छाया पिंगे

संख्याशास्त्रात प्रचंड संशोधनकार्य करणारे जागतिक कीर्तीचे संख्याशास्त्रज्ञ प्रा. सी. आर. राव यांनी १० सप्टेंबर रोजी वयाची शंभरी गाठली. त्यानिमित्ताने, अजूनही संशोधनकार्यात व्यग्र असलेल्या प्रा. राव यांच्या जीवनकार्याची उजळणी करणारे हे टिपण..

परीक्षेत सचोटीने अव्वल आल्यानंतरही ज्याच्यावर पक्षपातीपणाचा शिक्का मारला जातो, केवळ अर्ज उशिरा मिळाल्यामुळे ज्याची रिसर्च स्कॉलरशिप नाकारली जाते, ज्याला मुलाखतीमध्ये नापास झाल्यामुळे गणितज्ञाची नोकरी मिळत नाही आणि तो पुढे जाऊन तब्बल ऐंशी वर्षे गणितातल्या शोधकार्यात असामान्य योगदान देतो, जगविख्यात गणितज्ञ, संख्याशास्त्रज्ञ म्हणून नावारूपाला येतो, अनेक नामांकित पुरस्कारांनी त्याला गौरवले जाते, यास नेमके काय म्हणावे? नियती, प्रारब्ध, योगायोग, विधिलिखित, नशिबाचे फासे.. की आणखी काही? या आणि अशा सर्व ‘चांगल्या-वाईट’ क्षणांना आपलेसे करत ज्यांनी स्वत:ला घडवले, ते प्रा. कल्यामपुडी राधाकृष्ण राव! प्रा. राव यांनी नुकताच आपला शंभरावा वाढदिवस साजरा केला.

कर्नाटकमधील बेल्लारी जिल्ह्य़ातील हदागाली या गावातल्या दोरायस्वामी नायडू आणि लक्ष्मीकांताम्मा या जोडप्याला १० सप्टेंबर १९२० रोजी आठवे अपत्य झाले. प्रथेनुसार त्यांनी ‘राधाकृष्ण’ असे कृष्णाचे नाव ठेवले. दहा भावंडांमध्ये लहानाचे मोठे होत असतानाच त्याची गणितातली चुणूक दिसून येत होती. पाचव्या वर्षी त्याला १६ पर्यंतचे पाढे तोंडपाठ होते. अकराव्या वर्षी पठ्ठय़ा किचकट अंकगणिते कागद-पेन्सिल न वापरता तोंडी सोडवायचा. त्याच्यावर त्याच्या आईचा खूप प्रभाव होता. प्रसन्नचित्ताने शांतपणे अभ्यास करण्यासाठी त्याची आई त्याला पहाटे ४ वाजता तेलाचा दिवा लावून देत असे. आंध्र प्रदेशातील गुडूर, नुझविड, नंदीगामा आणि विशाखापट्टणम आदी ठिकाणी त्याचे शिक्षण झाले. प्रथम क्रमांकाने गणितात एमए केले. त्या वेळी उत्तर आफ्रिकेत सर्वेक्षण युनिटमध्ये नोकरी मिळवण्याच्या उद्देशाने तो मुलाखतीसाठी कोलकात्यात आला. पण दुर्दैवाने(?) त्याला ती नोकरी मिळाली नाही. पण योगायोगाने तो इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिटय़ूट पाहण्यासाठी गेला आणि त्याची संख्याशास्त्राशी ओळख झाली. त्यातच पुढे शिक्षण घेण्याचे त्याने पक्के केले. संख्याशास्त्रात एम.एस्सी. केल्यानंतर गणितज्ञ महालनोबीस यांच्या सल्ल्यानुसार १९४६ मध्ये तो केम्ब्रिजला गेला आणि सर रोनाल्ड ए. फिशर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘जीवशास्त्रीय वर्गवारीत येणारे संख्याशास्त्रीय प्रश्न’ या विषयावर केम्ब्रिज विद्यापीठातून पीएच.डी. पदवी संपादन केली. एव्हाना तो मुलगा आदराने ‘प्रा. सी. आर. राव’ या नावाने ओळखला जाऊ लागला.

