रवीन्द्र रुक्मिणी पंढरीनाथ

महाराष्ट्रात शिवसेनेने भाजपची साथ सोडून नवीन वाट चोखाळली, तेव्हापासून तिच्या पुढच्या वैचारिक वाटचालीकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. एकीकडे संघपरिवार-भाजप ‘सुबह का भूला शाम को वापस आएगा’ या आशेवर आहेत. दुसरीकडे ते ‘शिवसेना हिंदुत्व विसरते आहे, सावरकरांच्या प्रश्नावर ठाम भूमिका घेत नाही’ असा प्रचारही जोरात करीत आहेत. ‘शिवसेनेचा वाघ आता दात पाडून पवारांच्या मांडीवर जाऊन बसला आहे, वाघाची मांजर झाली आहे’ असे संदेशही विविध माध्यमांतून दबल्या आवाजात, पण सातत्याने फिरविले जात आहेत. आतापर्यंत सर्वसामान्य शिवसैनिकाचा पिंड प्रक्षोभक भाषा, भावनिक आवाहने यांवर पोसला गेला होता. म्हणूनच आक्रमक हिंदुत्वाचा पांढरा-तांबडा रस्सा ओरपणारा शिवसैनिक सर्वधर्मसमभावाची भेंडीची भाजी खाऊन किती दिवस राहू शकेल, असा प्रश्न उपस्थित करून शिवसैनिकांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याची खेळी सेनेचे जुने मित्र करीत आहेत. शिवसेनेचे सर्वोच्च नेते उद्धव ठाकरे यांनी या टीकेला- ‘‘आम्ही हिंदुत्व जरूर मानतो, पण ते संघाचे ब्राह्मणी हिंदुत्व नव्हे; आमचे अब्राह्मणी  हिंदुत्व आहे,’’ असे प्रत्युत्तर दिले आहे. नुकतेच शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’च्या स्तंभात शिवसेना नेते संजय राऊत यांनी ‘करोना साथीच्या काळात देवांनी मैदान सोडले आणि आता माणसाला देव नाही, तर वैज्ञानिकच वाचवू शकतील’ असे ‘रोखठोक’ प्रतिपादन केले. या दोन घटनांमधून शिवसेनेच्या वैचारिक संक्रमणाची चुणूक पाहावयास मिळते.  हे ‘अब्राह्मणी हिंदुत्व’ काय असेल, शिवसेनेच्या आतापर्यंतच्या परंपरेत व शिवसैनिकांच्या ‘स्व’भाव-धर्मात ते कसे बसेल, मुळात शिवसेनेची परंपरा कोठून सुरू होते, असे अनेक निकडीचे प्रश्न राजकीय-वैचारिक संक्रमणाच्या या काळात ऐरणीवर आले आहेत.

NCP, sanjay Raut, sangli,
सांगलीत संजय राऊत यांच्या मदतीला राष्ट्रवादी का धावून गेली ?
BJP's sitting MP Unmesh Patil from Jalgaon joined Shiv Sena UBT on Wednesday .. Express Photo by Amit Chakravarty
“मला त्या पापात वाटेकरी व्हायचं नाही”, ठाकरे गटात प्रवेश करताच खासदार उन्मेश पाटलांचा भाजपावर गंभीर आरोप
chetan narke, kolhapur lok sabha, chetan narke shivsena
हातकणंगलेतून लढण्याचा शिवसेनेच्या प्रस्तावाला नकार; कोल्हापुरात लढणारच – डॉ. चेतन नरके
uddhav thackeray
उद्धव ठाकरेंच्या भाषणादरम्यान संजय राऊत, अंबादास दानवे झोपले? भाजपा पदाधिकाऱ्याने शेअर केला VIDEO

