धर्माच्या आधारावर मुस्लिमांना आरक्षण देण्याच्या प्रस्तावावर आक्षेप नोंदवताना मुस्लीम ओबीसींचा, दलित मुस्लिमांचा आणि पर्यायाने भारतीय मुसलमानांमध्ये टिकून असलेल्या जातीपातींचा उल्लेख अपरिहार्य ठरतोच. परंतु या मुस्लीम जातीपातींचे वास्तव त्याहीपेक्षा मोठे कसे आहे आणि, त्या वास्तवाचा अभ्यासही कसकसा झालेला आहे, याचे अनेक ग्रंथांचा आधार घेऊन केलेले हे स्पष्टीकरण..
‘धर्मीय आरक्षणाचे (अ)वास्तव’ या ‘लोकसत्ता’च्या ३१ ऑक्टोबर २०१३ च्या अंकात प्रसिद्ध झालेल्या माझ्या लेखावर अनेक वाचकांच्या प्रतिक्रिया माझ्या ई-मेलवर आल्या आहेत. त्यात मला काही प्रश्न विचारून त्यांवर मी स्वतंत्रपणे लिहावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. त्यात मुस्लीम वाचकांनी असा प्रश्न उपस्थित केला आहे की, इस्लाममध्ये जात-पात नाही, सर्व समान मानले जातात, मग मी मुस्लीम ओबीसी आणि दलित मुस्लीम ही संकल्पना कोठून आणली? आणि अशा प्रकारे मी मुसलमानांमध्ये जातिभेद निर्माण करीत आहे. तसेच त्यांनी मला इस्लामचा आणि दिव्य कुरआनचा अभ्यास करण्याचा सल्लासुद्धा दिला आहे. त्यांचा सल्ला मी शिरोधार्य मानतो. कारण इस्लामच नव्हे तर सर्वच धर्माचा अभ्यास माझ्या आवडीचा विषय आहे. पवित्र कुरआनचा गेल्या चाळीस वर्षांपासून अभ्यास करीत असून,  किमान ३० ते ४० वेळा संपूर्ण कुरआन (विविध भाषांतील भाषांतरे, वेगवेगळ्या भाषांतरकारांनी केलेली)चे पठण केले आहे. (मला उर्दू, मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषा अवगत आहेत.) या सर्व भाषांमधील मला उपलब्ध झालेली सर्व भाषांतरे आणि वेगवेगळ्या भाष्यकारांनी केलेली भाष्येसुद्धा अभ्यासली आहेत. आणि नित्यनेमाने आजही तो क्रम जारी आहे, हे नम्रपणे नमूद करू इच्छितो. तसेच अहमदिया मुस्लीम जमाअतद्वारे १९९१ साली प्रकाशित झालेल्या पवित्र कुरआनच्या मराठी भाषांतरामध्ये माझादेखील अल्पसा सहभाग होता, हे सौभाग्य मला प्राप्त आहे.
इस्लाममध्ये जात-पात, उच्च-नीच अजिबात नाही याबद्दल कोणालाही तिळमात्र शंका नाही. उलट पवित्र कुरआनमध्ये तर सर्व मानवजात एकाच पुरुष आणि स्त्रीपासून निर्माण झाली असून कुटुंबकबिले हे फक्त ओळखीसाठी आहेत. (जन्मावरून कोणीही श्रेष्ठ ठरत नाही) तर तुमच्यापैकी जो सर्वाधिक सदाचरणी आहे, तोच सर्वश्रेष्ठ आहे, असे स्पष्ट केले आहे. (प. कुरआन ४९:१३) हीच गोष्ट अधिक स्पष्ट करून हजरत मुहम्मद पैगंबर यांनी त्यांच्या शेवटच्या प्रवचनात सांगितले की, काळ्याला गोऱ्यावर, गोऱ्याला काळ्यावर, अरबांना अरबेतरांवर आणि अरबेतरांना अरबांवर कोणतेही श्रेष्ठत्व प्राप्त नाही. श्रेष्ठतम तोच आहे, जो सदाचरणी आहे.