प्रा. राव यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातल्या मानववंशशास्त्र विभागात एका प्रकल्पावर काम केले. उत्तर आफ्रिकेत जेबेल मया या ठिकाणी सापडलेल्या मानवी सांगाडय़ांच्या अवशेषांवर आधारित विश्लेषण करणारा हा प्रकल्प त्यांच्या आयुष्यात मैलाचा दगड ठरला. वयाची तिशी पूर्ण होण्याआधीच त्यांच्या तीन संशोधनपर लेखांना जागतिक स्तरावर मान्यता मिळाली. जगभर संख्याशास्त्र पोहोचवण्याची अत्यंत मोलाची कामगिरी त्यांनी बजावली.

प्रा. राव यांचे क्रॅमर-राव असमानता आणि राव-ब्लॅकवेल प्रमेय हे अचूक अंदाज वर्तवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ‘थिअरी ऑफ एस्टिमेशन’मधील शोध अत्यंत प्रभावी ठरले. याखेरीज जी इन्व्हर्स, मल्टिव्हेरिएट अ‍ॅनालिसिस, टेस्टिंग ऑफ हायपोथिसिस, कॉम्बिनॅशनल डिझाइन, ऑर्थोगोनल एरेज, बायोमेट्री अशा किती तरी विषयांमधील त्यांच्या संशोधनामुळे अर्थशास्त्र, भूशास्त्र, मानसशास्त्र, जेनेटिक्स, मेडिसिन, सर्वेक्षण, लोकसंख्याशास्त्र, मानववंशशास्त्र, आदी क्षेत्रांत सर्वागीण उन्नती झाली.

कोलकाता येथील भारतीय सांख्यिकी संस्थेत प्राध्यापक, संशोधक, प्रशासक अशा विविध नात्यांनी धुरा सांभाळत ४० वर्षे नोकरी केल्यानंतर ते निवृत्त झाले. पुढे २५ वर्षे ते पिट्सबर्ग विद्यापीठ आणि पेन्सिल्व्हेनिया विद्यापीठात कार्यरत होते.

भारतीय सांख्यिकी संस्थेत असताना ४० वर्षांत त्यांनी दोनशेहूनही अधिक शोधनिबंध लिहिले. गंमत म्हणजे, त्यानंतर पुढच्या ४० वर्षांतही त्यांनी अमेरिकेत जवळपास तितकेच शोधनिबंध सादर केले. १५ पुस्तके त्यांच्या नावे जमा आहेत. ५० हूनही अधिक विद्यार्थ्यांना त्यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. संपादन करण्याची संधी मिळाली. त्यातले बहुसंख्य अजूनही संशोधन कार्य करत आहेत. त्यांचे किती तरी विद्यार्थी आपापल्या क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत आहेत. केम्ब्रिज विद्यापीठात त्यांनी मिळवलेल्या पीएच.डी. आणि एस.डी.व्यतिरिक्त जगातील आठ-दहा देशांच्या विद्यापीठांनी त्यांना मानद डॉक्टरेट देऊन सन्मानित केले आहे. २००२ मध्ये अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांच्या हस्ते ‘नॅशनल मेडल ऑफ सायन्स’ हा अमेरिकेतला विज्ञान क्षेत्रातला सर्वोच्च समजला जाणारा पुरस्कार त्यांना देण्यात आला. त्यांच्या संशोधनाला अमेरिकेत ‘फोर्ब्स’ या नावाजलेल्या मासिकाने ‘अ न्यू मंत्रा फॉर अमेरिकन इंडस्ट्री’ या शब्दांत गौरवले. २०१४ मध्ये आयआयटी (खरगपूर)ने ‘आधुनिक संख्याशास्त्रात मोलाची भर’ घातल्याबद्दल त्यांना मानद डॉक्टरेट दिली. तसेच पद्मभूषण (१९६८), महालनोबिस शताब्दी सुवर्णपदक (१९९३), पद्मविभूषण (२००१), इंटरनॅशनल स्टॅटिस्टिकल इन्स्टिटय़ूटचा आंतरराष्ट्रीय महालनोबीस पुरस्कार (२००३), इंडिया सव्‍‌र्हिस अ‍ॅवॉर्ड (२०१०), जगप्रसिद्ध गय सुवर्णपदक (आशियातील पहिले मानकरी, २०११), सरदार रत्न (२०१४) या आणि अशा किती तरी पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. १९६३ साली वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेतर्फे तत्कालीन पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार त्यांना देण्यात आला. त्या वेळी ‘एका संशोधकापेक्षा देशाला गरज जास्त आहे’ असे म्हणत त्यांनी त्या पुरस्काराची रक्कम संरक्षण खात्याला दान केली.

