‘कोब्रापोस्ट’ या वृत्त-संकेतस्थळाने नरेंद्र मोदी व अमित शाह यांचा संबंध एका तरुणीवर पाळत ठेवण्याशी कसा होता, हे उघड करणाऱ्या बातम्या व चित्रफिती १५ नोव्हेंबररोजी प्रसृत केल्या, त्याचे पडसाद आठवडाभर उमटत आहेत. त्याबद्दलचे हे दोन दृष्टिकोन.. पहिला, काँग्रेसच्या नेत्यांनीही राजकीय क्षेत्रात तरी यथेच्छ पाळत ठेवल्याचे सांगून  ‘शासनकर्त्यांची मजबूरी’ उघड करणारा; तर दुसरा, या विशिष्ट पाळत प्रकरणाचे गांभीर्य काय, हे सांगणारा
‘शंभर उंदीर खाऊन बोका काशीयात्रेला निघाला’ किंवा ‘सौ चूहे खाकर बिल्ली निकली हज’ यापैकी तुम्ही कोणती म्हण वापरता यावर तुमच्या ‘सेक्युलरिझम’बद्दल एक वेळ मतप्रदर्शन करता येईल. पण निवडणूक प्रचाराच्या धुळवडीत या म्हणींचा काय संबंध? नक्कीच आहे. सध्या इतर ठोस मुद्दय़ांच्या अभावी काँग्रेसने मोदी व त्यांचे उजवे हात अमित शाह यांच्यावर आरोप केला आहे की एका तरुणीचे टेलिफोन मोदी सरकारच्या सांगण्यावरून २००९ साली ‘टेप’ केले गेले. इतकेच नाही तर तिच्यावर पाळतसुद्धा ठेवण्यात आली. पंतप्रधान होण्याची स्वप्ने पाहणाऱ्या मोदींवर केवढे गंभीर आरोप हे! अगदी खरे. आणि इथेच वरील म्हण चपखल लागू होते. ती कशी? जरा बघाच.
गेल्या ६७ वर्षांपैकी बहुतांश काळ सत्तेवर असणाऱ्या काँग्रेस शासनावरच अनेकदा चोरून फोन संभाषणे ऐकण्याचे आरोप झाले हे सत्य विसरून चालणार नाही. आणीबाणीच्या काळात तर खुद्द वरिष्ठ काँग्रेसी नेत्यांना या गोष्टीची इतकी दहशत होती की इंदिराविरोधी मंत्री आपली खलबते बंगल्याबाहेर उघडय़ा अंगणात करीत. आजपर्यंतच्या बहुतांश काँग्रेसी पंतप्रधानांबद्दल वरिष्ठ नेत्यांना तसेच राज्यातील मुख्यमंत्र्यांना संशयाचे भूत पछाडलेले असायचे की राज्यातील व दिल्लीतील आय.बी. प्रमुख त्यांचे फोन संभाषण टेप करून दिल्लीला कळवतात. आरोपांची ही चिखलफेक काँग्रेस व विरोधी पक्षांमध्ये तर अविरत असायचीच. तपशील हवेत? तेपण घ्या.
