23 July 2019

News Flash

स्वयंचलित मोटार

नवप्रज्ञेचे तंत्रायन

|| हृषिकेश दत्ताराम शेर्लेकर

कृत्रिम बुद्धिमत्तेमधील महत्त्वाची उदाहरणे पाहताना स्वयंचलित मोटारीचा उल्लेख येणारच. मानवी मदतीशिवाय गाडी चालवण्याचे स्वप्न प्रत्यक्षात यायला अजून बरीच प्रगती करावी लागणार आहे..

गेल्या नऊ  लेखांत आपण कृत्रिम बुद्धिमत्ता सिद्धांत, थिअरीबद्दल प्राथमिक माहिती करून घेतली. यापुढे कृत्रिम बुद्धिमत्तामधील (एआय) काही महत्त्वाची उदाहरणे बघू. १) स्वयंचलित मोटार. २) मॅन टु मशीन संभाषण जसे चॅटबोट, अलेक्सा व्हॉइसबोट. ३) वैद्यकीय क्षेत्रातील एआय रोबोट्स. ४) आर्थिक विश्वातील एआय जसे अँटी मनी लाँडरिंग, गैरव्यवहार शोधणे. ५) गुगल सर्च, ६) शासकीय, लष्करी स्वयंचलित देखरेख व सुरक्षा. त्यापुढे काही प्रमुख देश व भारताची एआय क्षेत्रातील प्रगती व धोरणे, एआय संदर्भात सायबर सुरक्षा, नैतिकता, धोके, विविध उद्योगांतील एआयची प्रगती- रिटेल, पायाभूत सुविधा, दरसंचार, माध्यमे, ऊर्जा. त्यापुढे एआयचे घरगुती उपयोग- म्हणजे गृहिणी, वयस्क, लहान मुले यांना. पुढे  करिअर, नोकरी, प्रशिक्षण, उद्योग यावर आणि शेवटी एआय फॉर ऑल म्हणजेच सामाजिक प्रश्न, गरिबांसाठी सुविधा आणि एआय तंत्रज्ञानाचा वापर.

तर, आज स्वयंचलित गाडी या महत्त्वाच्या विषयाबद्दल. यांना चालकविरहित मोटार, ऑटोनॉमस कार (एव्ही ) असेही म्हटले जाते. तसे बघायला गेले तर स्वयंचलित वाहने हे काही नवीन मुळीच नाही. विमाने ही पूर्णपणे ‘ऑटो पायलट’ पद्धतीने चालवता येतात. पायलट हा जास्त करून टेक ऑफ, लॅण्डिंग आणि खराब हवामान असेल फक्त त्या वेळीच स्वत: विमानाचे नियंत्रण हातात घेतो. तशीच बाब बोट, रेल्वे व औद्योगिक वाहनांमध्ये बघायला मिळते – आंशिक स्वयंचलित पद्धत.

पण रस्त्यावरच्या गाडय़ांचे तसे नाही अजून तरी. वाहनाचा चालक तिच्यावर पूर्णपणे ताबा ठेवून, स्टीअरिंग, गियर, पेडल्स, दिवे यांचा वापर खुबीने करून ती सुरक्षितपणे चालवतो. वाहतूक नियम पाळतो आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करतो. हे सगळे चालक हाताने करतो. म्हणूनच अशा गाडीला चालकविरहित, ऑटोनॉमस, स्वयंचलित, इंटेलिजेंट नाही म्हणता येणार.

एव्हीचे अंतिम उद्दिष्ट कुठल्याही मानवी मदतीशिवाय गाडी चालवणे हेच आहे. ते प्रत्यक्षात यायला अजून बरीच प्रगती करावी लागणार आहे; पण त्याचबरोबर गरज आहे अशा वाहतुकीसाठी सर्वसमावेशक धोरण व नियम. एव्ही गाडी तीन प्रमुख गोष्टी करून स्वयंचलित पद्धतीने चालते.

१) विविध सेन्सर्स, कॅमेरे वापरून स्वत: भवतालचा नकाशा बनविणे, जसे आपण डोळ्यांनी आजूबाजूला बघतो.