हे विद्यापीठीय-अकादमीय चर्चासत्राचे विषय नाहीत. महाराष्ट्राच्या राजकारणातील भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन पक्ष सध्या आपापल्या वैचारिक अक्षांश-रेखांशांवर विसावलेले आहेत. मात्र शिवसेना या सर्वात गतिशील पक्षात जोराची वैचारिक घुसळण सुरू आहे. शिवसेनेचा पाठीराखा वर्ग हा येथील प्रस्थापित पक्षांच्या जात-राजकारणाला कंटाळलेला, नवे काही करू पाहण्यासाठी आतुर असणारा बहुजनवर्ग आहे. त्यात तरुणांची संख्या मोठी आहे. विशेष म्हणजे त्याला रचनात्मक काम करण्याची आस आहे. शिवाय इतर पक्षांच्या तुलनेत अधिक आक्रमक व सक्रिय महिलावर्ग शिवसेनेपाशी आहे. आतापर्यंतच्या शिवसेनेच्या राजकारणामुळे ही प्रचंड मोठी ताकद अतिशय संकुचित राजकारणासाठी वापरली गेली. पण ही धडाकेबाज, आक्रमक व कृतिशील ताकद जर खऱ्याखुऱ्या सामाजिक परिवर्तनासाठी आणि रचनात्मक कार्यासाठी वापरली गेली, तर महाराष्ट्राच्याच नव्हे, तर देशाच्या समाज-राजकारणाला नवी दिशा देण्याचे सामर्थ्य तिच्यात नक्कीच आहे. या संदर्भचौकटीत आपल्याला ‘अब्राह्मणी हिंदुत्वा’चा शोध घ्यावयाचा आहे.

प्रबोधनकारांचा वारसा

यासंदर्भात पहिली आठवण येते ती अर्थातच प्रबोधनकार ठाकरेंची. ‘देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे’, ‘भिक्षुकशाहीचे बंड’ आणि पंडिता रमाबाई व गाडगे महाराज यांची चरित्रे लिहिणारे केशव सीताराम ठाकरे म्हणजे महात्मा फुलेंच्या परंपरेतील बुलंद आवाज! उपासतापास, व्रतवैकल्ये, पूजा-परिपाठ म्हणजे स्त्रिया व बहुजन समाज यांना भ्रमित करून त्यांची लूटमार करण्याचे भिक्षुकशाहीचे मार्ग आहेत, असे त्यांनी सांगितले. प्रेमविवाह हा अपराध मानला जात असतानाच्या काळात त्यांनी अनेक प्रेमी युगुलांचे विवाह लावून दिले (लव्ह जिहादच्या समर्थकांनी याची नोंद घ्यावी!). ‘खरा ब्राह्मण’ नाटक लिहून त्यांनी ब्राह्मण व ब्राह्मण्य यांतील फरक स्पष्ट केला. बाल-जरठ विवाह आणि हुंडा पद्धती यांच्याविरोधात प्रत्यक्ष कृती करून त्या काळातील धर्माच्या ठेकेदारांशी दोन हात केले. ते स्वत:ला हिंदुत्ववादी म्हणवून घेत. पण हिंदुत्ववाद्यांनी त्यांना कधीच आपले म्हटले नाही. गेले शतकभर भारतात हिंदुत्वाच्या नावाने जी विचारप्रणाली प्रचलित आहे, तिचे ‘पॅकेजिंग’ अनेकदा बदलले, पण तिचा गाभा मात्र ब्राह्मणी वर्चस्ववाद, स्त्रीचे दुय्यमत्व व परधर्मद्वेष हाच राहिला. त्यातील जातीवर्चस्वाचा मुद्दा बाजूला केला, की परधर्मद्वेषाचा मुद्दा आपोआप निकालात निघतो. कारण धर्माची (किंवा अन्य कोणतीही) अस्मिता चेतविण्यासाठी ‘ते’ व ‘आपण’ असे द्वंद्व उभे करणे आवश्यक असते. ते उभे केले की, आपल्या अंतर्गत असणारे विरोधाभास व द्वंद्वे यांच्याकडे डोळेझाक करता येते. त्याचा व्यत्यास म्हणजे, आपल्या धर्म/समाजातील एकाधिकारशाही, वर्चस्व यांची जाणीव झाली की आधी तिच्यात सुधारणा करण्याची निकड भासते. ‘बाहेर’च्या अशुद्ध, प्रदूषित धर्म/ समाजापासून आपला धर्म/समाज वाचवला पाहिजे, या आवाहनाला मग फारसा अर्थ उरत नाही. त्यामुळे जातीवर्चस्वाला विरोध करणाऱ्या आणि पंडिता रमाबाईंसारख्या स्त्री-पुरुष समतेच्या प्रखर समर्थक (त्यातही ख्रिश्चन धर्म स्वीकारलेल्या) विदुषीची पाठराखण करणाऱ्या प्रबोधनकारांचे हिंदुत्व सावरकरवादी व गोळवलकरवादी – दोन्ही प्रकारच्या हिंदुत्ववाद्यांना परवडले नाही, यात काय आश्चर्य?