हे नि:संदिग्ध सत्य असले तरी, भारतीय उपखंडातील मुस्लीम समाजात जात-पात, उच्च-नीचता फक्त मानलीच जात नाही तर ती पाळलीदेखील जाते, हे वास्तव कसे नाकारता येईल? ही जातिव्यवस्था मुस्लीम समाजात रुजण्याचे एक कारण मी माझ्या लेखात नमूद केले आहे, ते म्हणजे भारतातील ज्या मुस्लिमेतरांनी इस्लाम धर्म स्वीकारला, त्यांचा धर्म बदलला तरी व्यवसाय बदलले नाहीत आणि भारतातील सनातन आणि वैदिक धर्मात जाती या व्यवसायावरून ठरविण्यात आलेल्या असल्यामुळे, त्या जाती मुस्लीम समाजातदेखील आल्या. तसेच भारतीय समाजात कष्टकऱ्यांच्या व्यवसायांना चिकटलेली लांच्छने (२३्रॠें) देखील मुसलमान समाजात तशीच आली. मोठय़ा प्रमाणात धर्मातर झाल्यामुळे हे अपरिहार्य होते, हे मला मान्य आहे आणि याबद्दल तक्रारदेखील नाही. परंतु ज्या गोष्टीचे दु:ख वाटते ती ही की, मुस्लीम मुल्ला-मौलवींनी या जातिव्यवस्थेला धार्मिक (इस्लामिक) अधिष्ठान दिले आणि हे सर्व ग्रथित केले आहे. असे करताना त्यांनी प. कुरआन आणि पवित्र पैगंबर हजरत मुहम्मद (स. स.) यांच्या कृती (सुन्नत) आणि उक्ती (हदीस)द्वारा प्रस्थापित झालेल्या संपूर्ण आणि र्सवकष समतेच्या शिकवणुकीची उघड उघड पायमल्ली केली; आणि हे सर्व प्रकार मुस्लीम समाजाने सहन केले, मान्य केले याचे अधिक दु:ख वाटते. शेकडो वर्षांपूर्वी झियाउद्दीन बरनी (याला काही मुस्लीम अभ्यासक, ‘मुस्लीम मनु’ म्हणून संबोधतात.) याने इस्लाममध्ये उच्च-नीचतेला खूप महत्त्व आहे, असे नमूद करताना मनुस्मृतीचीच भाषा वापरली. ‘फतावा आलमगिरी’ या इस्लामी धर्मशास्त्रग्रंथात कोणती जात श्रेष्ठ आहे, कोणती जात नीच आहे हे विस्ताराने मांडले आहे. १९व्या-२०व्या शतकातील मौलवी अशरफ अली थान्वी यांनी ‘बहेश्ती जेवर’ या ग्रंथात आणि त्यांच्या अन्य ग्रंथांत, मौलवी अहमद रझाखान बरेलवी यांनी ‘फतावा रझ्विया’ या आणि अन्य ग्रंथांत, बेटी व्यवहार करताना जात-पात कशी कशी पाळली जावी हे सविस्तर मांडले आहे. एवढेच नव्हे तर तथाकथित ‘सय्यद’ जातीची व्यक्ती जरी निरक्षर आणि महामूर्ख असली तरी ती एखाद्या विद्वान पंडित असलेल्या ‘जुलाहा’ (विणकर) जातीच्या मौलवीपेक्षा कशी श्रेष्ठ ठरते, हे अतिशय उद्वेगजनक भाषेत मांडले आहे. दुर्दैवाने हे सर्व ग्रंथ आजही मुस्लीम समाजात प्रचलित आहेत, अभ्यासले जातात, मदरसामधून शिकविले जातात आणि त्यानुसार आचरणदेखील केले आणि करविले जाते. हे मान्य होणे शक्य आहे की, ज्या हिंदू उच्चवर्णीयांनी इस्लाम धर्म स्वीकारला, त्यांचेच हे कट-कारस्थान आहे आणि वर नामोल्लेख केलेले मुल्ला-मौलवी त्यांचेच वंशज असणेही शक्य आहे, परंतु ज्यांचा इस्लाम धर्माचा मूलभूत अभ्यास आहे, त्या मौलवींनी हे ग्रंथ रद्द का ठरविले नाहीत, हा प्रश्न अनुत्तरित राहतो. आम्ही चळवळीतील कार्यकर्ते ज्यांना दलित-मुस्लीम म्हणतो त्यांना तर उत्तर भारतात अस्पृश्यदेखील मानले जाते. त्यांच्याबरोबर रोटी-बेटी व्यवहार तर सोडा अनेक मस्जिदीमध्ये त्यांना खांद्याला खांदा लावून एका रांगेत (सफ) उभे राहू दिले जात नाही. त्यांना वेगळी रांग करून उभे राहावे लागते. महाराष्ट्रातदेखील तथाकथित सय्यदांच्या बहुतेक मस्जिदींमध्ये तथाकथित खालच्या जातीचा मौलवी ‘इमाम’ म्हणून नियुक्त केला जात नाही, तसेच ‘पहली सफ’ (रांग) सय्यदांसाठी राखीव ठेवली जाते. मुस्लीम समाजात ‘अश्रफ’ किंवा ‘अशरफ’(उच्चतम), ‘अजलफ’ (नीच) आणि ‘अरजल’ (रजीलचे बहुवचन) आणि ‘कमिने’ (नीचतम) या परिभाषा कोणी व का प्रचलित केल्या?
