नरेंद्र मोदी यांचा करिश्मा, अमित शाह यांची संघटनप्रज्ञा, स्थानिक पक्षसंघटना, उत्तुंग दृष्टी आणि आकांक्षी मतदार ही भाजपविजयाच्या उत्तर प्रदेश मॉडेलची वैशिष्टय़े ठरली, असे सांगताहेत सत्ताधारी पक्षाचे केंद्रीय प्रवक्ते..

काय निवडणूक होती ही. उत्तर प्रदेशात भाजपला ३१० हून अधिक जागा. असे होईल याचे स्वप्न तरी कोणी पाहिले होते का? पाच राज्यांच्या निवडणुकांचे अलीकडेच जाहीर झालेले हे पिढीत एकदाच पाहायला मिळणारे निकाल, विशेष करून उत्तर प्रदेशचा (यापुढे ‘यूपी’) निकाल, यामुळे ज्याला भारतीय राजकारणाची ‘नवी रीत’ म्हणता येईल असा बदल आता सुस्थापित झाला आहे. ही नवी रीत अशी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ऐतिहासिक नेतृत्व आणि अमित शहा यांचे संघटनकौशल्य लाभलेला भाजप हा देशातील सर्वोच्च पक्ष म्हणून प्रस्थापित झाला आहे- हर तऱ्हेच्या भारतीयांच्या आशा-आकांक्षांना तृप्त करणारा पक्ष.

प्रत्येक राज्याचे महत्त्व सारखेच असले तरी ‘यूपी’चे महत्त्व विशेषच, कारण काहीच दिसत नसेल तरी हे राज्य भारतीय राजकारणात जितक्या संख्येने लोकप्रतिनिधी आणते ते पाहा- ८० लोकसभा जागा, राज्यसभेच्या ३१ जागा आणि त्यासोबत राष्ट्रपती निवडणुकीत निर्णायक ठरणारा आवाज. पण यूपीत भाजपने असे नेमके काय केले की हे राज्य केसरिया रंगात इतके रंगून जावे? अखेर, राम मंदिर अभियान टिपेला पोहोचले असतानाही या राज्याने भाजपला इतके निर्णायक व सातत्यपूर्ण मतदान केले नव्हते. भाजपच्या ‘यूपी मॉडेल’चा साचेदार ठसा अन्यत्रही उमटावा, असे काही आहे का?

साररूप सांगायचे तर, भाजपच्या यूपी मॉडेलला पंचतत्त्व प्रतिरूप असे म्हणता येईल- हे अनुकरणीयच ठरावे, असे मॉडेल म्हणजे एक अचूक पंचकोनासारखे, जेथे प्रत्येक बाजूने अन्य सर्व बाजूंशी समतानता साधत काम केले.

पहिले तत्त्व किंवा पहिली बाजू म्हणजे अर्थातच- नरेंद्र मोदी यांचा करिश्मा. निवडणूक निकालांना काही महिनेच उरले असताना हा नेता म्हणतो की, बाकीच्यांप्रमाणे लोकानुनयी निर्णय न घेता मी भारताच्या ८६ टक्के चलनाचे निश्चलनीकरण करेन, त्याने तुमची गैरसोय होईल आणि तरीही लोक याच नेत्याला मते देतात, तीही याआधी कोणाला कधीही मिळाली नव्हती इतकी.. याला करिश्मा नाही तर काय म्हणायचे? यूपीच्या निकालांमुळे हेही सिद्ध झाले- किंबहुना ठासून सिद्ध झाले की, लोकांना सर्वात प्रिय वाटणारा मोदीजींचा गुण म्हणजे राष्ट्रहितासाठी दिसणारी त्यांची निर्णयक्षमता. आपल्या चमूला अहोरात्र, अधिकाधिक काम करण्यासाठी प्रवृत्त करणे असो, की एका वर्षांच्या आत दोन कोटी एलपीजी जोडण्या पुरवणे असो, भारतातील काळ्या पैशाला जबर ठोसा देणे असो किंवा भारत देश दहशतवादी हल्ल्यांना काय प्रत्युत्तर देईल याचा नवा मापदंड ‘सर्जिकल स्ट्राइक’द्वारे सुस्थापित करणे असो – मोदी यांची निर्णयक्षमता भारताचे हित जपण्यासाठी दिसली आहे आणि लोकांचे प्रेम यामुळेच त्यांना मिळाले आहे.