अन्य धर्माप्रमाणे हिंदू धर्मातही पुराणमतवादी व सुधारक हा संघर्ष अनेक शतके सुरू आहे. गेल्या दीडशे वर्षांत तो अधिक धारदार बनला. येथील सनातन्यांनी लोकहितवादी- फुले दाम्पत्य- शाहू महाराज- सत्यशोधक चळवळ- आगरकर- आंबेडकर- कर्वे- महर्षी शिंदे- महात्मा गांधी- गाडगे महाराज- तुकडोजी महाराज, ते थेट दाभोलकर-पानसरे या सर्व सुधारकी परंपरांना प्राणपणाने विरोध केल्याचा इतिहास आहे. मात्र त्यासाठी त्यांनी सातत्याने वापर केला तो बहुजन समाजाचा. महात्मा फुले असोत की दाभोलकर-पानसरे, त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी जे हात उठले ते बहुजन समाजातील व्यक्तींचे होते; पण त्यामागील प्रेरणा मात्र ब्राह्मणी वर्चस्वाच्या होत्या. त्या नाकारल्या की  मग समाजसुधारणेला पाठिंबा द्यावा लागतो. तेव्हा फुले, आगरकर ते दाभोलकर-पानसरे शत्रू राहत नाहीत, तर आपले आदरस्थान बनतात. अंधश्रद्धाविरोधी कायद्याच्या विरोधात ज्यांची माथी भडकवली गेली ते बहुजन तरुण मग त्या कायद्याचे समर्थक बनतात. एवढे सगळे परिवर्तन हिंदुत्ववाद ते अब्राह्मणी हिंदुत्व या वैचारिक मन्वंतरातून (पॅराडिम शिफ्ट) होऊ शकते. अर्थातच, ते होऊ नये यासाठी हिंदुत्ववादी शक्ती आकाशपाताळ एक करतील यात शंका नाही.