२) एआयवर आधारित एव्ही सॉफ्टवेअर्स या नकाशाचा डेटा वापरून एक जाण्याचा मार्ग ठरवतात व निर्णय घेतात. ज्याप्रमाणे आपला मेंदू मिळालेल्या माहितीचे विश्लेषण करून त्वरित निर्णय घेतो तसे. गाडीचा वेग वाढवणे, कमी करणे, चाक वळवणे, ब्रेक किंवा अ‍ॅक्सिलेटर पॅडल दाबणे व किती जोरात, हळू हे महत्त्वाचे आणि कधी कधी तातडीने थांबणे.

३) हे सॉफ्टवेअर गाडीच्या कंट्रोल्सला कार्यान्वित करून गरजेप्रमाणे वरीलपैकी कृती करतात.  याच सॉफ्टवेअरमध्ये अडथळे टाळणे, प्रादेशिक वाहतूकनियम, इतर गाडय़ांशी व पायाभूत सुविधांबरोबर संवाद, समन्वय साधणे अशा क्षमतादेखील असतात.

आपण काय करायचे मग? सोप्पं आहे. आरामात मागे बसून प्रवास आणि अर्थातच गप्पाटप्पा, फोन, आजूबाजूचा निसर्ग, गाणी, सिनेमा आणि कंटाळा आला तर चक्क डुलकी. भविष्यातील शक्यतेचा साधा विचार केला तरी विस्मय वाटतो नाही?

काही लोक म्हणतील अशा गाडय़ा हव्यातच कशाला मुळात? या विषयावर अनेक मतमतांतरे असू शकतात; पण काही महत्त्वाची माहिती व दहा प्रमुख मुद्दे खालीलप्रमाणे. हे जागतिक संशोधनावर आधारित आहे.

१) अपघात कमी करणे : मागील वर्षी जगामध्ये रस्ता अपघातात १२ लाखांहून अधिक लोक दगावले. संशोधनानुसार ९०% अपघात हे मानवी चुकीमुळे होतात. यातील प्रमुख कारणे होती बेदरकारपणे, झोपेत, नशेत, रागाच्या भरात, आत्महत्या किंवा नुकसान हेतू ठेवून, व्यवस्थित ड्रायव्हिंग येत नसताना गाडी चालवणे. वाहतुकीचे नियम न पाळणे. विचार करण्यासारखी गोष्ट आहे, की ही सर्व कारणे फक्त आपण सहज टाळू शकलो असतो. आपल्या भारतात २०१६ मध्ये रस्ते अपघातात मरण पावलेल्या ६०% लोकांचा वयोगट १८ ते ३५ होता.

२) वाहतूक कोंडी कमी करणे : अमेरिकी लोकांचे वर्षांला ६.९ अब्ज तास वाहतूक कोंडीमध्ये थांबून, बसून वाया जातात. आपल्या देशातील माहिती उपलब्ध नसली तरी असा वेळेचा अपव्यय अनेकपट असावा. संशोधनानुसार त्यातील २५ टक्के वेळ वाया जातो तो रस्त्यावर झालेल्या अपघातांमुळे. तसेच चुकीच्या पद्धतीने गाडी चालवणे, नियम न पाळणे, बेशिस्तपणा यामुळे होणारी वाहतूक कोंडी वेगळीच.

३) प्रदूषण कमी करणे : वाहतूक कमी तेवढेच प्रदूषण कमी. दुसरे- संगणक गाडी चालवेल तेव्हा शिस्तबद्ध पद्धतीनेच चालवणार. मुख्य म्हणजे प्रत्येक वेळी उगीचच व्रूम व्रूम, धूम स्टाइल पेट्रोल उधळणे.

४) रस्ते वापर इष्टतम पद्धतीने करणे : संशोधनानुसार महामार्गाची क्षमता व त्यांचा योग्य वापर जवळजवळ दुपटीने वाढू शकेल. द्रुतगती मार्गावरील वेग वीस टक्क्यांनी वाढू शकेल. का? कारण उगीचच लेन सोडून गाडी पळवणे, अचानक गती वाढवणे, गरज नसताना ओव्हरटेक करणे हे सगळे थांबेल.

५) इंधन मायलेज वाढविणे : ४ टक्के ते १० टक्के इंधन बचत फक्त योग्य पद्धतीने गाडीची गती वाढवणे, कमी करण्यामुळे होईल. कारण अ‍ॅक्सिलेटर पॅडल कॉम्प्युटरने नियंत्रित केले जाईल. त्यापुढे बचत वाढून ४० टक्क्य़ांपर्यंत जाईल.

६) प्रवासाचा वेळ कमी करणे : वरील सर्व कारणांमुळे जवळजवळ ४० टक्के वेळेची बचत होऊ  शकते.