या सर्व प्रकारांविरुद्ध आवाज उठविण्याचे काम फक्त मुस्लीम ओ.बी.सी. चळवळीतील कार्यकर्ते आणि आधुनिक शिक्षणातून विद्याविभूषित झालेले तरुणच करीत आहेत. मुल्ला-मौलवींचे वर्तन दांभिकपणाचे आहे.
तत्त्वत: इस्लाममध्ये जात-पात, उच्च-नीचता नाही ही गोष्ट इस्लामचे कट्टर विरोधकदेखील मान्य करतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा धर्मातर करण्याचा विचार मांडला, तेव्हा त्यांना इस्लाम धर्म स्वीकार करण्याचा आग्रह करण्यासाठी तत्कालीन खासदार मौलवी हिफ्जूर्रहमान सैहारवी त्यांना भेटले आणि त्यांना इस्लामला विषमता कशी मान्य नाही, इस्लाम कसा समताधिष्ठित धर्म आहे, हे सांगावयास सुरुवात केली. तेव्हा डॉ. बाबासाहेब त्यांना हेच म्हणाले की, मी इस्लामचा खूप अभ्यास केला आहे आणि मी हे मान्य करतो की, इस्लाम तत्त्वत: समताधिष्ठित धर्म आहे, परंतु तुम्ही लोकांनी भारतात मुस्लीम समाजात मनुवादी जातिव्यवस्था प्रस्थापित केली आहे त्याचे काय? मी इस्लाम धर्म स्वीकारल्यानंतर तुम्ही मला कोणत्या जातीमध्ये बसवणार? मौलवी सैहारवी निरुत्तर होऊन परत आले. (मसला-ए-कुफु और इशासन-ए-इस्लाम-मौलवी अब्दुल हमीद नामानी)
मुसलमानांतील जातिव्यवस्थेचा ज्यांना अभ्यास करावयाचा असेल त्यांना इंग्रजी भाषेत प्रा. इम्तियाज अहमद, प्रा. मुजीब, प्रा. मुशीरुल हसन तसेच अनेक पाश्चात्त्य लेखकांचे ग्रंथ उपलब्ध होऊ शकतात. तसेच विद्यमान खासदार अली अन्वर यांचे उर्दू आणि हिंदी भाषेतील ‘मसाबात की जंग’ आणि ‘दलित मुसलमान’ हे ग्रंथ, देशकाल सोसायटी- दिल्ली द्वारा संपादित ‘ऊं’्र३ ट४२’्रे’ हा ग्रंथ, मराठीमध्ये प्रा. फकरुद्दीन बेन्नूर लिखित ‘भारतीय मुसलमानांची समाजरचना आणि मानसिकता’ हा ग्रंथ, प्रस्तुत लेखकाचा २००१ सालच्या ‘सुगावा’ मासिकाच्या विशेषांकातील प्रदीर्घ लेख तसेच प्रा. जावेद कुरेशी आदींचे ग्रंथ उपलब्ध आहेत. उर्दू भाषेत नुकताच प्रकाशित झालेला प्रा. मसूद आलम फलाही या तरुण लेखकाचा ‘हिंदुस्थान में मुसलमानों में जात-पात’ हा अतिशय अभ्यासपूर्ण ग्रंथ. हा तरुण लेखक ‘जमाते इस्लामी-हिंद’च्या ‘मदरसतुल फलाह’मधून मौलवीची पदवी प्राप्त केल्यानंतर जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, नवी दिल्लीमधून एम्. ए. आणि एम्.फील करून सध्या लखनौ येथील ‘ख्वाजा मुईनोद्दीन चिश्ती उर्दू, फारसी, अरबी विद्यापीठांमध्ये अरेबिकचा प्राध्यापक आहे. त्याने लिहिले आहे की, जमाते इस्लामीसह मुसलमानांतील सर्वच पंथांमध्ये आणि जमातीमध्ये (अहमदिया मुस्लीम जमात वगळून -लेखक) बेटी व्यवहारामध्ये जात पाळलीच जाते. अनेक वेळा उच्चवर्णीय, बिगर-मुस्लीम तरुणालादेखील मुलगी दिली जाते (राजपूत मुसलमानांत सर्रास) पण तथाकथित खालच्या जातीच्या उच्चविद्याविभूषित मुस्लीम तरुणालासुद्धा मुलगी दिली जात नाही.