इतिहासाचा दाखला

हे वैचारिक मन्वंतर कठीण आहे, पण अशक्य नाही. शंभर-सव्वाशे वर्षांपूर्वीचा महाराष्ट्राचा इतिहास डोळ्यांखालून घातला, तर त्याची खात्री पटेल. त्या वेळी महाराष्ट्रात आधी सामाजिक सुधारणा की राजकीय स्वातंत्र्य, हा वाद जोरात होता. राजकीय स्वातंत्र्याचे टिळकपंथीय जहाल पुरस्कर्ते सामाजिक सुधारणांच्या बाबतीत मवाळ भूमिका घेत. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य मिळाले तर पेशवाई परतेल, अशी भीती सामाजिक सुधारणांचा आग्रह धरणाऱ्या बहुजन समाजाला वाटत होती. त्यामुळे स्वातंत्र्यलढय़ापासून तो अलिप्त राहिला होता. मात्र महात्मा गांधींच्या आगमनाने ‘राजकीय की  सामाजिक’ ही कोंडी फुटली. परिवर्तनाचे सर्व लढे एकाच वेळी लढवले पाहिजेत, असे गांधीजींनी सांगितले आणि त्यासाठी कृतीकार्यक्रमही दिले. त्या वेळी विठ्ठल रामजी शिंदेंनी केशवराव जेधेंच्या मदतीने महाराष्ट्रातील बहुजन समाजाला गांधीप्रणीत स्वातंत्र्यलढय़ाच्या प्रवाहात सामील होण्याचे आवाहन केले. तसे घडले तर एकीकडे सामाजिक परिवर्तनाचा लढा तीव्र होईल आणि दुसरीकडे राजकीय आंदोलनाची सूत्रेही बहुजन समाजाच्या हातात जातील, या विचाराने सनातनी विचारांचे हिंदू नेते अस्वस्थ झाले. त्यांनी ‘शिवाजीचे वारसदार म्हणविणाऱ्या, वीरतेची पूजा करणाऱ्या मराठय़ांना गांधीजींची (सपक) अहिंसा कशी चालते?’ अशा प्रकारचे प्रश्न विचारून काँग्रेस-ब्राह्मणेतर युतीत खोडा घालण्याचा प्रयत्न केला. परंतु विठ्ठलराव शिंदेंनी तुकोबांच्या माध्यमातून गांधी-शिवाजी महाराज ऐक्याचे मर्म उलगडून सांगितले. त्यांच्या मते, या दोन्ही महापुरुषांमधील समान सूत्र कर्मयोगाचे सातत्य हे आहे. दोघांनी जे काही कार्य केले, ते स्वत:साठी नसून कर्मयोगाची उपासना या भावनेने केले. शिवरायांचे शौर्य व गांधीजींची अहिंसा- दोन्ही पराक्रमी पुरुषांच्या कृती आहेत; त्यांत भेकडपणाला स्थान नाही, असे त्यांनी बहुजन समाजाला समजावले. ज्या पुणे शहरात ब्राह्मण-ब्राह्मणेतर यांचा उभा दावा होता, त्याच शहरातून १९३४च्या निवडणुकीत काँग्रेसतर्फे उभे करण्यात आलेले दोन्ही उमेदवार- काकासाहेब गाडगीळ आणि केशवराव जेधे, एक ब्राह्मण व एक ब्राह्मणेतर- निवडून आले. संपूर्ण भारतातील बहुजनसमाजाला स्वातंत्र्यलढय़ात सामील करून घेण्याच्या प्रक्रियेची सुरुवात तेथून झाली. राजकीय नेतृत्वात त्यांचे स्थान निर्माण होण्याची सुरुवातही तेव्हाच झाली. या घटनेनंतर देशातील हिंदुत्ववादी राजकारण प्रभावहीन होत गेले.

हे पुन्हा कसे घडेल?

सांगण्याचा मुद्दा हा की, बहुजन समाजाचा बुद्धिभेद करून त्याला सामाजिक-राजकीय परिवर्तनाच्या प्रक्रियेपासून दूर ठेवण्याची प्रस्थापित हिंदुत्ववाद्यांची खेळी खूप जुनी आहे आणि ती बराच काळ यशस्वी झाल्याचेही आपल्याला दिसते. पण बहुजन समाजाच्या कर्त्यां नेत्यांनी योग्य सामाजिक-राजकीय भान राखून समाजात वैचारिक परिवर्तन घडवून आणले, तर बाजी उलटवून देशातील समाज-राजकारणाची सूत्रे ते आपल्या हातात घेऊ शकतात.

अर्थात, हे घडवून आणताना शिवसेना व शिवसैनिक यांचा ‘स्व’भाव ध्यानात घेतला पाहिजे. प्रस्थापितांचे मूर्तिभंजन व जहाल भाषा यांचे आकर्षण, शिवाजी महाराजांविषयी आत्यंतिक प्रेम व निष्ठा, रचनात्मक कामाची (सेनेच्या भाषेत समाजकारणाची) आवड आणि आक्रमक व निष्ठावान स्त्रीशक्ती ही सेनेची अंगभूत वैशिष्टय़े आहेत. त्यामुळे प्रबोधनकारांचे जहाल मूर्तिभंजन, महात्मा फुले व गोविंद पानसरे यांनी प्रतिपादलेले कुळवाडीभूषण व सर्व जाती-धर्मनायक शिवाजी महाराज, तसेच गाडगे महाराज व तुकडोजी महाराज यांचे रचनात्मक कार्य या सर्वाचा मेळ घालत हे वैचारिक परिवर्तन घडवावे लागेल.