७) प्रवास खर्च कमी होणे : वरील सर्व कारणांमुळे, वेळ, मायलेज, चालकावरील खर्च कमी होऊन शेवटी सामान्य ग्राहकवर्गाला फायदा होईल. टॅक्सीसेवाही स्वस्त होईल. तुम्ही स्वत: गाडी चालविण्यापासून मुक्त व्हाल. तेव्हा नक्कीच हा वाचलेला वेळ गाडीत मागे बसून कुठल्या तरी कामासाठी वापराल, त्यातून निर्माण होणारे राष्ट्रीय उत्पन्न वेगळेच.

८) इष्टतम पार्किंग : एव्हीमुळे पार्किंगची गरज कमी होईल. कारण माणसेच गाडी कामाच्या जागेपासून जास्तीत जास्त जवळ पार्क करण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे वाहतूक  वाढते. रोबोटिक कार्स कुठेही जातील आणि मोबाइलमधील कळ दाबल्यावर आपल्याला घ्यायला परत येतील.

९) लास्ट माइल सव्‍‌र्हिसेस : सार्वजनिक वाहतूक थांब्यांपासून घरी, ऑफिसला जायला उपयुक्त अशी वन-वे एआय वाहने असतील. ना पार्किंगची कटकट ना चालवायची.

१०) सर्वासाठी प्रवासस्वातंत्र्य : वयस्कर, आजारी, अपंग, लहान मुले, गाडी न चालवता येणे यामुळे अनेक जण त्रस्त, परावलंबी असतात. त्यांच्यासाठी ही गाडी मोठा दिलासा ठरेल. लोकसंख्या कमी असलेल्या देशांमध्ये अजूनच महत्त्वाचे.

अर्थात वाहनचालकांचा रोजगार हा विषय आहेच, पण डेटा हेच सांगतो की, भारतातही उपलब्ध चालक आणि वाढणारी गरज यामध्ये खूप तफावत आहे. त्यात भर म्हणजे एव्ही कार्स नियंत्रित करायला लागणारे नवीन मनुष्यबळ. सर्वात मुख्य म्हणजे जरी अशा गाडय़ा भविष्यात निर्माण झाल्या तरी एकंदर लोकसंख्या, गाडय़ा, त्यांचा वापर वाढल्यामुळे नवीन रोजगारनिर्मितीच अधिक होईल; पण एक मात्र नक्की, चालकाच्या कामाचे स्वरूप व कौशल्य आमूलाग्र बदललेले असेल. दुसरे म्हणजे एव्ही वाहने एकूण वाहनांच्या जास्तीत जास्त २० ते २५ टक्के असतील व भविष्यात मनुष्य चालवणाऱ्या व मशीनने चालवणाऱ्या अशा दोन्ही प्रकारच्या गाडय़ा रस्त्यावर एकत्र धावतील. सिग्नलला थांबून बाजूस डोकवावे तर बाजूच्या गाडीला चालक तर सोडाच, ड्रायव्हर सीटपण नसावी. फक्त अनेक कॅमेरे असावेत. गंमत असेल नाही!

पुढील भागात आपण एव्ही वाहनांचे एल० ते एल५ ऑटोनॉमी प्रकार, एलआयडीएआर तंत्रज्ञान, टेस्ला, उबर, गुगलने केलेले प्रयोग, एव्ही वाहनांच्या मागील शास्त्र – भवतालचा मॅप, अडथळे टाळणे, मार्ग नियोजन कसे होते, त्यामधील एआय, कॉम्प्युटर व्हिजन तंत्रज्ञान आणि एव्हीमुळे भविष्यातील आव्हाने, चिंता, नैतिकता वगैरे बघू.

शेवटी सर्व वाचकांना आवाहन करतो की, त्यांना काही सूचना आणि याव्यतिरिक्त विशिष्ट विषय हवे असतील तर कळवावे. समाविष्ट करण्याचा प्रयत्न नक्कीच करेन.

hrishikesh.sherlekar@gmail.com

लेखक टाटा कन्सल्टन्सी सव्‍‌र्हिसेसमध्ये साहाय्यक उपाध्यक्ष आणि सध्या अ‍ॅनालिटिक्स आणि इनसाइट्सच्या यूएसए सेंटरचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.

First Published on March 11, 2019 12:15 am

Web Title: automotive artificial intelligence car