दिवसांनी लक्षात येतं. किंवा आईवडिलांना वृद्धाश्रमात टाकले जाते किंवा घराबाहेर हाकलून दिले जाते.. अशा परिस्थितीत साथीचे रोग परवडतात; असंच म्हणावं लागेल. त्यात अकार्यक्षम आणि अनिर्मितीक्षम लोक कमी होतील. ‘जातस्यहि ध्रुवो मृत्यु’ म्हणत वाढलेल्या भारतीय समाजात, असे लोक ‘औषधं जान्हवी तोयम्। वैद्यो नारायणो हरी॥’ हे विसरून नव्वदीत डॉक्टरांना वारेमाप पैसा देऊन महागडय़ा शस्त्रक्रिया करून घेतात, हेही अनाकलनीय ठरते.

हवामानबदलांच्या इतिहासाचा शास्त्रीय अभ्यास करणारे विल्यम रुडिमन यांच्या मते जेव्हा जेव्हा पृथ्वीवर साथीच्या रोगांनी थैमान मांडलं आणि त्यात मोठय़ा संख्येनं माणसांचे बळी घेतले तेव्हा तेव्हा पृथ्वीच्या जलवायुमानावर (क्लायमेट) त्याचा परिणाम झाला. गेल्या दोन हजार वर्षांत अधूनमधून कार्बन-डायऑक्साइडचं प्रमाण एकदम सरासरीपेक्षा कमी झालं.  इ.स. ५४०च्या सुमारास अनेक रोगांच्या साथींनी मानवी लोकसंख्या एकदम कमी झाली. त्याचप्रमाणे १४व्या शतकातही कॉलऱ्याच्या साथीनं मानवी लोकसंख्या कमी झाली. पंधराव्या-सोळाव्या शतकात युरोपीय लोकांनी अमेरिकेत नवे रोग नेले त्यामुळे अमेरिकेतील स्थानिकांची संख्या ९० टक्क्यांनी कमी झाली असावी. या प्रत्येक वेळी त्या त्या भूभागात स्थानिक स्वरूपाची हिमयुगं अवतरली. एक प्रकारे वातावरणाचं संतुलन साधण्याचा हा निसर्गाचा प्रयत्न असावा, असं रुडिमन यांना वाटतं. त्यांच्या ‘प्लॉज, प्लेग्ज अ‍ॅण्ड पेट्रोलियम’ या २००५ सालच्या ग्रंथात त्यांचे हे विचार विस्तृतपणे आले आहेत.

यासंबंधी कुणाला अधिक वाचन करायचे असेल तर ‘सायंटिफिक अमेरिकन’ या मासिकाचे मानवी उत्क्रांतीसंबंधीचे खास विशेषांक वाचावेत. त्यातही गॅरी स्टिक्स यांचे लेख उल्लेखनीय आहेत. ‘ट्रेसेस ऑफ अ डिस्टंट पास्ट’ हा लेख या संदर्भात विशेष माहितीप्रद आहे. तसेच ‘ब्लॅक डेथ’ या पुस्तकातही बरीच माहिती मिळते. ‘द प्लेग्ज’ हे साथीच्या रोगांसंबंधीचे ख्रिस्तोफर विक्सचे पुस्तकही यासंबंधीची बरीच माहिती देते.

युरोपातून कुणाकुणाला कसं आणि कधी हाकललं गेलं याची माहिती ‘द वर्ल्डली गुड्स : अ न्यू हिस्टरी ऑफ रेनेसाँ’ या लिझा जार्डिनच्या पुस्तकात सविस्तर देण्यात आली आहे.