अनेकांना हे स्वप्नरंजन वाटू शकेल. शिवसेना इतकी वैचारिक झेप, लवचीकता दाखवू शकेल का, हे बदल सर्वसामान्य शिवसैनिकाला पटतील व पचतील का, याची (रास्त) शंका अनेकांच्या (त्यात शिवसेनेचे समर्थकही आले) मनात डोकावू शकेल. मुळात शिवसेनेच्या नेतृत्वाला असे बदल घडवायचे आहेत का, येथूनही ही प्रश्नावली सुरू  होऊ शकते. प्रत्यक्षात काय घडेल याचे उत्तर काळच देईल. पण उद्धव ठाकरेंनी नवे राजकीय समीकरण जुळवले, त्याच क्षणी त्यांनी शिवसेनेची सुशेगात किनाऱ्यापाशी तरंगत असणारी नाव खवळल्या दर्यात लोटली आहे. त्यांना आता सुकाणू व वल्ही दोघांवर नियंत्रण ठेवावेच लागेल. करोनाच्या संकटाचा मुकाबला करताना त्यांनी जी प्रगल्भता दाखवली आहे, त्यावरून ते वादळाशी मुकाबला करण्यास घाबरत नाहीत हे दिसते. राहिला प्रश्न वैचारिक लवचीकतेचा. सुमारे १२-१३ वर्षांपूर्वी महाराष्ट्रात गणेश विसर्जनावरून झालेले वादंग काही जणांच्या तरी लक्षात असेल. त्या वेळी पर्यावरणतज्ज्ञांनी गणेश विसर्जनाच्या पद्धतीत काही मूलभूत बदल सुचविले होते, उदा. मूर्तीचा आकार लहान  करणे, प्लास्टर ऑफ पॅरिस व घटक रासायनिक रंगांचा वापर कमी करत करत बंद करणे, गणेशमूर्तीचे विसर्जन जलस्रोतांच्या बाहेर कृत्रिम कुंडात करणे आदी. सुरुवातीला शिवसेनेने ‘हा आमच्या धार्मिक स्वातंत्र्यावर घाला आहे’ असे म्हणून या सूचनांना विरोध केला. पण लवकरच सेनाप्रमुखांपासून सैनिकांपर्यंत सर्वानी त्या सूचना केवळ स्वीकारल्याच नाहीत, तर पर्यावरणपूरक गणेशोत्सव ही आपली जबाबदारी मानली. आजवर  संकटप्रसंगी लोकांच्या मदतीला धावून जाणारा व रक्तदान शिबिरे आयोजित करणारा शिवसैनिक करोनोत्तर जगात सार्वजनिक आरोग्य, गुणवत्तापूर्ण शिक्षण, निवारा, ग्राहक संरक्षण हे हक्क सर्वाना मिळावेत म्हणून रान उठवेल आणि लोकांनी त्यांच्या कर्तव्याचे पालन करावे म्हणूनही कार्य करेल. शिवसेना महिला आघाडी गाव व शहरांतील स्त्रियांच्या सुरक्षेचा मुद्दा समजून घेऊन त्यावर काम करेल. असे बरेच काही घडू शकेल. प्रश्न एवढाच आहे- त्यासाठी आवश्यक वैचारिक गरुडझेप शिवसेना घेईल का?

लेखक समाज-विज्ञान यांच्या आंतरसंबंधांचे अभ्यासक व कार्यकर्ते आहेत. ईमेल : ravindrarp@gmail.com