१९९० साली व्ही. पी. सिंग पंतप्रधान असताना चंद्रशेखर यांचे फोन टॅप होत असल्याच्या आरोपांची रीतसर सी.बी.आय. चौकशी होऊन आरोप निराधार असल्याची शहानिशा झाली होती. नंतर चंद्रशेखर स्वत: सत्तेवर असताना राजीव गांधींवर पाळत ठेवल्याच्या आरोपांना त्यांना सामोरे जावे लागले. हे आरोप केवळ सत्ता उलथून पाडण्यासाठी होते हे नंतर लवकरच घडलेल्या मुदतपूर्व निवडणुकांवरून दिसून आले. नंतर १९९१ साली नरसिंह राव पंतप्रधान असताना त्यांचा पत्ता कापायला टपलेल्या वरिष्ठ मंत्र्यांनी (अर्जुन सिंग) व एका काँग्रेसी मुख्यमंत्र्यांनी (नामनिर्देश टाळतो कारण हा संशय खासगीत व्यक्त झाला.) तसेच तत्कालीन मुख्य निवडणूक आयुक्त टी.एन. शेषन यांनी हे शस्त्र रावसाहेबांविरुद्ध वापरले. या प्रकरणीपण आय.बी.ने सविस्तर चौकशी करून त्यातील फोलपणाची खात्री दिली होती. (हा स्वानुभव आहे इतकेच थोडक्यात सांगतो.) आता सध्या सुरू असलेल्या प्रकरणाचा विचार करू. काँग्रेसच्या आरोपांसंदर्भात काही प्रश्न उद्भवतात-
१) सदर प्रकरण २००९ सालचे असताना नेमके आताच कसे चच्रेत आले?
२) सदर टेप्स सी.बी.आय.च्या दुसऱ्या एका केसच्या तपासाच्या एका भागात समाविष्ट असताना ‘कोब्रा पोस्ट’ या संस्थेस कशा मिळाल्या? (इशरत जहान प्रकरणातदेखील सीबीआयच्या तपासाची दैनिक बित्तंबातमी इंडियन एक्स्प्रेस दैनिकात रोज प्रसारित होत असे. हे कसे घडू शकले?)
३) जिच्यावर पाळत ठेवली गेल्याचा आरोप आहे, त्या तरुणीची स्वत: याविरुद्ध तक्रार होती का? तिच्या वडिलांच्या विनंतीवरूनच पाळत ठेवण्यात आल्याचे सकृद्दर्शनी दिसते. मग यात गुन्हा झाला कसे म्हणता येईल?
४) कामकाजादरम्यान अधिकाऱ्यांचे मंत्र्यांबरोबर फोनवर वार्तालाप होतच असतात. ते टेप करण्याचा आगाऊपणा अधिकाऱ्याने का केला? (आजकालच्या भ्रष्ट वातावरणात ते योग्यच आहे, असे मान्य करायची दुर्दैवाने वेळ आली आहे कारण सुप्रीम कोर्टानेच मंत्र्यांनी हाताखालील अधिकाऱ्यांना लिखित आदेश द्यावेत असे म्हटले आहे).
अशा अनाठायी प्रसिद्धीचा संबंधित महिलेच्या वैयक्तिक जीवनावर किती विपरीत परिणाम होईल याची कोणीही जाण ठेवली नाही हे किती लज्जास्पद आहे. तिच्या आत्मसन्मानाची इतकी काळजी दाखवणाऱ्या काँग्रेस नेत्यांनी व प्रसारमाध्यमांनी तिची ओळख पटवून घेण्याचा हट्ट का धरावा? टेपची विश्वासार्हता सिद्ध झाल्याशिवाय माध्यमांनी व पक्षांनी त्याचे भांडवल करू नये.
विरोधकांच्या हालचाली व विचारविनिमयांवर नकळत बारीक नजर ठेवणे ही तर शासनकर्त्यांची ‘मजबूरी’ असते. ही चाणक्यनीती पूर्वापार चालत आली आहे. मैत्रीसंबंधदेखील त्याच्या आड येत नाहीत. या क्षेत्रात ‘सापडला तर चोर एरवी साव’ हा अलिखित प्रघात आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष निक्सन सापडले म्हणून पदच्युत झाले. सध्या मित्रराष्ट्रांच्या नेत्यांच्या टेलिफोन संवादावर पाळत ठेवल्यामुळे अमेरिकेवर किती नामुष्कीची वेळ आली आहे हे आपण पाहतोच आहोत.
एकंदरीत ‘उडदा माजी काळेगोरे काय निवडती निवडणारे’ (इती: श्री व्यंकटेश स्तोत्र) असेच म्हणवे लागेल.