दुसरा प्रश्न मला विचारला गेला की, जर भारतीय उपखंडातील मुसलमान पूर्वाश्रमीचे हिंदूच आहेत, तर ते हिंदूंचा द्वेष आणि तिरस्कार का करतात? या प्रश्नाचे उत्तर डॉ. रावसाहेब कसबे यांनी त्यांचा ग्रंथ ‘हिंदू-मुस्लीम प्रश्न आणि सावरकरांचा हिंदुराष्ट्रवाद’मध्ये समर्पकपणे आणि थोडक्यात दिले आहे, ते नमूद करून संपवतो.
‘भारतीय इस्लामी राजवटीचे आणखी एक वैशिष्टय़ असे आहे की त्यांनी ज्या थोडय़ा हिंदू सत्ताधारीवर्गातील घराण्यांना मुसलमान केले ते अतिशय काळजीपूर्वक केल्याने त्यांचे धर्मातर शंभर टक्केपूर्ण झाले. परंतु ज्या शूद्रातिशूद्र जातींनी इस्लाम स्वीकारला त्यांच्याकडे इस्लामी धर्मगुरू आणि सत्ताधारी यांनी फारसे लक्ष दिले नाही. त्यामुळे त्यांनी इस्लामचा स्वीकार केला होता तरी त्यांचे पूर्णपणे इस्लामीकरण झालेले नव्हते. आजही अनेक मुसलमानांत हिंदू रीतिरिवाज तर आहेतच, परंतु अनेक वर्षे आपल्या सदऱ्याखाली लपविलेले हिंदू देवही त्याच्या घरांत अगदी अलीकडच्या काळापर्यंत होते. या वर्गातून मुस्लीम धर्मातर फार मोठय़ा प्रमाणात झाल्यामुळे सामाजिक-आर्थिक परिस्थितीतील त्यांच्या दास्याने त्यांना हिंदू सत्ताधारीवर्गाविरुद्ध अधिक आक्रमक व निर्दय बनविले. ते ज्या काळात हिंदू होते त्या काळात त्यांना जी वागणूक या हिंदू सत्ताधारीवर्गाकडून मिळत होती तिची परतफेड हे मुसलमान अधिक आक्रमक होऊन आणि अधिक निर्दय होऊन करीत होते आणि आजही त्यांच्यातील ती प्रवृत्ती पूर्णपणे लुप्त झालेली नाही.’ (उक्त- पाने १०४-१०५)
एवढय़ाने प्रश्नकर्त्यांचे समाधान होईल, अशी आशा आहे.

Kolhapur district, election campaign, caste and religion issues, kolhapur, hatkanangale constituency
कोल्हापूरच्या पुरोगामी भूमीत जाती धर्माच्या आधारातून मतांची जुळवाजुळव
GST Uniform taxation of goods and services
‘जीएसटी’च्या ध्येयपूर्तीसाठी…
how to choose healthy breakfast health expert told
७० टक्क्यांपेक्षा जास्त भारतीयांच्या नाश्त्यात पौष्टिकतेचा अभाव; पौष्टिक नाश्ता कसा निवडावा? आहारतज्ज्ञ सांगतात…
Katchatheevu island controversy
विश्लेषण: कच्चथीवू बेटावर ‘या’ हिंदू राजांनी केले होते राज्य? त्यांचा रामाशी नेमका संबंध काय होता?