वाराणसीत मोदी यांनी सलग तीन दिवस प्रचार केला, तेथे प्रचंड प्रतिसादही त्यांनी मिळवला, यातून एक वैशिष्टय़ नक्कीच दिसून आले – मोदीजी मागल्या जागी बसणे जाणत नाहीत आणि ते काही, सैन्याला लढाईवर सोडून स्वत: मात्र बराकीत दडून बसणारे सेनापती नव्हेत. मोदीजी हे निव्वळ आणि निव्वळ अग्रस्थानीच राहून नेतृत्व देणारे सेनापती आहेत.

दुसरे तत्त्व म्हणजे अमित शहा यांची संघटन-प्रज्ञा आणि दुसऱ्यांचे गुण हेरण्याची त्यांची क्षमता. या राज्याचे (उत्तर प्रदेशचे) प्रभारी असताना २०१४ मध्येच अमितजींनी ही वैशिष्टय़े सिद्ध करून दाखवली होती. यशाच्या त्या जुन्या प्रतिरूपाचे दृढीकरण तर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने २०१७ मध्ये त्यांनी केलेच, पण आपण प्रत्येक अनुभवातून शिकणारी व्यक्ती आहोत, हेही दाखवून दिले. अवघ्या तीन वर्षांहूनही कमी काळात, २०१४ पासून भाजपच्या सदस्यसंख्येत १२ लाख इतकी नवी भर घालून पक्षाचा राज्यव्यापी सामाजिक पाया वाढविण्यात आला. पण अमित शहा यांचे भाजपच्या निवडणूक प्रचार-यंत्रणेला अढळ योगदान म्हणून ‘बूथ मॅनेजमेंट’चे महत्त्व सुस्थापित करण्याचा उल्लेख करावा लागेल. अमित शहा यांना उत्तर प्रदेशात २०१३ मध्ये पाठविण्यात आले, त्याआधी बूथ (मतदान केंद्र) व्यवस्थापन हा सूक्ष्म-व्यवस्थापनाला चालना देणारा प्रेरक घटक असतो, ही संकल्पनाच त्या राज्यातील भाजपच्या राजकारणात रुजलेली नव्हती.

अमितजींच्या मार्गदर्शनाखाली २०१४ च्या निवडणुकीत ३७ टक्के अतिमहत्त्वपूर्ण बूथसाठी भाजपच्या बूथ समित्या कार्यरत होत्या. ही संख्या २०१७ मध्ये वाढून ८७ टक्क्यांवर गेली. याखेरीज ८२ जिल्हे, १४६४ मंडल आणि ९९३३ सेक्टर असे राज्याचे भाग पाडण्यात आले. बूथ पातळीवर ‘पन्ना प्रमुख’ ही संकल्पना आधीपासूनच राबवल्यानंतर यंदा अमित शाह यांनी आणखी एक नवोन्मेष आणला : ‘बूथरक्षक’. बूथचे सर्वागांनी संरक्षण करणे, हे या बूथरक्षकांचे कार्य. ठरल्याप्रमाणे प्रचाराचे काम आपापल्या बूथ-क्षेत्रात होते आहे की नाही हे पाहण्यापासून ते वरिष्ठ नेत्यांना प्रतिसाद (फीडबॅक) कळविण्यापर्यंत सारी कामे करणारे हे बूथरक्षक मनाने-हृदयाने आपापल्या बूथशी जोडले गेले होते.

भाजपच्या प्रचारयंत्रणेचे तिसरे तत्त्व म्हणजे स्थानिक संघटनात्मक ढाचा. म्हणजे एका बाजूला सर्व ४०३ मतदारसंघांपैकी एकही मतदारसंघ किमान दोन प्रमुख प्रचार-नेत्यांच्या (स्टार कॅम्पेनर्सच्या) दौऱ्यांविना-सभांविना उरणार नाही हे पाहिले गेले, तर दुसऱ्या बाजूला राज्यातील संपूर्ण नेतृत्वफळी एकसंधपणेच काम करेल याची दक्षता घेतली गेली. यापैकी पहिले उद्दिष्ट अत्यंत सुनियोजित अशा परिवर्तन यात्रांमधून साध्य झाले. या यात्रा राज्याच्या प्रत्येक कानाकोपऱ्यांत पोहोचल्या, कार्यकर्त्यांना त्यांनी प्रेरणा दिली आणि तळागाळात थेट लोकसंपर्क प्रस्थापित करण्याचे कामही या यात्रांनी केले. आणि दुसरे उद्दिष्ट कसे साध्य केले म्हणाल तर- विचित्र वाटेल, पण – मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर न करण्यातून. या संदर्भात, मोठय़ा राज्यांत आधीच जाहीर केलेला चेहरा असल्याखेरीज कोणीही जिंकत नाही, हा समज या प्रयोगातून उत्तर प्रदेशने उद्ध्वस्त केला; किंबहुना भाजपने तर हे सिद्ध करून दाखवले आहे की, वरिष्ठ पदावर दावा सांगू पाहणारे अनेक नेते ज्या राज्यात असतात, जेथे हे सारेच स्पर्धक नेते घराणेशाहीच्या वारसाहक्कामुळे नव्हे तर लोकशाही प्रक्रियेतून वर आलेले असतात, त्या राज्यात मुख्यमंत्रिपदाचा चेहरा आधीच जाहीर न करण्याने वस्तुत: मदतच होते. यापूर्वी महाराष्ट्रात हेच सूत्र यशस्वी झाले, हरयाणातही तेच दिसले आणि आता उत्तर प्रदेशातून तर त्याचा वस्तुपाठच मिळावा, इतके ते प्रभावी ठरले.