किती तरी पदव्या, पदके त्यांनी मिळवली, अनेक नामांकित पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले. असे असले तरी त्यांचे पाय मात्र कायम जमिनीवरच राहिले. मुलांना समरसून शिकवण्यात, त्यांच्याबरोबर चर्चा करण्यात त्यांनी आनंद मिळवला. त्यांच्या पत्नीचीही त्यांना चांगली साथ लाभली.

डॉ. राव यांच्या सल्ल्यानुसार २००७ साली हैदराबाद येथे संशोधनासाठी ‘सी. आर. राव अ‍ॅडव्हान्स्ड इन्स्टिटय़ूट ऑफ मॅथेमॅटिक्स, स्टॅटिस्टिक्स अ‍ॅण्ड कॉम्प्युटर सायन्स’ या अग्रगण्य मानल्या जाणाऱ्या संस्थेची स्थापना झाली. या संस्थेच्या जवळच असलेला ‘सी. आर. राव मार्ग’ हा समाजाने त्यांच्या कामाची दखल घेतल्याची साक्ष पटवतो.

द इंडियन इकॉनॉमेट्रिक सोसायटी, द इंटरनॅशनल बायोमेट्रिक सोसायटी, द इन्स्टिटय़ूट ऑफ मॅथेमॅटिकल स्टॅटिस्टिक्स, द इंटरनॅशनल स्टॅटिस्टिकल इन्स्टिटय़ूट, फोरम फॉर इंटरडिसिप्लिनरी मॅथेमॅटिक्स यांसारख्या किती तरी संस्थांत ते सक्रिय होते. दक्षिण आशियात हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधी आजारांच्या जागरूकतेसाठी कार्यरत असलेल्या ‘इंडियन हार्ट असोसिएशन’ या संस्थेचे धोरण आणि संख्याशास्त्र सल्लागार म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे.

जगातील अग्रगण्य मानल्या जाणाऱ्या संख्याशास्त्रज्ञांमध्ये सी. आर. राव यांचे नाव आदराने घेतले जाते. शंभराव्या वर्षीही ते संशोधन करत आहेत. त्यांना फोटोग्राफी, बागकाम, स्वयंपाक, भारतीय शास्त्रीय नृत्य यांची आवड आहे. कोलकात्यात असताना आपल्या सहकाऱ्यांबरोबर तसेच विद्यार्थ्यांबरोबर सॉकर, बॅडमिंटन खेळत असत. त्यांनी कायम शांत आणि संयमित जीवनशैली स्वीकारली. सध्या ते न्यू यॉर्कमध्ये त्यांच्या मुलीच्या कुटुंबाबरोबर राहत आहेत.

आज करोना महामारीच्या काळात प्रा. राव यांच्या विद्यार्थ्यांनी समाजमाध्यमांद्वारे एकत्र येत त्यांचा शंभरावा वाढदिवस यथोचित साजरा केला. त्यानिमित्ताने किती तरी जणांनी त्यांची छायाचित्रे, आठवणी यांना उजाळा दिला. महाविद्यालये, विद्यापीठे यांनी निरनिराळ्या पद्धतींनी प्रा. राव यांचा वाढदिवस साजरा करून त्यांना मानवंदना दिली.

(लेखिका संख्याशास्त्राच्या प्राध्यापक आहेत.)