चौथे तत्त्व म्हणजे तळागाळापर्यंत पसरलेला कामाला उत्तुंग दृष्टीची जोड देणे. भाजपने प्रकाशित केलेला जाहीरनामा केवळ र्सवकष आणि भविष्यवेधीच होता असे नव्हे; तर भाजपचे नवे नेतृत्व सर्वच बाबतींत ज्याप्रमाणे कटाक्ष राखते, त्याप्रमाणे या जाहीरनाम्याचे डिझाईन आणि प्रेझेंटेशन- मांडणी संकल्पन आणि सादरीकरणसुद्धा आकर्षकच होते. केवळ काही तरी कागद पुढे ठेवण्याचे काम पूर्ण करायचे म्हणून बनवलेला हा कंटाळवाणा दस्तऐवज अजिबात नव्हता. उलटपक्षी, पक्षातील अनेक वरिष्ठ प्रज्ञावंत, लखनऊहून आणि दिल्लीतूनही, या जाहीरनाम्याचा मसुदा पक्का करण्याच्या पहिल्या कामापासून ते त्याचे मांडणी संकल्पन आणि छापील वा अन्य रूपांत सादरीकरण कसे असावे, यासाठी बुद्धी वापरीत होते. आणि भाजपच्या नव्या पद्धतीनुसार, उत्तर प्रदेशीय लोकांकडूनही सूचना मागविण्यात आल्या आणि अशा ३० लाख सूचना प्राप्तदेखील झाल्या.

‘भाजप मॉडेल’चे पाचवे आणि अखेरचे तत्त्व हे सर्वाधिक भविष्यवेधी आणि अधिक दीर्घकालीन आवाहन असणारे आहे – भाजपच्या मतदारांचा ‘वर्ग’ प्रस्थापित करण्यातून आम्ही जातीनिहाय मतदार अथवा धर्मनिहाय मतदारांच्या मागे लागणाऱ्या इतरांपेक्षा निराळे ठरलो आहोत. भाजपचे आवाहन साधे-सरळ होते : जर तुम्हाला तुमचे आणि तुमच्या मुलाबाळांचे अधिक चांगले भवितव्य हवे असेल, तर एक वर्ग म्हणून आम्हाला मत द्या आणि तुमची जात, उपप्रदेश किंवा धर्म काय आहे हे येथे मध्ये आणू नका. पक्षाच्या स्थानिक नेतृत्वाच्या फळीतूनही हा वर्ग अधिक सुस्थापित झाला- राजनाथ सिंह यांच्यापासून कलराज मिश्र ते केशवप्रसाद मौर्य ते योगी आदित्यनाथ – या सर्वामधून राज्यातील लोकसंख्येच्या सर्वात व्यापक अशा आवाक्याचे प्रतिनिधित्व दिसून आले.

जर २०१४ हा मोदीयुगाचा प्रारंभ होता, तर निवडणूक निकालांच्या या फेरीनंतर नि:संशयपणे असे विधान करता येईल की, या युगाचा आता केवळ प्रारंभच झालेला नसून त्याचे सुदूर आणि सुफल भवितव्यदेखील आता दिसू लागले आहे, केवळ भाजपसाठीच नव्हे तर देशासाठीसुद्धा.

 

अनिल बलुनी

लेखक भारतीय जनता पक्षात राष्ट्रीय प्रवक्ता पदावर कार्यरत आहेत.